रेल्वे फंट्र कॉरिडॉरमुळे खोदकाम; पोलीस ठाणे, रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग धोकादायक

डहाणू: वाणगाव-कापशी रस्त्यावर रेल्वे फंट्र कॉरिडॉरच्या खोदकाम तसेच मुरूममाती पसरून रस्ता चिखलमय झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पावसाचे पाणी साचून खड्डय़ाचे तळे तयार झाले आहे. परिणामी, वाणगाव पोलीस स्टेशन तसेच वाणगाव रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. कापशी, कोमपाडा येथून रुग्ण तसेच गर्भवती मातांना सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

वाणगाव कोमपाडा, कापशी गावाकडे जाणारा एकमेव रस्ता रेल्वे फंट्र कॉरिडॉरच्या खोदकामामुळे पुरता खड्डेमय बनला आहे. रेल्वे फाटकाजवळ मुख्य रस्त्यावर खड्डय़ात पाणी साचून रस्त्याचा तलाव झाला आहे. आजारी रुग्ण तसेच गर्भवतींना दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाण्यातून वाट काढता येत नसल्याने अनेकदा अपघातासारखी परिस्थिती उद्भवत आहे.

याशिवाय वैजनाथ ठाकूर विद्यालयात येण्यासाठी  कोमपाडा येथील पर्यायी मार्गावरील नाल्याचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. परिणामी विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकत नाही. तर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच खड्डय़ामध्ये पाणी साचल्याने रेल्वे स्थानकात पोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा अवघड वाटेमुळे नोकरी करणाऱ्यांना रेल्वे स्थानकात वेळेवर पोचता आले नसल्याचे उदाहरणे आहेत. विद्यार्थी, ग्रामस्थ आणि रेल्वे प्रवाशांना रोजची गैरसोय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी आहे.

कोमपाडा येथे रस्ते ठेकेदाराच्या नावाचा बोर्ड लावला आहे. त्यावरील सविस्तर माहिती पुसून टाकली आहे. त्यामुळे समजायला मार्ग नाही. जाब कोणाला विचारावा अशी परिस्थिती आहे.

– डॉ. सुनील पऱ्हाड, वाणगाव

ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. मोठा अपघात झाल्यावर याकडे लक्ष दिले जाईल का? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

– लखू खांडेकर, कोमपाडा