पालघर : तालुक्यातील दुर्वेस काटेला पाडा रस्ता तयार करण्याच्या कामाचे आदेश निघाले आहेत. मात्र रस्त्याच्या जमिनीसाठी आता वन विभागाचा अडथळा उभा राहिला आहे. साठ वर्षांनंतर हा रस्ता मंजूर झाला असला तरी वन विभागाच्या जाचक अटीमुळे तो रखडण्याची भीती आहे. त्यामुळे काटेला पाडावासीयांचा खडतर प्रवास असाच सुरू राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुर्वेस गावातील वैतरणा नदीकिनारी काटेला पाडा आहे. या पाडय़ात पन्नास कुटुंबांचे वास्तव्य आहे. महामार्गापासून त्याचे अंतर सुमारे एक किलोमीटर इतके आहे. मनोर येथे जायचे झाल्यास जवळचे अंतर म्हणून वैतरणा नदी ओलांडून जाण्याचा धोका ग्रामस्थ पत्करतात. पावसाळय़ात नदीपात्र भरलेले असल्याने दुर्वेसमार्गे मनोर असा प्रवास करावा लागतो. मात्र दुर्वेस गावापेक्षा मनोर हे गाव जवळ असल्याने ग्रामस्थ नदीपात्रातून धोकादायक प्रवास करतात. काटेला पाडय़ावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. शेतातील बांधावरून नागरिकांचा प्रवास गेली अनेक वर्षे सुरू आहे. येथील रुग्णांना, गर्भवती महिलांना झोळी करून त्याद्वारे रुग्णालयात न्यावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेमार्फत रस्ता मंजूर करण्यात आला. त्यासाठी २८ लाख रुपये निधी तरतूद असून कामाचे आदेशही कंत्राटदाराला दिले आहेत. परंतु वन विभागाच्या जाचक अटींमुळे रस्ता तयार होण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान मंजूर निधी परत जातो की काय, अशी भीती आता वर्तवली जात आहे. काटेला पाडा रस्त्याबाबत उपवन संरक्षकांसोबत चर्चेतून मार्ग काढणार असल्याची माहिती उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत आहे.
भूखंडावर वनदाव काटेला पाडा हा रस्ता ज्या परिसरातून जात आहे त्या दोन विविध भूखंडांवर सामूहिक वनदावे आहेत. दोन दावे एकाच सर्वेक्षण क्रमांकामध्ये असल्याने रस्त्याचे काम अडचणीत आले. मंजूर झालेल्या सामूहिक वन दाव्याच्या जमिनीची मोजणी व हद्दनिश्चिती करण्याचे पत्र वन विभागाने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे हे काम होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मार्च अखेपर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार नाही असे दिसते.
रस्त्याअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. वन विभागाकडून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेत मार्ग काढावा. -विनया पाटील, सदस्य, जिल्हा परिषद, पालघर