केवळ ३७ टक्के काम; वनखात्याचा विरोध, जलसंपदामंत्र्यांना निवेदन

वाडा : शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाडा तालुक्यातील डाहे येथील माती बंधाऱ्याचे (प्रकल्पाचे) काम हाती घेण्यात आले होते; परंतु गेल्या ३० वर्षांपासून विविध कारणांमुळे ते बंद पडले आहे. वनखात्याचा त्याला विरोध असल्यामुळे या कामाची रखडपट्टी झाली असून हा प्रश्न सोडविण्यासाठी सहा गावांतील शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.

लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग सूर्यानगर या विभागाकडून सन १९७७ साली डाहे या सिंचन प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रकल्पामध्ये १२४ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून यामुळे आजूबाजूच्या सहा ते सात गावपाडय़ांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सन १९७९ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तब्बल चार वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीचे काम ३७ टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर या प्रकल्पाला वनखात्याने विरोध केल्याने हे काम थांबले आहे.  गेल्या ३० वर्षांपूर्वी या प्रकल्पावर २१ लाख ७७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतर आजतागायत या बंधाऱ्याचे काम बंदच आहे. या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची तरतूद होताच काम सुरू होईल, असे पालघर जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर यांनी म्हटले आहे.

वन विभागाला ७ कोटी १७ लाख देणे बाकी

डाहे प्रकल्पाचा काही भाग हा वन विभागाच्या क्षेत्रात येत आहे. या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या वनजमिनीसाठी सुधारित अंदाजपत्रक बनविण्यात आले आहे. दहा लाख रुपये प्रति हेक्टरप्रमाणे ७ कोटी १७ लाख रुपये वनखात्याकडे वर्ग करावे लागणार असल्याची माहिती लघुसिंचन उपविभाग सूर्यानगर यांच्याकडून देण्यात आली आहे.

डाहे प्रकल्प बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेतली आहे. निधीमुळे या बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प झाले आहे. मी लवकरच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

दौलत दरोडा, आमदार