वाडा : शासनाच्या आदेशान्वये १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळेच्या बाहेर असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनातून करोनाची भीती दूर व्हावी व त्यांनी आनंदात वर्गात प्रवेश करावा या हेतूने विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडामधील शिक्षकांनी बोलक्या बाहुल्यांकडून चिमुरडय़ांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

जिल्हा परिषद शाळा काचरपाडा येथे पहिली ते पाचवी इयत्तांपर्यंतची शाळा आहे. पाचवीचे वर्ग शासनाच्या आदेशान्वये यापूर्वीच सुरू झाले आहेत. मात्र पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले आहेत.

पहिल्याच दिवशी या शाळेतील शिक्षक नामदेव घवाळे यांनी आणलेले बाहुल्यांचे मुखवटे पाचव्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांनी परिधान करून सॅनिटायझर, मुखपट्टी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना देऊन बोलक्या बाहुल्यांच्या आवाजात विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम वाढाण, केंद्र प्रमुख सूर्यकांत ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.