पालघर : पालघर पूर्वेकडील जुना मनोर मार्गाचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असून यातील जवळपास ५०० मीटर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. तर उर्वरित शासकीय विश्रामगृहापर्यंतचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे.

पालघर पूर्वेकडील जुना मनोर मार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम मार्चपासून नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. सेंट जॉन महाविद्यालयापासून शासकीय विश्रामगृह पर्यंत जवळपास दीड किलोमीटर पट्टा काँक्रीट करण्यात येत आहे. सेंट जॉन महाविद्यालयापासून घोलविरा नाक्यापर्यंत ५०० मीटरच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम साडेतीन महिन्यानंतर पूर्ण झाले असून मागील आठवड्यापासून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यामुळे या परिसरात असलेल्या इमारतीत संकुलातील रहिवाशी, शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी व कामगार वर्ग समाधान व्यक्त करत आहे. या मार्गावर वेग नियंत्रणासाठी पाच गतिरोधक, रेडियम ब्लिंकर, नाल्यावर रस्त्याच्या कडेला रेलिंग (संरक्षण कठडे) व रस्त्याला चिन्हांकन करण्यात आले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीला रात्रीच्या वेळी देखील सोयीस्कर ठरत आहे.

याबाबत संबंधित ठेकेदारासोबत संपर्क साधला असता रस्त्याचे जवळपास ५०० मीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शासकीय विश्रामगृहापर्यंतचे काम पावसाळा संपताच हाती घेण्यात येणार आहे. तसेच घोलवीरा नाका, सेंट जॉन नाका व नाल्याजवळ देखील डांबर व काँक्रीटच्या जुळणाऱ्या रस्त्यावर उतार करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रुंदीकरण व खड्डे मुक्तीमुळे रिक्षाचालक सुसाट

पूर्वेकडील या मार्गावरून सेंट जॉन महाविद्यालय मध्ये जाणारे हजारो विद्यार्थी, पूर्वेकडे असणारे औद्योगिक वसाहत मधील कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवास करत असतात. प्रकल्पाच्या कामातल्या अनेक मालवाहू जड गाड्या देखील याच मार्गाने प्रवास करतात. रेल्वे स्टेशन पूर्वेकडे उतरणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी महाविद्यालयात येण्यासाठी व जाण्यासाठी रिक्षाचा वापर करत असल्याने या मार्गावरून सकाळी सात वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत रिक्षांची स्पर्धा सुरू असते. अगोदर हा रस्ता खड्डेयुक्त असताना देखील या मार्गावरून रिक्षा चालक सुसाट वेगाने जात होते. आता मात्र रुंदीकरण व खड्डेमुक्त रस्ता रिक्षा चालकांना उपलब्ध झाल्यामुळे गतिरोधका व्यतिरिक्त त्यांच्या रिक्षांचा वेग कमी होताना दिसून येत नाही.