बोईसर: बोईसर च्या मुख्य रस्त्यांशेजारील गटारांच्या कामाला ग्रामपंचायती मार्फत सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनतळ आणि पदपथासाठी अधिक जागा उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार आहे.बोईसर पालघर आणि बोईसर तारापूर या मुख्य रस्त्यांशेजारील सांडपाणी वाहून नेणारी गटारे अनेक वर्षांपासून उघड्या स्थितीत आहेत. उघड्या गटारांमुळे सांडपाण्याच्या दुर्गंधी सोबतच घाण आणि डासांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत होता. गटाराचे काम करण्याबाबत ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात तोडगा निघत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गटारांची कामे प्रलंबित होती. मात्र आता बोईसर ग्रामपंचायतीमार्फत भूमिगत गटारांचे  कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ओसवाल ते हार्मोनी प्लाझा, बोईसर बेकरी ते नवापूर नाका, वर्तक दवाखाना ते एचडीएफसी बँक पर्यंत गटारांचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गटारांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

सध्याची उघडी गटारे भूमिगत करून त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अस्वल ते हार्मोनी प्लाझा पर्यंत गटार भूमिगत केल्यामुळे जवळपास बोईसर तारापूर रस्त्याशेजारील १८  फुट रुंदीची अधिकची जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. या जागेमध्ये ग्रामपंचायतीमार्फत दुचाकी पार्किंग सोबतच पादचार्‍यांना ये जा करण्यासाठी पदपथाची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. बोईसरमधील पालघर रस्त्यावरील रेल्वे स्थानक ते नवापूर नाका आणि तारापूर रस्त्यावरील हार्मोनी प्लाझा पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेली उघडी गटारे आणि फेरीवाल्यामुळे चालण्यासाठी रस्ता नसल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागते. मात्र आत्ता उघडी गटारे भूमिगत करण्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहनतळ आणि पदपथासाठी अधिक जागा उपलब्ध होऊन रस्ता मोकळा झाल्यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईसर ग्रामपंचायती मार्फत पालघर आणि तारापूर रस्त्याशेजारील उघडी गटारी भूमीगत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गटारे भूमिगत केल्यामुळे अधिकची जागा उपलब्ध होऊन त्यावर वाहन तळ आणि पदपथाची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर