पालघर: जागतिक आदिवासी दिन जिल्ह्याभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रॅली आणि शोभायात्रेत आदिवासी बांधव, विशेषतः तरुण आणि महिला, हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह विविध ठिकाणी आदिवासी बांधवांनी रॅलीचे आयोजन केले होते. पारंपरिक पोशाखात आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या पुरस्कर्त्यांनी दिलेल्या टी-शर्टमध्ये आदिवासी तरुण-तरुणी या सोहळ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले.
या रॅलींमध्ये पारंपारिक तारपा वाद्य वाजवून तारपा नृत्य तसेच इतर आदिवासी नृत्ये सादर करण्यात आली. अनेक तरुणांनी विविध वेशभूषा आणि रंगरंगोटी करून कार्यक्रमात उत्साह वाढवला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आदिवासी समाजातील अनेक ज्येष्ठ मान्यवर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालघर शहरात भूमीसेना आणि आदिवासी एकता परिषदेने रॅलीचे आयोजन केले होते. याव्यतिरिक्त, गाव आणि तालुका पातळीवरही रॅली काढून आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आदिवासी बांधवांनी या दिनाचा आनंद साजरा केला.
‘वीरांगना राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजने’चा लोकार्पण सोहळा
महाराष्ट्रातील महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘वीरांगना राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे, तंट्या भिल, नाग्या कातकरी, ख्वाजा नाईक, वीर बाबुराव शेडमाके, तिलका मांझी यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जव्हार आणि डहाणू प्रकल्पातील बचत गटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या योजनेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मधुकर जागले (डहाणू), दीपक टिके (जव्हार), बन्सीलाल पाटील (डहाणू), कार्यालय अधीक्षक योगेश भोये (जव्हार), सुचिन संखे (डहाणू), संशोधन सहाय्यक जगदीश पाटील (डहाणू) तसेच डहाणू व जव्हार प्रकल्प आदिवासी विकास निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांना योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्व-उद्योग, बचत गट बळकटीकरण, कौशल्य विकास आणि उत्पन्नवाढीसाठी आवश्यक साधने व प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांची भूमिका अधिक सक्षम होईल, असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला.