News Flash

श्रद्धेची चुकलेली वाट

‘श्रद्धा’ या शब्दापेक्षाही ‘धारणा’ हा शब्द योग्य वाटतो.

समाजाने अधिक ‘परिवर्तनस्नेही’ होण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास असलेल्यांचा दृष्टिकोन कसा असावा याविषयी मागच्या लेखात (२० जानेवारी)मी काही मुद्दे मांडले होते. या लेखात दुसऱ्या बाजूने विचार करू. म्हणजे धार्मिक-सामाजिक संदर्भात जे परंपरावादी आहेत त्यांच्यावरील जबाबदारी काय आहे ते पाहू.

मागच्या लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात नाशिकच्या एका वाचकाची प्रतिक्रिया बोलकी होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा विविध सामाजिक वर्तुळांत वावरताना काही नवीन विचार मांडणाऱ्याची कोंडी होते याचा चांगलाच अनुभव गाठीशी आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. हा अनुभव त्यांच्यासारखा इतरही काहींच्या गाठीशी असेल. माझ्याही गाठीशी आहे. ‘आपण एकटे पडतो’ अशी मला बरेचदा जाणीव होते. अर्थात या द्वंद्वातील गुंते वैचारिक वाढीच्या टप्प्यावर लक्षात येत गेले आणि मी त्यातून मार्ग काढत गेलो. प्रास्ताविकाच्या लेखात लिहिलं होतं तसं दोन माणसांमध्ये जसं द्वंद्वात्मक नातं असतं तसं दोन संकल्पनांमध्ये, विचारांमध्ये असतं. हे द्वंद्व असणार आहे, अगदी कायम असणार आहे हे लक्षात घेऊनच सर्व संबंधितांना आपलं वर्तन आखावं लागतं. या द्वंद्वात परंपरेच्या ‘फंक्शन’ला समजून घ्यायची एक जबाबदारी जशी परिवर्तनवाद्यांची आहे तशीच दुसरी जबाबदारी परंपरेचं ‘डिसफंक्शन’ समजून घ्यायची जबाबदारी परंपरानिष्ठ लोकांचीही आहे. आणि यात कळीच्या स्थानी आहे ती ‘श्रद्धा’.

मला बरेचदा ‘श्रद्धा’ या शब्दापेक्षाही ‘धारणा’ हा शब्द योग्य वाटतो. ‘धारणा’ म्हणजे retentive power (ग्रहणशक्ती), understanding (समज). श्रद्धेमध्ये ‘पूर्ण शरणागती’ आहे, स्वत: विचार न करता विश्वास टाकणं आहे तर धारणेमध्ये थोडा तरी विचार झालेला असणं अभिप्रेत आहे. पण तरी आपण सर्वपरिचित शब्द म्हणून ‘श्रद्धा’ हाच शब्द वापरू आणि आपण ज्याला श्रद्धा म्हणतो ती एक प्रकारे त्या माणसाची ‘समज’ आहे असं गृहीत धरू. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या पुस्तकात श्रद्धेविषयी महत्त्वाचं विवेचन केलं आहे. हे संपूर्ण पुस्तक मला या विषयातील वैचारिक स्पष्टतेसाठी महत्त्वाचं वाटतं. यातील त्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लहानसा लेख वाचण्यासारखा आहे.

‘बुद्धिप्रामाण्य’ हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. माणसाने आपल्या बुद्धीला पटेल, बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच करावं असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की एखादा माणूस मांजर आडवी गेली की अपशकुन होतो असं समजत असेल तर ते त्याच्या बुद्धीला पटलेलं असतं, म्हणूनच तो तसं समजत असतो. अनेक सामाजिक कुप्रथा कुणाच्या तरी बुद्धीला पटणाऱ्या होत्याच. माणूस जे जे निर्णय घेतो ते त्याच्या बुद्धीनेच घेतो. मग अशा बुद्धिप्रामाण्याचं काय करायचं? (रेग्यांनी पुढे यावर विस्तृतपणे लिहिलं आहे. आत्ता त्यावर लिहीत नाही, पण त्याविषयी, खरं तर या पुस्तकाविषयी, सविस्तर लिहायला आवडेल.) रेगे यांची मांडणी वाचताना मला लक्षात आलं की ‘बुद्धिप्रामाण्य’ हा शब्द नेहमीच सर्वत्र लागू होईल असं नाही. काही ठिकाणी तो अपुरा पडू शकतो. ‘विवेकवाद’ हा शब्द अधिक समर्पक आहे. या शब्दातून ‘चिकित्सक वृत्ती’ ध्वनित होते. हा शब्द मनुष्याच्या निर्णयक्षमतेकडे, योग्य-अयोग्य यात फरक करण्याच्या क्षमतेकडे निर्देश करतो. त्यामुळे आपल्या श्रद्धा किंवा धारणा ‘बुद्धीच्या कसोटीवर’ घासून बघण्यापेक्षा ‘विवेकाच्या कसोटीवर’ घासून बघाव्यात.

रेगे लिहितात, ‘विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची किंवा असत्य आणि/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे.’ थोडक्यात विवेकवाद ही एक प्रभावी ‘तपास यंत्रणा’ आहे. आपल्या ज्या काही श्रद्धा, समजुती असतील त्यांना सतत तपासत राहिलं तरच आपल्याला नवा विचार स्वीकारणं, किमान त्या विचाराला पोचपावती देणं जमू शकेल. परंपरानिष्ठ मानसिकतेची एक मुख्य अडचण अशी आहे की परंपरेने चालत आलेलं ‘बरोबर’ आहे आणि नवीन काहीही ‘चूक’ आहे अशी मनुष्याची समजूत होऊन बसते. एखाद्या नव्या गोष्टीला तपासून बघावंसं वाटणं, ती स्वीकारायला जड जाणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. पण ती ‘चूक’ आहे असा निर्वाळा दिला जात असेल तर त्यात धोका आहे. कारण यातून सुधारणेचे मार्गच बंद होतात किंवा मला जे नवं स्वीकारता येतं तेच ‘योग्य’, इतर नवं ‘अयोग्य’ अशी मानसिकता तयार होते आणि त्याचं रूपांतर हटवादीपणात, आक्रमकतेत होतं. आपल्याकडे अशा उदाहरणांची कमतरता भासू नये!

माणसाला हळवं करणाऱ्या गोष्टीत ‘श्रद्धा’ अग्रस्थानी आहे. ती कुणावर, कशावर हा प्रश्नच येत नाही. ती शंकरावर, गणपतीवर, भगवद्गीतेवर, कुराणावर, दत्तगुरूंवर, ज्योतिषावर, कार्ल मार्क्‍सवर, महात्मा गांधींवर, हिंदुत्ववादावर- कशावरही असू शकते. आणि मग तिथे कुणी तार्किक प्रश्न केले की जो बचावाचा प्रयत्न सुरू होतो तो ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्या बचावाचा प्रयत्न नसतो तर आपल्या स्वत:च्या बचावाचा प्रयत्न असतो. त्यामुळे इथे एक लक्षात घ्यायला हवं की माणसाच्या जीवनात श्रद्धेचं काहीएक स्थान आहे हे मान्यच आहे, माणसाने तर्ककठोर होऊन अगदी कोरडं होऊन जावं, समर्पित भावनेचा आधार कधीच घेऊ  नये अशीही अपेक्षा नाही. श्रद्धा, समर्पण या गोष्टी माणसाच्या जगण्यात ‘अँकर’चं काम करत असतात हेही मान्य आहे. पण मुद्दा असा की आपण ज्या श्रद्धास्थानांवर ‘विसावतो’ तिथून उठून पुढच्या प्रवासाला जाणार की नाही? शिवाय तिथे पुन्हा यायची मुभा नाही असंही नाही. माणसाचा जो ‘आंतरिक स्वर’ आहे तो त्याला/तिला पुन्हा त्या स्थानाकडे खेचतोच. जर एखाद्या माणसाला गणपतीला नमस्कार करून किंवा ठरावीक दिवशी उपास करून शांत वाटत असेल, आनंद मिळत असेल तर तो त्याला मिळू न देणं चुकीचं होईल. पण प्रश्न नमस्कारापुरता किंवा उपासापुरता मर्यादित नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. आणि इथे असं दिसतं की ‘श्रद्धा’ ही मूळची एका अर्थी सकारात्मक संकल्पना हळूहळू नकारात्मक होत जाते. नमस्कार करणाऱ्याला नमस्कार न करणारा खुपू लागतो आणि मग संघर्षांची ठिणगी पडते.

आपल्या श्रद्धेची सीमारेषा आखणे हा कळीचा प्रश्न आहे आणि इथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उगम होतो. ‘विज्ञान’ म्हणजे नक्की काय ही सैद्धांतिक चर्चा आपण आत्ता बाजूला ठेवू आणि असं बघू की आज धर्मश्रद्धा, परंपरा पालनाचा आग्रह याचे जे दुष्परिणाम दिसतात त्याचं काय करायचं? तर मुख्य म्हणजे सश्रद्ध, परंपरांचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. किमान या ‘कम्फर्ट झोन’च्या सीमेवर तरी यावं. आज त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या श्रद्धेच्या विषयाचा, म्हणजे देवाधर्माचा बाजार मांडला जातो आहे. तो काही ‘सश्रद्ध’ लोकांनीच मांडला आहे. मग आपण जर त्या बाजाराचा भाग होत असू तर ते बरोबर आहे का हे त्यांनी स्वत:ला विचारावं. या बाजारात आणि गोंगाटात निखळ श्रद्धा मुळात उरली आहे का या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यावं. माझी खात्री आहे की या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळणार नाही. आज श्रद्धा खोल अंतर्मनात कमी आणि नाईलाजात, बाजारात जास्त आहे.

श्रद्धेच्या परिणामी लोक अधिकाधिक एकारलेपणाकडे झुकतात की मुळातल्या एकारलेपणाला श्रद्धा खतपाणी घालते याचं उत्तर व्यक्तिगणिक वेगळं असू शकेल, पण आपली श्रद्धा, आपल्या समजुती ही आपली ‘विचारपद्धती’ होऊ लागली आहे का हा विचार प्रत्येकाने जरूर करावा. कारण श्रद्धा ही मनोवस्था होऊ शकते, विचारपद्धती होऊ शकत नाही!

उत्पल व. बा.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2018 12:36 am

Web Title: articles in marathi on creativity skills in human brain part 3
Next Stories
1 पेशन्स फॉर परिवर्तन
2 नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण
Just Now!
X