
सध्याचे उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांचा कार्यकाल १० ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्याअगोदरच म्हणजे ६ ऑग्सटला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होईल.
त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच नव्या राष्ट्रपतींची घोषणा करण्यात येईल. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
आता उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची घोषणा करण्याचे बाकी आहे. पण उपराष्ट्रपतीच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्यांच्याकडे नेमके कोणते अधिकार आहेत? आपण जाणून घेऊया.
उपराष्ट्रपती पद देशातील दुसरे सर्वेाच्च पद मानले जाते. राष्ट्रपतींच्या गैरहजरीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळतात.
जर एखाद्या राष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल किंवा राष्ट्रपती पदावरील व्यक्तीचे निधन झाले असेल तर पुढील राष्ट्रपतींची नियुक्ती होईपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळतात. परंतु ६ महिन्यांच्या आत राष्ट्रपती पदाची निडणूक घेणे बंधनकारक आहे.
जो पर्यंत राष्ट्रपती आपला पदभार पुन्हा सांभाळत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती पदाचा सगळा कारभार उपराष्ट्रपतींकडे असतो.
उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती म्हणून काम करतात. राज्यसभेच्या कामकाजात सभापतींची महत्वाची भूमिका असते.
उदा. राज्यसभेत एखादे बील पास करण्याबाबत किंवा न करण्याबाबत ५०-५० टक्के मतदान झाले असेल तर उपराष्ट्रपती याबाबत निर्णायक मत घेऊ शकतात.
उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपुर्त करावा लागतो. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी बहुमताची गरज असते. राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांच्या बहुमतावरून हा निर्णय घेतला जातो.