-जयेश सामंत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने समर्थनाचे प्रतिज्ञापत्र आणावे असे आवाहन शिवसैनिकांना करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही याच दिशेने पाउल टाकत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे. शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातून त्यांच्या समर्थनासाठी प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहीमेची सर्व सुत्र ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे वास्तव्य असलेल्या टेंभी नाका येथील आनंद मठातून यासंबंधीचे नियोजन केले जात असून संपूर्ण जिल्ह्यात यासाठीचे अर्ज वितरीत केले जात आहेत.

ठाण्यात अजूनही उद्धव ठाकरे यांना नवा नेता सापडलेला नाही –

एकनाथ शिंदे यांच्या बंडास समर्थन देणाऱ्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करत शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून नव्या नियुक्त्यांचा सपाटा लावला आहे. ठाणे जिल्ह्यातही शिंदे समर्थकांना पदावरुन दुर करत शिवसेना भवनातून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अजूनही उद्धव ठाकरे यांना नवा नेता सापडलेला नाही. त्यामुळे नरेश म्हस्के यांच्या जागी नव्या जिल्हा प्रमुखाची नियुक्ती अजूनही शिवसेनेकडून करण्यात आलेली नाही.

सुनावणी पुढे गेल्याने शिवसेनेत अस्वस्थता

कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र सुभाष भोईर यांच्याकडे संपर्कप्रमुख पद तर सदानंद थरवळ या जुन्या जाणत्या शिवसैनिकाकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले आहे. याशिवाय याच भागात काही शहरप्रमुखांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत पक्षातील ३३ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला असला तरी ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघातील जिल्हाप्रमुख मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तेथे नव्या नियुक्त्यांची कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. असे असले तरी मातोश्रीवरुन जिल्ह्यात नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी शिंदे गटाकडून या नियुक्त्यांना तसेच उचलबांगडीला आव्हान देण्यात आले आहे. तसेच हीच खरी शिवसेना अशी भूमीका घेत काही नियुक्त्या नव्याने करण्यात आल्या आहेत.

प्रतिज्ञापत्राद्वारे शक्तीप्रदर्शन –

उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाचे निमीत्त साधत समर्थनाच्या प्रतिज्ञापत्राची भेट देण्याचे आवाहन केल्यानंतर शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील त्यांचे समर्थकही सावध झाले आहेत. शिंदे यांना पाठींबा देण्याचे आवाहन करत त्यांच्या समर्थकांकरवी प्रतिज्ञापत्र भरुन घेण्याची प्रक्रिया नुकतीच शिंदे गटाकडून सुरु करण्यात आली. आनंद दिघे यांचे निवासस्थान राहीलेल्या टेंभी नाका येथील आनंद मठातून यासंबंधीचे नियोजन केले जात आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे यांचे कट्टर समर्थक नरेश म्हस्के यांच्याकडे या मोहीमेचे नियोजन सोपविण्यात आले आहे. आनंद मठातून शिंदे यांच्या समर्थनासाठी छापलेले हजारो अर्ज संपूर्ण जिल्ह्यात पोहचविले जात आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राधान्याने हे अर्ज भरुन घेतले जात आहेत. याशिवाय जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधील प्रमुख शिंदे समर्थकांकडे हे अर्ज पोहचविले जात आहेत. काही ठिकाणी हे अर्ज व्हॉटस ॲप केले जात असून ते छापून घेऊन समर्थकांच्या स्वाक्षरीने भरुन द्यावेत अशा सूचना दिल्या जात आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा –

नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, भिवंडी भागात शिंदे यांना समर्थन देणाऱ्या नगरसेवकांना यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील काही समाजिक संघटना, संस्था यांच्या समर्थनाची पत्रेही मागविली जात आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांनी सातत्याने समर्थकांचे मेळावे तसेच वेगवेगळ्या समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना आणि शिवसेनेवर दावा सांगताना समर्थनाची ही पत्र महत्वाची ठरु शकतील, हे लक्षात आल्यानेच ही मोहीम राबवली जात असून प्रतिज्ञापत्राचे हे शक्तीप्रदर्शन ठाणे जिल्ह्यातून सुरु करण्यात आले आहे.