सातारा : राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांनी सुरू केली आणि रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले. यामुळे साताऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा उत्साह दिसून आला. साताऱ्यात नेतेमंडळी एकत्र येण्यापूर्वी कार्यकर्त मात्र एकत्र आल्याचे दिसून आले.आमची विचारधारा एकच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात. त्याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असे मत पुणे येथे व्यक्त केल्यानंतर शरद पवार साताऱ्यात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकत्र आलेल्या पवार कुटुंबीयांनी मात्र सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. साताऱ्यात आलेल्या शरद पवार यांच्या स्वागताला मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित गर्दी केली होती.

प्रत्येक वेळी शरद पवार साताऱ्यात आल्यानंतर पत्रकारांशी बोलत असतात. मात्र या वेळी त्यांनी बोलणे टाळले. अजित पवार यांनीही माध्यमांना टाळले. सुप्रिया सुळे यांना शरद पवार एकत्र येण्याबाबत बोलल्याबाबत विचारले असता, त्यांनी मला ते असं काही बोलल्याचे माहीतच नाही ,असे सांगितले. मीही कुठे वाचले नाही. मी माहिती घेते आणि नंतर तुमच्या सगळ्यांशी बोलते असे बोलून त्या मकरंद पाटील यांच्याबरोबर निघून गेल्या. सकाळी कार्यक्रम स्थळी शरद पवारांच्या स्वागतासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र उभे होते. पण सर्वांसमोर ते एकमेकांशी काही बोलले नाहीत.साताऱ्यात मात्र शरद पवार व अजित पवार एकत्रीकरणाविषयी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार काय याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये व माध्यमांना होती. नेहमी स्पष्ट बोलणारे अजित पवार यावेळी काय बोलणार याकडे लक्ष देऊन होते. मात्र कार्यक्रम संपतात अजित पवार निघून गेले.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आजही समजला जातो. दोन्ही नेते वेगवेगळे झाल्याने साताऱ्यात भाजपाने त्याचा फायदा उचलला. दोन्ही नेते वेगवेगळे झाले असतील तरीही कार्यकर्ते वेगवेगळे झालेले नाहीत. अनेकदा सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी नियमित संपर्क ठेवून होते. त्यांच्यात दुरावा आलेला नव्हता. साताऱ्यातील कार्यकर्त्यांची फळी मात्र एकत्री करणाच्या बाजूने आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकत्र साताऱ्यात येणार आहेत असे समजतात कार्यकर्त्यांनी मात्र एकत्रपणे त्यांचे स्वागत केले. जिल्हाभरातील कार्यकर्ते दिवसभर साताऱ्यात थांबून होते आणि नेते एकत्र यायच्या आधीच कार्यकर्तेच एकत्र आल्याचे दिसून आले.

सुप्रिया सुळे मकरंद पाटील शशिकांत शिंदे खूप वेळ एकत्र होते. त्यांच्यामध्येही काहीतरी माहितीची देवाण-घेवाण आणि चर्चा सुरू होती. आपल्या मोबाईल मध्ये आलेले काही सुप्रिया सुळे मकरंद पाटील यांना दाखवत होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आणि शरद पवार आजच साताऱ्यामध्ये काही घोषणा करतात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या एकत्र येण्याच्या तीव्र भावना आहेत. त्यानुसार राज्यातील दोन्ही पक्षांची नेते मंडळी एकत्र बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.-सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र येण्याविषयी सकारात्मकता दर्शविली आहे. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी आमची भावना आहे.-बाळासाहेब सोळस्कर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)