मोहन अटाळकर

वाडेगाव ( जि. अकोला) : भारत जोडो यात्रेच्‍या ७१ व्‍या दिवशी अभिनेत्री रिया सेन, स्‍वातंत्र्य सैनिक लीला चितळे, नर्मदा बचाव आंदोलनाच्‍या प्रणेत्‍या मेधा पाटकर यांच्‍यासह विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी सहभाग घेऊन यात्रेत वेगळा रंग भरला. पहाटेपासून लोकांची अलोट गर्दी पातूर ते वाडेगाव या मार्गावर दिसली.

हेही वाचा >>>राहुल गांधींच्या मेडशी इथल्या सभेत काही सेकंद नेपाळचे राष्‍ट्रगीत वाजल्‍याने गोंधळ

आम्‍हाला ‘तुकडे गँग’ म्‍हणणारेच आता देशाचे तुकडे करायला निघाले आहेत. देशात धार्मिक आधारावर राजकारण करून धर्म, पंथ आणि समाजामध्‍ये विषमता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केंद्र सरकार करीत असल्‍याची टीका मेधा पाटकर यांनी केली. मेधा पाटकर या त्‍यांच्‍या सहका-यांसह गुरुवारी पातूर येथून राहुल गांधी यांच्‍या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्‍या. यावेळी त्‍यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. देशात विषमता निर्माण करण्‍याचे काम केंद्र सरकार करीत आहे. विषमता दूर करण्‍यासाठी भारताचे संविधान वाचविण्‍यासाठी आणि ही यात्रा भारताला जोडणारी असल्‍याने आपण या यात्रेत सहभागी झाल्‍याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मतदारांची माहिती गोळा करणाऱ्या खाजगी कंपनीवरुन वाद, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

मेधा पाटकर यांच्‍या समवेत नंदुरबार जिल्‍ह्यातील सरदार सरोवर प्रकल्‍पामुळे विस्‍थापित झालेल्‍या शेतकरी, आदिवासींनीही या यात्रेत सहभाग नोंदवून आपल्‍या मागण्‍या मांडल्‍या. काँग्रेस नेते मिलिंद देवरा, आमदार प्रणिती शिंदे या देखील गुरुवारी पदयात्रेत सहभागी झाल्‍या होत्‍या.पदयात्रेदरम्‍यान, तुलंगा येथील साहेबराव तायडे यांनी २६ राज्‍यांमधील दगड एकत्र करून त्‍याला दिलेला भारताचा आकार यात्रेकरूंसाठी लक्षवेधी ठरला. हे समता शिल्‍प प्रदर्शन पाहण्‍यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती.एका पायाने अधू असलेले गिर्यारोहक अशोक मुन्‍ने हे देखील पातूर येथून यात्रेत सहभागी झाले. अशोक मुन्‍ने हे अपंग असूनही त्‍यांनी २०१६ मध्‍ये एव्‍हरेस्‍ट शिखर सर केले होते.

हेही वाचा >>>साताऱ्यात दोन्ही राजांनी एकत्र येण्याची भाजपची सूचना; पालिका निवडणूक पक्षचिन्हावर लढविण्यास पक्ष ठाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा लोकांनी पदयात्रा पाहण्‍यासाठी गर्दी केली होती. बाभुळगाव येथे यात्रेकरूंसाठी बुलढाणा अर्बन बँकेचे अध्‍यक्ष राधेश्‍याम चांडक यांच्‍या वतीने एका स्‍टॉल लावण्यात आला. काही गावक-यांनी पोलीस आणि यात्रेकरूंना आपल्‍या घराच्‍या आवरातील पेरू खाण्‍यास दिले. बाभूळगाव येथे काही वेळ पदयात्रा थांबली, तेव्‍हा वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. यात्रेत पोहचण्‍यासाठी अनेक जण पर्यायी मार्गाने पोहचले.