ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने जळगाव जिल्ह्यात त्यामुळे आता भाजपचे तीन खासदार झाले आहेत. पूर्वीपासून पुरोगामी विचारसरणी असलेल्या निकम परिवाराचे मूळ गाव चोपडा तालुक्यातील माचला. त्याठिकाणी निकम परिवाराची सुमारे २०० एकर शेती आहे. बॅरिस्टर देवराव निकम हे जळगाव जिल्ह्यातील एक नामवंत सहकार नेते आणि शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांच्याच पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यावेळी सहकार प्रशिक्षण केंद्रांची स्थापना झाली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली होती. याशिवाय, १९६२ ते १९६७ कालावधीत ते चोपडा तालुक्याचे आमदार होते.
बॅरिस्टर निकम यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीप निकम यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या पत्नी शैलजा निकम यांनीही जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मार्केटिंगचे अध्यक्षपद, कृभकोच्या संचालकपदावर काम केले. आताही त्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक आहेत.
रोहित दिलीप निकम यांच्या रूपाने बॅरिस्टर निकम यांची तिसरी पिढी नुकतीच सहकार क्षेत्रात सक्रीय झाली असून ते राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष तसेच कॉटन फेडरेशन आणि जिल्हा दूध संघाच्या संचालक पदावर सध्या कार्यरत आहेत. विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांनीही वडील बॅरिस्टर निकम यांचा वकिलीचा वारसा समर्थपणे चालविला. त्यांच्या पत्नी ज्योती निकम गृहिणी असून, पुत्र अनिकेत निकम हे मुंबई उच्च नायालयातील नामांकित वकील आहेत.
ॲड. उज्ज्वल निकम यांनी देश-विदेशात गाजलेल्या बऱ्याच न्यायालयीन खटल्यात सरकारी वकील म्हणून काम केले. ॲड. निकम यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने काही वर्षांपूर्वी त्यांना गळ घातली होती. परंतु, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला दाद दिली नव्हती. मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांना उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी दिली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ॲड. निकम पुन्हा वकिलीच्या व्यवसायात रमले. त्यानंतर आता थेट राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांचा राजकीय डाव पुन्हा सुरु झाला आहे.