अहिल्यानगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबरोबर शिवसेना (शिंदे गट) हा तिसरा पक्ष एकत्र असेल का, याबद्दल शहरात संभ्रमावस्था दिसत आहेत. भाजप व राष्ट्रवादी यांची एकमेकांशी नाळ जुळलेली आहे, तशी ती या दोन्ही पक्षांची शिंदे गटाशी जुळलेली दिसत नाही. याला कारणेही तशीच आहेत. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेली वक्तव्ये या संभ्रमावस्थेत भर टाकणारी आहेत. केवळ नगर महापालिकाच नाही तर जिल्ह्यातील बारा नगरपंचायती व नगरपरिषदांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत, तेथेही कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.

नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकीपेक्षा नगर शहरातील महापालिका निवडणुकीला वेगळी पार्श्वभूमी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) संग्राम जगताप यांचा विजय झाला. या दोन्ही निवडणुकांमध्ये विखे व जगताप यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून प्रचारात सक्रिय होता. महापालिकेत एकत्रित शिवसेना सर्वाधिक संख्याबळ असणारी होती. निवडणुकीनंतर ठाकरे गटातील बहुसंख्य माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. काही अपवादात्मक भाजप व राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी विरोधात सक्रिय असणारा ठाकरे गट शिंदे गटात सहभागी झाल्याने नगर शहरात संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते आहे. शहरात विखे व जगताप यांचे बहुसंख्य कार्यक्रम एकत्रित होतात. या कार्यक्रमात शिंदे गट फारसा सहभागी होताना दिसत नाही. विखे गटाशी संलग्न असलेले शिंदे गटातील काही अपवादात्मक पदाधिकारीच सहभागी असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी कधीच या कार्यक्रमात सहभागी झालेले आढळले नाहीत. भाजपमधील विखे गट व शिंदे गटात अलिकडे सहभागी झालेला ठाकरे गटात वितुष्ट उघड जाणवत असले तरी दुसरीकडे भाजपमधील निष्ठावंतांचा गट मात्र सख्य ठेवून आहे. हा एक विरोधाभास समोर आला आहे.

नगर शहरात मी (भाजप) व संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) समन्वयाने काम करतो, शिंदे गटाशी संपर्क नाही किंवा जे पूर्वी ठाकरे गटात होते व आता शिंदे गटात आले आहेत, त्यांचाही माझ्याशी संपर्क झालेला नाही, असे वक्तव्य सुजय विखे यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य शिंदे गटाशी निर्माण झालेल्या दरीकडे लक्ष वेधणारे आहे. नगर व श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाशी चर्चा करायची कोणाशी, याची अडचण जाणवते. मी शब्द एकाला द्यायचा आणि त्यांनी एबी फॉर्म दुसऱ्यालाच दिला तर कसे चालणार, असाही प्रश्न विखे यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाचे जिल्ह्यात अमोल खताळ (संगमनेर) व विठ्ठलराव लंघे (नेवासा) हे दोन आमदार आहेत, मात्र तेथे विखे यांना नगर व श्रीरामपूरसारखी अडचण जाणवणारी नाही. कारण या दोन्ही ठिकाणचे आमदार विखे यांच्याशी नाळ जुळलेले आहेत. तशी परिस्थिती नगर व श्रीरामपूरमध्ये नाही. नगरमध्ये शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक हे लोकसभेच्या निवडणुकीवेळी विखे यांच्या विरोधात काम केलेले आहेत तर श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाचे अनेकजण विखे यांच्या विरोधात भूमिका घेणारे आहेत. त्यातूनच महायुतीमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली जाणवते.