भाजपा मुस्लिमांना तिकीट देत नाही. दुसरीकडे मुस्लिमांना सतावणाऱ्या समस्यांबाबत इंडिया आघाडीही मौन बाळगते. त्यामुळे मुस्लीम सध्या राजकीयदृष्ट्या अदृश्य झाले आहेत, असे मत असदुद्दीन ओवैसी यांनी मांडले आहे. विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करून, भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचं काम इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलीमीन (AIMIM) पक्ष करतो, हा त्यांच्यावर वारंवार होणारा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी फेटाळून लावला. याउलट त्यांनी असा दावा केला आहे की, धर्मनिरपेक्ष पक्षांना मुस्लीम नेते हे त्यांचे गुलाम व्हायला हवे आहेत.

‘द प्रिंट’शी बोलताना ओवैसी यांनी हे वक्तव्य केले आहे. एआयएमआयएम पक्षाने या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी पक्ष, अपना दल (कमेरावाडी) आणि इतर अनेक लहान-सहान पक्ष जसे की, बाबू राम पाल यांचा राष्ट्र उदय पक्षाने (RUP) आणि प्रेम चंद बिंद यांच्या प्रगतिशील पक्षाबरोबर युती केली आहे. इंडिया आघाडी ‘वंचित असलेल्या पीडीए’साठी भूमिका घेते हा मोठा विनोद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘पीडीए’ म्हणजे पिछडे (मागास), दलित व अल्पसंख्याक होय. एआयएमआयएमच्या नेतृत्वाखालील ‘पीडीएम न्याय मोर्चा’ या तिन्ही घटकांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा करतो.

“त्यांनी पीडीए हे नाव गंभीरपणे दिलेले नाही. तुम्ही एकाही मुस्लिमाला राज्यसभेचे तिकीट का नाही दिले, तुम्हाला कुणी अडवले होते,” असे प्रश्नही त्यांनी विचारले. ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओवैसी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

‘मुस्लीम हे राजकीयदृष्ट्या अदृश्य’

ओवैसी म्हणाले, “भाजपा मुस्लिमांना तिकीट देत नाही. दुसरीकडे मुस्लिमांना सतावणाऱ्या समस्यांबाबत इंडिया आघाडीही मौन बाळगते. त्यामुळे मुस्लीम सध्या राजकीयदृष्ट्या अदृश्य झाले आहेत. विरोधी पक्ष मुस्लिमांसाठी काहीही करीत नाही. तसेच त्यांना नेतृत्व करताना पाहायचीही त्यांची इच्छा नाही.

याबाबत त्यांनी समाजवादी पक्षाचे उदाहरण दिले. सपाने मोरादाबादचे खासदार एस. टी. हसन यांना तिकीट दिलेले नाही. ते म्हणाले, “ही कृती म्हणजे एखाद्याला सार्वजनिकरीत्या अपमानित करण्यासारखं आहे. तुम्ही तमाशा उभा केला आहे. आम्हीच मुस्लिमांचे ‘चौधरी’ (तारणहार) आहोत, असे दाखवण्यासारखीच ही कृती आहे.”

हेही वाचा : ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?

‘विरोधक शांतपणे पाहत बसतात’

ते पुढे म्हणाले, “जर एखाद्याचं घर बुलडोझरनं पाडलं जात असेल, तर विरोधक शांतपणे बसून राहतात. एखाद्याला गोळी घातली तरीही त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया नसते. एखाद्याला मांस खाण्यावरून मारलं जात असेल तरीही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नसतो. एस. टी. हसन यांना मोरादाबादमधून उमेदवारी न देण्याच्या निर्णयानंतर तर सगळ्याच मर्यादा पार करण्यात आलेल्या आहेत.”

‘मुस्लीम मतांच्या विभाजनाचा ठपका काँग्रेस-बसपावर का नाही?’

२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाला काहीच मिळवता आलेलं नसतानाही ‘मुस्लिमांच्या मतांचं विभाजन’ करण्याचा ठपका त्यांच्यावर कधीच ठेवण्यात आला नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या; तर बसपाला एकच जागा मिळवता आली. “त्यामागचं कारण म्हणजे एआयएमआयएम हा पक्ष मुस्लिमांच्या सबलीकरणाबाबत बोलत राहतो”, असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी असेही स्पष्ट केले की, भाजपाला हरवणं हेच एआयएमआयएमचे उद्दिष्ट आहे. विशेषत: पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये! १९८४ पासूनच भाजपा हा पक्षाचा मुख्य विरोधक राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘यालासुद्धा मीच जबाबदार का?’

ते म्हणाले, “अल्लाहच्या कृपेने यावेळीसुद्धा आम्ही भाजपाला पराभूत करू शकू, यात काहीच शंका नाही.” आपल्या टीकाकारांना प्रश्न विचारत ते म्हणाले की, मोठ्या विरोधी पक्षांना भाजपाला रोखण्यात अपयश आलेले असले तरी एआयएमआयएमवर सतत लक्ष ठेवले जाते आणि त्यांचीच छाननी केली जाते. “नरेंद्र मोदींना २०१४ मध्ये बहुसंख्य समुदायाची ३१ टक्के मतं मिळाली; २०१९ मध्ये ती ३७ टक्क्यांवर गेली. याला मी जबाबदार आहे का? १९८४ पासून गुजरातमध्ये एकही मुस्लीम खासदार होऊ शकला नाही. याला कोण जबाबदार आहे? भारतीय संसदेमध्ये फक्त २७ मुस्लीम खासदार निवडून जाऊ शकले आहेत. हे एकूण लोकसंख्येच्या फक्त चार टक्के इतके प्रमाण आहे. यालासुद्धा तुम्ही मलाच जबाबदार धरणार आहात का,” असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

हेही वाचा : ‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा

‘काँग्रेससोबत सध्या तरी युती नाही’
गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेस पक्षाने राज्यात विजय मिळविल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांची त्यांनी भेट घेतली होती. या भेटीमुळे एआयएमआयएम पक्षासोबत काँग्रेसच्या संभाव्य युतीचा अंदाज बांधला गेला. मात्र, ही अभिनंदन करण्यासाठी घेतलेली भेट होती, असे ते म्हणाले. “जेव्हा निकाल आले आणि तेलंगणाच्या लोकांनी त्यांना कौल दिला, तेव्हा मी त्यांचं अभिनंदन केलं आणि तेही माझ्याशी बोलले. हैदराबादमध्ये काही काम करायची गरज आहे का, असं त्यांनी मला विचारलं. तेव्हा मी म्हणालो की, खूप काही करायचं आहे.”

“सध्या तरी नाही”, असे म्हणत त्यांनी काँग्रेससोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य केले. “तेलंगणाच्या इतर १६ मतदारसंघांचा विचार करता, इथे भाजपाला रोखण्याचाच पूर्णपणे प्रयत्न केला जाईल”, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशबाबत बोलताना ते म्हणाले की, पीडीएम (मागास, दलित व मुस्लीम)ची अपना दल (के) आणि इतरांसोबतची युती २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक मजबूत पर्याय देऊ करील. त्यांनी ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि दलित नेते व भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनाही युतीमध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. “आम्ही त्यांचे स्वागतच करू. काय होते ते पाहू या. जर ते आमच्यासोबत आले, तर नरेंद्र मोदी, एनडीए आणि इंडिया आघाडीविरोधात एक चांगला संदेशही जाईल”, असे त्यांनी सांगितले.