मणिपूर या ईशान्येकडील राज्यात वर्षभरापासून जातीय संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. कुकी आणि मैतेई वाद अजूनही मिटलेला नाही. निवडणुकीच्या वातावरणावरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. देशात सर्वत्र राजकीय सभा, रोड शोचा धडाका सुरू असताना मणिपूरमधील चित्र मात्र वेगळे आहे.

मणिपूरमधील निवडणुकीतील सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे मणिपूरमधील स्थिती बघता, इथे प्रचारासाठी राजकीय सभांना अघोषित बंदी घालण्यात आली आहे. परिसरात निवडणुकीला उभ्या असणार्‍या उमेदवारांची राजकीय पोस्टर्सदेखील लावण्यात आलेली नाहीत. परिसरात निर्माण होणार्‍या सततच्या तणावामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रचार अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सूक्ष्म पातळीवर केला जात आहे.

मणिपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार

मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. एक अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ. अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर मैतेई समाजाचे प्राबल्य आहे. उमेदवारांमध्ये भाजपाकडून राज्याचे कॅबिनेट मंत्री व माजी आयपीएस अधिकारी थौनाओजम बसंता सिंह उभे आहेत; तर काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक बिमोल अकोइजम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून माहेश्वर थौनाओजम व मणिपूर पीपल्स पार्टीकडून आर. के. सोमेंद्र यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते दोघेही मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

हेही वाचा : मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?

परंतु, मणिपूरमध्ये कोणत्याही प्रचार सभा, सार्वजनिक भाषणे व पोस्टर्स यांना जवळजवळ बंदीच आहे. या भागात प्रचाराविरुद्ध स्पष्टपणे नापसंती असल्याचे दिसून येत आहे. सशस्त्र कट्टरपंथी गट आरामबाई तेंगगोल यांनी जारी केलेल्या आदेशातही निवडणूक प्रचार, लाऊडस्पीकर वापरून घेण्यात येणार्‍या सभा, ध्वजारोहण यावर नापसंती दिसली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते; ज्यामुळे आपल्या समुदायामध्ये अधिक फूट निर्माण होऊ शकते.

मणिपूर या ईशान्येकडील राज्यात वर्षभरापासून जातीय संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

राजकीय कार्यक्रम नाहीच

निवडणूक उमेदवार प्रामुख्याने ‘इन-कॅमेरा’ बैठकीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामध्ये स्थानिक नेत्यांच्या घरी किंवा खासगी कार्यालयात २० ते ५० लोकांचा समावेश असतो. उमेदवारही विविध भागांत कुलदैवतांची पूजा करून, आपली उपस्थिती दर्शवीत आहेत. भाजपाने घरोघरी बैठका घेण्यासाठी पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

राज्य भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “सामान्यत: पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री हजारो लोकांसह मोठ्या सभा काढतात. आत, इन-कॅमेरा बैठकींसह आम्ही बूथस्तरीय कार्यकर्त्यांद्वारे घरोघरी प्रचार करीत आहोत. आमच्याकडे येथे राष्ट्रीय नेते नाहीत…,” असे ते म्हणाले. ” जर राष्ट्रीय नेते राज्यात प्रचारासाठी आले, तर त्यामुळे लोकांना असे म्हणण्याची संधी मिळेल की ते संघर्षाच्या वेळी आले नाहीत आणि आता मतांसाठी आले आहेत”, असे ते पुढे म्हणाले.

काही उमेदवार, विशेषत: बिमोल अकोइजम व माहेश्वर यांनी सध्या सुरू असलेल्या संघर्षावर आपापली मते मांडली आहेत. अनेक मतदारांसाठी त्यांच्या उमेदवारांचे मत जाणून घेण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया हे एकमेव माध्यम आहे.

पाटसोई येथील एक मतदार म्हणाला, “खरे तर, मी लोकसभा निवडणुकीची कधीच पर्वा केली नाही. विधानसभा निवडणुकीची नेहमीच जास्त उत्सुकता असते. मात्र, यावेळी शांतपणे का होईना सर्व जण त्यावर चर्चा करीत आहेत. आमच्या परिसरात एकही उमेदवार आलेला नाही; पण हा संघर्ष सुरू झाल्यानंतर लोक केवळ स्थानिक माध्यमांनाच नव्हे, तर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आणि विशेषतः सोशल मीडियालाही जवळून फॉलो करीत आहेत. त्यामुळे बिमोल आणि माहेश्वर काय बोलत आहेत, हे मी अनेक महिन्यांपासून ऐकत होतो.”

मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ्या संख्येने महिला जमल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी दुपारी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करीत काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने गैरवर्तनाचे आरोप बाजूला सारून असा दावा केला, “मुख्यमंत्री केवळ सद्य:स्थिती आणि सरकारच्या प्रयत्नांचा आढावा घेत आहेत”.

हेही वाचा : मणिपूरमध्ये मंत्री आणि आमदारांनाही उपस्थित राहण्याचा दबाव निर्माण करणारा मैतेई समाजाचा ‘तो’ कट्टरपंथी गट नेमका कोणता?

गेल्या वर्षीच्या अनुभवावरून तेथील स्थानिक मतदार इबेयामा युम्नम म्हणाल्या की, ते आता मदत शिबिरं उभारून, लोकांना खायला देत आहेत. ते त्यांच कर्तव्य आहे. परंतु, मतदान संपल्यानंतर ते आम्हाला विसरतील. त्यामुळे यंदा त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मणिपूरमधील प्रसिद्ध गायक लैशराम मेमा म्हणाल्या, “माझे भावनिक आवाहन आहे. कोणताही उपाय दिसत नसताना निवडणुका घेण्याचा आग्रह धरणं म्हणजे इथल्या लोकांच्या अडचणींना कमी लेखण्यासारखं आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “जेव्हा लोक ‘डबल-इंजिन’सारख्या गोष्टी बोलतात, तेव्हा ते या लोकांचा अपमान करतात.”