Ajit Pawar IPS officer call Controversy राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा ते विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र, सध्या अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदा उत्खननावर कारवाई करीत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, या व्हिडीओवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांनी अजित पवारांना कसे घेरले? या व्हिडीओची इतकी चर्चा का होत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…

अजित पवार महिला अधिकाऱ्याला काय म्हणाले?

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कारवाई थांबण्याच्या सूचना द्याव्यात यासाठी अजित पवार यांना फोन केला होता. महिला पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना अजित पवार म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय. मी तुम्हाला कारवाई थांबण्याचे आदेश देतो. तहसीलदारांना सांगा की, अजित पवार यांचा फोन आला होता. मला उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई थांबण्यास सांगितले आहे.” त्यावर प्रत्युत्तर देत महिला अधिकारी म्हणाल्या,”सर, तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा.” यावेळी अजित पवार महिला अधिकाऱ्यावर संतापल्याचे दिसून आले. ते म्हणाले, “मी तुमच्यावर कारवाई करेन. तुम्ही मला सांगत आहात की, थेट कॉल करा. तुमचा नंबर द्या मी कॉल करतो.” या संभाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विरोधकांचा अजित पवारांवर संताप

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या, “महिला अधिकारी आपले काम करीत होत्या; तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? तुझे डेअरिंग कसे झाले, असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? त्याबद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे.”

संजय राऊतांनी केली राजीनाम्याची मागणी

संजय राऊत म्हणाले, “शिंदे, पवार यांच्याकडे असणारे लोक सगळे चोर, डाकू, स्मगलर आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. मावळमध्ये बेकायदा खाणकाम सुरू आहे. सुनील शेळके यांनी सरकारला कोट्यवधींचा चुना लावला आहे आणि अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत.” अजित पवार यांची नक्कल करीत संजय राऊत यांनी पुढे प्रश्न केला, “एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही दम देता, तेसुद्धा तुमच्या पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी. तुमची शिस्त कुठे गेली.” ते म्हणाले, “बेकायदा मुरुमाचे प्रकरण म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणे आहे. हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. या राज्याचा उपमुख्यमंत्री आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदा पाठिंबा द्या, असे सांगत आहे.” त्यांनी अजित पवारांचा उल्लेख ‘चोरांचे सरदार’ म्हणूनही केले.

सुषमा अंधारेंची टीका

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अधिकाऱ्यांना झापणे, पदाचा रुबाब दाखवणे, कधीकधी शिवीगाळ करणे, याबाबतच्या बातम्या आत्तापर्यंत फक्त संजय शिरसाट, संजय गायकवाड, अनिल बोंडे, गीता जैन, संतोष बांगर , अमित साटम, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, व्हाग बाई यांच्याबाबत येत होत्या. पण असे का होते त्याचा उलगडा आज झाला. सरकारच गुंडांना अभय देणारे असेल तर त्यात सामील असणाऱ्या मंत्री किंवा आमदारांकडून अपेक्षा वेगळी ती काय करायची?,” असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “महिला डिएसपीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवरून गुंडांना सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. खरंतर अशा धाडसी पोलीस अधिकाऱ्याचे आपण कौतुक करायला हवे. महिला पोलीस अधिकारीने फक्त फोन कॉलवर कुणाला का सोडावे हा साधा प्रश्न आहे? ज्याच्या संदर्भात कॉल केलेला आहे तो कोणी सद्गुनी संत महापुरुष नाही. समजा एका फोन कॉलवर सोडून दिले. पण उद्या जर लक्षात आले की असा कुठलाही कॉल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलाच नव्हता तर मग, पोलीस अधिकाऱ्याला दिवसा ढवळ्या गुंडांनी चुना लावला याच्या बातम्यांची रंगतदार चर्चा वाढेल. पण महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नोकरीवर संकट येईल त्याची जबाबदारी कोण घेणार,” असा प्रश्न त्यांनी केला. “CM म्हणजे कॉमन मॅन, DCM म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन,असे जाहिरातीमध्ये सांगणारे सरकार DCM म्हणजे डिफॉल्टर केस मॅनेजमेंट असं काही वास्तवात आहे का?,” असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने या व्हायरल व्हिडीओबाबत काय म्हटले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे म्हणाले की, हा व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला आहे. त्यांनी असा दावा केला की, अजित पवार यांचा कारवाई थांबवण्याचा हेतू नव्हता; परंतु पक्षकार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्याला फटकारले असावे. “अजितदादांनी पक्षकार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्याला फटकारले असावे. त्यांचा हेतू कारवाई पूर्णपणे थांबवण्याचा नव्हता,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. त्या व्हिडीओमध्ये खोडसाळपणे डीवायएसपी अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्द्लची चुकीची बातमी चालवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील सर्व शेतकरी तहसीलदारांच्या कारवाईविरोधात एकत्र आले होते. त्यावेळी अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि जर आयपीएस अधिकारी जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोण, असा प्रश्न विचारत असतील, तर तेदेखील चुकीचे आहे.” ते पुढे म्हणाले, “लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज आणि त्या शेतकऱ्यांची बाजूदेखील ऐकणं हे जनतेनं निवडून आणलेल्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे.”