पुणे : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीसाठी भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सवगड्यांना १६५ जागांवर तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपकडूनही इच्छुकांशी बोलणी सुरू झाल्याने महापालिकेत महायुतीची शक्यता मावळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे ‘मिशन १६५’साठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून जुळवाजुळव करण्यास वेग आला आहे. अजित पवार यांच्या पुण्यातील शिलेदारांकडून भाजपमधील नाराजांच्या गुप्त गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणानंतर अजित पवार यांना विरोधी पक्ष लक्ष्य करत असतानाही पवार यांनी गेल्या शनिवारी दिवसभर शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती घेत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतला. पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे गेल्या महिन्यात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. भाजपकडून महायुती म्हणून लढण्यास प्रतिसाद मिळण्याच्या प्रतीक्षेत अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ आहे. गेल्या शनिवारी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

भाजपकडून स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने इच्छुकांशी बोलणी सुरू केली आहे. शिवाय भाजपने ‘मिशन १२५’चा नारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेत युतीची शक्यता मावळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या पुण्यातील सवंगड्यांना महापालिकेतील सर्व १६५ जागांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले असल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अजित पवार यांनी स्वबळावर लढण्याबाबतचे संकेतही दिले आहेत. महाविकास आघाडीत असताना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढत असत, ही बाबत पवार यांनी स्पष्ट केली आहे.

पुणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने ९७ आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. भाजपने १२५ नगरसेवकांचे लक्ष्य ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याच्यादृष्टीने ‘राष्ट्रवादी’ने हालचाली सुरू केल्या आहेत.

सध्या भाजपमध्ये विद्यमान नगरसेवकांबरोबरच प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. शिवाय अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मिळण्याच्या आशेवर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातून सध्या ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ असा भाजपमध्ये वाद सुरू आहे. ही संंधी साधत भाजपमधील नाराजांना हेरून त्यांच्या गाठीभेटी घेण्यास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. भाजपमधील काही इच्छुकांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसणार आहे. त्यांच्या संपर्कात राहण्याचीही व्यूहरचना अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने आखली आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीबाबत वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. स्वबळावर लढावे लागल्यास आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अन्य पक्षांतील काहीजण पक्षाच्या संपर्कात आहेत. कोणत्याही एकाच पक्षातील पदाधिकारी नसून ते सर्व पक्षांतील आहेत. तत्कालीन परिस्थिती पाहून याबाबत पक्षाच्या नेत्यांकडून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. – प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)