सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली असताना या जिल्ह्यातील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी भाजप अधिक सक्रिय झाला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपल्या तीन जागा राखण्यासाठी आटापिटा चालविला आहे. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे जन सन्मान यात्रा काढली खरी; परंतु तद्पश्चात ताब्यात असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेने नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>> वडगाव शेरीचा उमेदवार निश्चितीसाठी महायुतीचे पुन्हा सर्वेक्षण; इच्छुकांमध्ये धाकधूक

गेल्या सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्यात जनसन्मान यात्रा आणली होती. प्रामुख्याने ही जन सन्मान यात्रा त्यांच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन विधानसभा मतदारसंघात फिरली. या तिन्ही मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे मेळावे घेऊन संवाद साधला. मोहोळ आणि करमाळा तालुक्यात मिळून ६६७.२८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही घाई गडबडीत उरकले गेले. त्यांच्या जन सन्मान यात्रेला पक्षांतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले. अजित पवार यांचे स्वागत त्यांच्याच समर्थकांनी ‘मोहोळ बंद’ करून झाले. परिणामी, संतापलेल्या अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ‘मोहोळ बंद’ पाळून स्वागत करणाऱ्या संबंधित स्वकियांवर पक्ष शिस्तभंग केल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला.

दुसरीकडे माढ्याचे ज्येष्ठ आमदार, बडे साखर सम्राट बबनराव शिंदे यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बंधू असलेले करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे सुद्धा राजकीयदृष्ट्या द्विधामनोवस्थेत आहेत. ते अधिकच्या काळात कोणत्याही क्षणी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर व त्यांचे समर्थक, आमदार यशवंत माने हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. परंतु याच तालुक्यातील त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक असलेले पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली आहे. राजन पाटील यांच्या अनगर गावात काही महिन्यांपूर्वी मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द होण्यासाठी उमेश पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय संघर्ष समिती आंदोलन करीत आहे. त्यातून दोन्ही पाटलांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच मर्जीने राजन पाटील यांच्या गावी अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने ते पुन्हा रद्द होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संघर्ष समितीने अजित पवार हे ज्या दिवशी जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळ मध्ये दाखल झाले, त्याच दिवशी ‘ मोहोळ बंद ‘ पुकारला गेला.

हेही वाचा >>> तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेले जमीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंद पुकारून झालेल्या स्वागतामुळे अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी उमेश पाटील यांचा कडक शब्दात समाचार घेताना, बैलगाडीखालील कुत्र्याची उपमा दिली. आपण आणि पक्ष राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. या मोहोळमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत वाद आता चांगलाच उफाळला आहे. उमेश पाटील यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर करीत, मोहोळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांचा उमेदवार पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेण्याची मानसिकता उमेश पाटील यांनी बोलून दाखविली आहे. एकूणच, सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मोहोळ, माढा आणि करमाळा या तीन ठिकाणी आमदारांच्या रूपाने असलेली ताकद हातातून निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. यात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी महायुती अर्थात अजित पवार गटाचा विषय संपल्याचे जाहीर केल्यामुळे आणि तशीच धुसर शक्यता करमाळ्यातही दिसून येते.