अलिबाग- रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या होमग्राऊण्डवर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. महाड येथील चांदे क्रिडांगणावर मैदानावर पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून महाड मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी नुकताच मोजक्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम महाड येथे होईल असे प्रदेश कार्यालयाने जाहीर केले होते. त्यानुसार उद्या चांदे क्रिडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर स्नेहल जगताप शिवसेना ठाकरे गटात नाराज असून त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगीतले जात होते. प्रविण दरेकर यांच्याकडून त्यांच्याशी बोलणी सुरू होती. मात्र रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजकीय डावपेच खेळत स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्यास भाग पाडले.
राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाड हा भरत गोगावले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग चार वेळा ते या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. चारही वेळेस त्यांनी जगताप कुटूंबातील उमेदवारांचा पराभव केला आहे. जगताप कुटूंब हे गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशामुळे गोगावले यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबध ताणले गेले आहेत. शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदावर स्थगिती आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे पहायला मिळत आहे. यातून गोगावले यांची मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने अवलंबिले आहे. त्यामुळे भाजपच्या संपर्कात असलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गोगावले यांना शह देण्याची राजकीय खेळी तटकरेंनी खेळल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्ह्यात कर्जत आणि श्रीवर्धन या दोन विधानसभा मतदारसंघांचा अपवाद सोडला तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादीत होती. हीबाब लक्षात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्यातही शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा अधिकच डोळा असल्याचे सध्या पहायला मिळते आहे. कर्जत, अलिबाग आणि महाड या शिवसेनेच्या मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीच्या केंद्रस्थानी आले आहेत.