छत्रपती संभाजीनगर : ज्या जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ‘ घड्याळ’ चिन्हावर राष्ट्रवादी कॉग्रेसला लढवता आली नाही तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळावे म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच्या दौऱ्यानिमित्त शहरात अखेर अजित पवार गटाचे ढोल ताशे वाजले. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमा तरुण आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. मात्र, पत्रकारांसमाेर भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची कोंडी झाली.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असला तरी आपण शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराची कास सोडलेली नाही तसेच शरद पवार यांच्या विचारावरच हा पक्षही चालतो, असा दावा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पत्रकार बैठकीत केला. तेव्हा प्रश्न विचारला गेला, सतत सत्तेत असणाऱ्या या पक्षाला कोण जवळचे ? सत्तेतील कोणती उब चांगली वाटली ? तेव्हा तटकरे म्हणाले, ‘ १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले होतो. पण नंतर एकत्र राज्य चालविले. आता ‘ एनडीए’ मध्ये आहोत आणि आम्हाला सत्तेतील भाजपकडून नेहमीच सौहार्दाने वागवले जाते. वर्धापन दिनी बहुमताने बाहेर पडलेल्या सर्व सदस्यांनी ठराव घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचे ठरवले. तेव्हाही शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार सोडलेला नव्हता ’असे तटकरे यांनी यांनी स्पष्ट केले.

पुढे हाच धागा पकडून शरद पवार यांनी जनसुरक्षा कायद्याला केलेला विरोध आणि राष्ट्रवादीची शरद पवार यांच्या विचारावर अजित पवार गटाची श्रद्धा यावर प्रश्न विचारला आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची कोंडी झाली. जनसुरक्षा कायद्याचे वाचन विधिमंडळात झाल्याने तो मुद्दा योग्यच आहे, असे सांगत तटकरे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबतचे स्पष्टीकरण दिले आणि शरद पवार यांच्या भूमिकवर पुढचे भाष्य करण्याचे टाळले. जनसुरक्षा कायद्यास शरद पवार यांनी विरोध दर्शविला आहे. मग अजित पवार गट शरद पवार यांच्या विचारसरणीवर कसा बेतलेला , असा प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या विचारसरणीला फाटा मारणे किंवा प्रतारणा करण्यासारखे नाही का, असे विचारले असता ‘ तसे मी म्हणालो नाही,’ असे म्हणत तटकरे यांनी स्वत:ची कोंडीतून सुटका करुन घेतली.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये संयुक्त राष्ट्रवादी कॉग्रेसला कधी यश मिळाले नाही. अजित पवार गटाचे शहरातील पदाधिकारी अद्यापि ठरलेले नाहीत. ग्रामीण भागातील कार्यकारिणी लवकर करा, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणीसाठी निघालेल्या तटकरे यांची मराठवाड्यातील पहिल्या दौऱ्यातच भूमिका मांडताना कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप नेत्यांची वर्तणूक सौहार्दपूर्ण

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. तशी चर्चा करायची झाल्यास भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वास विचारावे लागेल, अशी भूमिकाही सुनील तटकरे यांनी जाहीरपणे मांडली. त्यांनी आम्हाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घेताना विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवे असे काही बदल करायचे झाल्यास भाजपच्या नेत्यांना विचारावे लागेल, अशी कबुली तटकरे यांनी दिली.