पुणे : पुणे महापालिकेची प्रारुप प्रभागरचना करताना अनेक ठिकाणी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला भाजपने कोंडीत पकडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पुण्यातील स्थानिक नेत्यांना सुनावत त्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे अजित पवार हे आणखी कोणते पाऊल उचलणार, याकडे भाजपच्या स्थनिक नेत्यांचे लक्ष लागले असून, अंतिम प्रभाग रचनेपूर्वी राज्याच्या पातळीवरून चक्रे फिरल्यास काही प्रभागांची रचना बदलण्याच्या शक्यतेने त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर हरकती आणि सूचना घेण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासाठी अडचणीची झाली आहे. याबाबत या पक्षाकडून हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सर्किट हाऊस येथे त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी भाजपने प्रभाग रचना तयार करताना प्रभाग तोडल्याच्या तक्रारी केल्या. ही बाब लक्षात घेऊन अजित पवार यांनी पुण्यातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी खुश झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी भाजपने शहरातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली होती. त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून भाजपच्यादृष्टीने सोयीचे होईल, असे प्रभाग तयार केले असल्याची तक्रार ‘राष्ट्रवादी’च्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली; तसेच ‘राष्ट्रवादी’साठी सोपे असलेले कोणकोणते प्रभाग तोडण्यात आले आहेत, याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली. त्यानंतर पवार यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून विचारणा केल्याचे सांगण्यात आले.

आता पवार हे प्रभाग रचना अंतिम होण्यापूर्वी राज्य पातळीवरून चक्रे फिरविण्याच्या शक्यतेने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

स्वबळावर निवडणुकांबाबत सावध भूमिका

‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आग्रह आहे. युती झाल्यास हक्काच्या प्रभागांमध्ये मित्रपक्षांना जागा द्याव्या लागतील, या शक्यतेने पदाधिकारी हे स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आग्रह धरत आहेत. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा आग्रह धरला. मात्र, अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली. ‘स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिलेला नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय जाहीर होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्येक प्रभागात लढण्याच्यादृष्टीने तयारीला लागा, असे संकेतही त्यांनी बैठकीत दिले.

‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असलेले प्रभाग तोडले गेले असल्यास त्या भागातील पदाधिकारी आणि इच्छुकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्या, अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.