दिगंबर शिंदे

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांना जवळ करीत कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पेठचे महाडिक बंधू, इस्लामपूरचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील आणि माजी मंत्री अण्णा डांगे यांच्याशी तर संधान बांधले आहेच, याचबरोबर भविष्यात जयंत पाटील विरोधातील शक्ती एकवटण्याचा श्रीगणेशा केला असल्याचे दिसते.

कोल्हापूरमधील उत्तरदायित्व सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रविवारी झाला. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापासून विभक्त होउन सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्याचे पडसाद प्रारंभीच्या काळात फारसे जिल्ह्यात उमटले नसले तरी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर बंद दाराआड नाराजी व्यक्त करणारी मंडळींना उपमुख्यमंत्री पवार यांच्या रूपाने नवा पर्याय उपलब्ध झाला. थोरल्या पवार साहेबापासून कोणीही बाजूला जाणार नाही अशी ग्वाही दिली जात असतानाच पक्षांतर्गत मात्र खदखद होतीच, ही खदखद आता बाहेर पडू लागली आहे. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी तातडीने अजितदादांचे नेतृत्व स्वीकारत महापालिका निवडणुकीत या गटाची धुरा आपणाकडेच राहील याची सोय करून ठेवली, तर विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे याच्यासह काही मंडळीही दादांच्या तंबूत डेरेदाखल झाली. आणखी काही मंडळी या वाटेवर आहेत, यामध्ये दोन माजी महापौरांचा समावेश आहे. यामुळे वरकरणी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाबूत वाटणारा गड आतून पोखरला जातो आहे हेही तितकेच सत्य. यातून आमदार पाटील यांची राजकीय वाटचाल अधिकाधिक अडचणीत कशी येईल याची तयारी आतापासूनच सुरू झाली असून जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे याचे परिणाम अधिक दृष्य स्वरूपात पाहण्यास मिळतील यात शंका नाही.

आणखी वाचा-राजस्थान : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका, ज्योती मिर्धा यांचा भाजपात प्रवेश!

वाळव्यात आमदार विरोधक एकत्र येत नाहीत हेच जयंत पाटील यांच्या निर्विवाद वर्चस्वाचे फलित आहे. आता मात्र माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील हे जरी भाजपमध्ये असले तरी हे बळ दादांच्या माध्यमातून आपल्या पाठीशी कसे राहील याची तजवीज रविवारी जयंत पाटील यांच्या कासेगावमधील भाजपच्या निशिकांत दादापाटील यांच्याकडून झालेल्या जंगी स्वागतातून पुढे आले. याचबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक या बंधूनी महाडिक संकुलात उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत करीत असतानाच राजकीय मोर्चेबांधणीवरही चर्चा केली. महाडिक बंधूना शिराळ्याबरोबरच वाळवा मतदार संघाचेही प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. यामुळे या दौर्‍यात राज्य पातळीवरूनही पाठबळ मिळविण्याचा प्रयत्न या दौर्‍यात झाला.

विट्यातील राष्ट्रवादीची अवस्था राज्य पातळीवरील राष्ट्रवादीप्रमाणेच झाली आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. केवळ सांगूनच नाही तर अजितदादांच्या दौर्‍यापुर्वी एक दिवस अगोदर इस्लामपूरच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर झालेल्या मोजयया वरिष्ठांच्या बैठकीला उपस्थित राहून आपण जयंत पाटील यांच्याच पाठीशी असल्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्यांचेच चिरंजीव माजी नगराध्यक्ष पाटील यांनी मात्र अजितदादांच्या स्वागतासाठी केदारवाडीत शक्तीप्रदर्शन करीत आमदारकीची मागणी कार्यकर्त्यांमार्फत पुढे रेटली.पिता एका गटात तर पुत्र एका गटात असे राजकारण सध्या दिसत असले तरी वैभव पाटील यांची निष्ठा दादांशी की साहेबांशी हेच कळायला मार्ग नाही. कारण दादांच्या स्वागताला जाण्यापुर्वी त्यांनी राजारामबापू यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कोणते आशीर्वाद मागितले हे येणारा काळच सांगणार आहे.

आणखी वाचा-जी-२०: शशी थरूर यांचे कौतुक, प्रियांका गांधींची टीका; भाजपाने दिले प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्ष बांधणीसाठी सांगलीची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. यामुळे ज्या मंडळींनी मूळ पक्षात असताना त्रास दिला त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार असे दिसत आहे. भाजपमध्ये दोन नंबरचे नेतृत्व म्हणून असलेले माजी मंत्री अण्णा डांगे यांना आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीत घेतले. त्यांचे पुत्र चिमण डांगे यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष पद दिले. मात्र, डांगे यांचे नेतृत्व राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे राहणार नाही याची दक्षताही घेतली. यामुळे त्यांचा राजकीय कोंडमारा होत होता. आता अजित पवार यांच्या रूपाने अण्णा डांगे यांना नवा पर्याय पुढे आल्याने त्यांनी कोल्हापुरात जाउन दादांशी संवाद साधला. यामुळे आमदार पाटील यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी सुरूंग पेरणी सुरू असल्याचे दिसत आहे. यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गटाची मोट बांधली गेली तर विशेष वाटणार नाही.