केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना नेहरूंच्या एका जुन्या भाषणाचा उल्लेख केला. लोकसभेत झालेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या चर्चेदरम्यान शहा यांनी असा आरोप केला की, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६२ मध्ये आकाशवाणीवरून आसामला ‘बाय बाय’, असे म्हटले होते. शहा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना उद्देशून म्हटले, “गोगोईजी बरंच काही बोलत आहेत; पण तुम्हाला माहीत आहे का की, नेहरूंनी आसामबाबत काय केलं होतं? त्यांनी आकाशवाणीवरून आसामला ‘बाय बाय’ केलं आणि त्याचं रेकॉर्डिंगही आहे.” नेहरूंनी १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान आकाशवाणीवर केलेल्या या भाषणावरून सध्या राजकारण तापलं आहे.
मार्च २०२४ मध्ये दी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी म्हटले होते, “पंतप्रधान नेहरूंनी १९६२ च्या युद्धाच्या वेळी आसामचा त्याग केला. तेव्हा त्यांनी म्हटले की, माझं हृदय आसामच्या जनतेसोबत आहे. त्याउलट पंतप्रधान मोदी यांनी या भागाला ‘अष्टलक्ष्मी’ आणि ‘भारताचं विकास इंजिन’, असे संबोधत कायम महत्त्व दिलं.”
नेहरू भाषणात नेमकं काय म्हणाले?
१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान नेहरूंनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी आकाशवाणीवरून देशाला संबोधित भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी भारताच्या पूर्वेकडील सीमांवरील परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले होते. त्यांनी सांगितले होते, की चीननं जोरदार आक्रमण केलं आहे आणि भारतीय सैन्याला काही ठिकाणी माघार घ्यावी लागली आहे. नेहरू म्हणाले होते, “भविष्यात आमच्यासमोर कठीण प्रसंग येणार आहेत. आपण त्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असले पाहिजे. मी आसाममधील जनतेला सांगू इच्छितो की जरी परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. माझं हृदय आसामच्या लोकांबरोबर आहे.”
नेहरूंनी कुठेही ‘बाय बाय आसाम’ असे शब्दश: म्हटले नव्हते. मात्र, त्यांच्या बोलण्यातून नेत्यांना असं वाटलं की, ते आसामबाबत नकारार्थी बोलत आहेत. याचाच उल्लेख शहांनी चर्चेदरम्यान केल्याने यावरूनच आता चर्चा आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
संसदेत १९६२च्या युद्धावर नेहरू काय म्हणाले होते?
भारत-चीन युद्धानंतर डिसेंबर १९६२ मध्ये संसदेत बोलताना नेहरूंनी सरकारची बाजू मांडली होती. त्यांनी मान्य केले की, चीनच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारत तयार नव्हता. मात्र, हा विश्वासघात होता. भारताने अनेक वर्षे शांतता राखण्याचा प्रयत्न केला; पण चीनने त्याचा गैरफायदा घेतला, असे नेहरूंनी सांगितले. “अक्साई चीनमध्ये गवताचं पातंही उगवत नाही” हे त्यांचं वाक्य होतं. नेहरूंनी एकदा संसदेत अक्साई चीनबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, तिथे गवताचं पातंही उगवत नाही. नेहरूंचं हे विधान आजवर कायम चर्चेत राहिलं आहे. अनेकांनी यावर टीका करताना नेहरूंनी या भागाला कमी महत्त्व दिलं, असं म्हटलं. मात्र, त्यांचा हेतू कदाचित त्या भागाच्या दुर्गम परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा होता.
नेहरूंचे भाषण
१९६२ चे युद्ध २० ऑक्टोबरपासून २१ नोव्हेंबरपर्यंत अवघ्या एका महिन्यासाठीच चालले. चीनने भारतावर दोन बाजूंनी आक्रमण केले. पश्चिमेकडे लडाखच्या परिसरात आणि पूर्वेकडे नेफामध्ये (आताचे अरुणाचल प्रदेश आणि आसामचा काही भाग). दोन्ही आघाड्यांवर चीनने वेगाने आणि निर्णायक विजय मिळवला होता. चीनने रणनीती आखत अत्यंत महत्त्वाचे तवांग क्षेत्र ताब्यात घेतले आणि पुढेही प्रगती केली. या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी हिंदी भाषेत देशाला संबोधित केले.
त्यावेळी नेहरूंचं विधान असं होतं, “या क्षणी संकट आसामवर आहे. आसामच्या दारात शत्रू उभा आहे आणि आसाम धोक्यात आहे. त्यामुळे माझं लक्ष आणि मन दोन्ही त्याकडे लागलेलं आहे. जे आसाममध्ये राहतात, त्यांच्या सहवेदनेत सोबत आहोत. कारण- त्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत. आपण त्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करू आणि करीत आहोत. पण, कितीही मदत केली तरी त्यांना या वेळेस त्रासापासून पूर्णपणे वाचवू शकणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे. आपला निर्धार ठाम आहे की, आपण ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवू, जोपर्यंत आसाम आणि संपूर्ण हिंदुस्तान शत्रूमुक्त होत नाही.”
नेहरूंच्या निवडक भाषणातला काही भाग
“उत्तर पूर्व सीमेच्या उत्तरेकडील भागात मोठ्या संख्येने चीनच्या सैन्याने कूच केली आणि आपल्याला वाळोंग, सोलारीज व बोंडिला इथेही पराभव स्वीकारावा लागला आहे. आपण तिथे परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी उत्तर भागातही लडाखमध्ये चुशूल परिसरात चीनकडून जोरदार हल्ले होत आहेत. आता जे घडले आहे, ते खूप गंभीर आणि दु:खदायक आहे आणि आपले मित्र आसाममध्ये काय अनुभवत असतील याची मला पू्र्ण जाणीव आहे. माझं मन त्यांच्यासोबत आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी मदत करू, असं मला त्यांना सांगायचं आहे. सध्या जे प्रयत्न सुरू आहेत, त्यात कदाचित आम्हाला लगेच यश मिळणार नाही. कारण- अनेक अडचणी आहेत आणि चीनचं सैन्यबळ खूप पटीने जास्त आहे. पण मी इथे आता एक शपथ घेतो की, हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत नेऊ आणि याचा शेवट भारताच्या विजयानेच होईल.”
या भाषणात स्पष्ट होते की, सरकार आसाममधून शत्रूला बाहेर काढणार आहे आणि जेव्हा पंतप्रधानांनी “माझं मन त्यांच्यासोबत आहे” असं म्हटलं, तेव्हा ते आसाममधील लोकांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांची जाणीव दर्शवत होते. जवाहरलाल नेहरू अभ्यास संस्थेचे माजी संचालक व समकालीन इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक आदित्य मुखर्जी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “नेहरूंचं १९६२ मधील आकाशवाणीवरचं भाषण आसामला राम राम करणं असं म्हणणं हे वस्तुनिष्ठतेला अनुसरून नाही. माझं मन त्यांच्यासोबत आहे या विधानाचा अर्थ आसामला सोडून देणं, असा काढणं अतिशय चुकीचं आहे. उलट संपूर्ण भाषणामधून नेहरूंचा भारतीय भूमीसाठी लढण्याचा ठाम निर्धार दिसून येतो. या भाषणात कुठेही शरणागतीचा सूर नाही, तर एक कठीण लढाई लढण्याची तयारी स्पष्ट होते.”
नेहरूंनी युद्धाबाबत इतरत्र केलेले विधान
नेहरूंनी १९६२ च्या युद्धादरम्यानही संसदेत अनेक वेळा भाषणं करून माहिती दिली आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्या सर्व भाषणांचा एक समान संदेश होता आणि तो म्हणजे शत्रूपुढे न झुकण्याचा निर्धार. याचं उदाहरण म्हणजे १९ नोव्हेंबर १९६२ रोजी संसदेत भारतीय सैन्याच्या पराभवाबाबत माहिती दिल्यानंतर नेहरू म्हणाले, “आपण काही पराभव अनुभवले आहेत हे मी मान्य करतो; पण त्यानंतरही आपण कोणत्याही प्रकारे हार मानणार नाही. आपण शत्रूविरूद्ध लढत राहू. कितीही वेळ लागो, शत्रूला देशाबाहेर हाकलल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.”
अक्साई चीनबाबतच्या विधानाचं स्पष्टीकरण
अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना असा आरोप केला की, नेहरूंनी संसदेत युद्धाबाबत दिलेल्या प्रतिक्रिया या गांभीर्याने दिलेल्या नव्हत्या आणि याचं उदाहरण म्हणजे नेहरूंचं अक्साई चीनबाबतचं विधान. नेहरूंचं हे विधान ऑगस्ट १९५९ मध्ये म्हणजेच भारत-चीन युद्ध होण्यापूर्वीच आहे. याबाबत त्यांनी संसदेत स्पष्टीकरणही दिलं होतं.
लडाखमधील चिनी घुसखोरीबद्दल बोलताना नेहरूंनी लोकसभेत सांगितले होते, “जेव्हा आम्हाला १९५८ मध्ये असे समजले की, लडाखच्या ईशान्य कोपऱ्यातील येचेंगवरून एक रस्ता बांधण्यात आलेला आहे. तेव्हा आम्हाला काहीशी चिंता वाटू लागली. आम्हाला मूळात माहितीच नव्हतं की, तो रस्ता कुठे आहे. माननीय सदस्यांनी विचारले की, आम्हाला यापूर्वी का समजले नाही. हा प्रश्न योग्य आहे; पण वस्तुस्थिती अशी आहे की, तो भाग अगदी निर्जन आहे. समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे प्रशासन नव्हते. तिथे कुणीही राहत नव्हते. हा असा प्रदेश आहे की, जिथे गवताचं पातंही उगवत नाही. तो सिनकियांगला लागून आहे.” त्यावर जसवंत सिंह म्हणाले होते, “पंतप्रधान थोड्याच वेळापूर्वी म्हणाले की, लडाखचा हा भाग अगदीच ओसाड आहे आणि तिथे गवताचं पातंही नाही. तरीही चीन या भागाला महत्त्व देत आहे आणि तिथे रस्ता बांधत आहे. जर चीन अशा ठिकाणाला इतकं महत्त्व देत आहे आणि हा प्रदेश वादग्रस्त असला तरी आपण त्याला महत्त्व का देत नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर नेहरूंनी उत्तर दिलं, “मी फक्त येचेंगच्या भागाबद्दल बोलत होतो; पूर्ण लडाखबद्दल नाही. कदाचित चीनला हा भाग महत्त्वाचा वाटतो. कारण हा मार्ग चीन तुर्केस्तानचा काही भाग गार्टोक-येचेंगला जोडला जोडतो.