बिहारच्या मिथिलामधील सीतामढीमधील पुनौरा धाम इथल्या माता जानकी मंदिराच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इथे उपस्थित होते. या ठिकाणाला देवी सीतेचे जन्मस्थान मानले जाते.
या सीता मंदिराचा विकास आणि नूतनीकरण हा राज्यातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. अमित शाह यांनी या प्रकल्पाची घोषणा यावर्षी मार्चमध्ये अहमदाबादमधील ‘शाश्वत मिथिला महोत्सव २०२५’ या कार्यक्रमात केली होती. अयोध्येतील राम मंदिराची भव्यता पाहता या प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्याचवेळी धार्मिक पर्यटनाच्या विकास प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला होता.

या प्रकल्पाचा आराखडा काय आहे?

नितीश सरकारचा सीतामढीमधील आराखडा तयार आहे. रामायण सर्किट हा स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत विकसित केलेला एक पर्यटनाचा मार्ग आहे. या योजनेअंतर्गत असलेले प्रकल्प राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या सल्ल्यानुसार निश्चित केले जातात. बिहार सरकारच्या आराखड्यात मंदिराभोवती परिक्रमा मार्ग, सीता वाटिका, लव-कुश वाटिका, शांती मंडप, कॅफेटेरिया आणि पार्किंग लॉट यांचा समावेश आहे. तसंच सीतेच्या जीवनावर आधारित थ्री-डी अॅनिमेशन चित्रपट तयार करण्याचाही प्रस्ताव आहे. हा प्रकल्प ११ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून राज्य पर्यटन विभाग राम-सीतेशी संबंधित अनेक धार्मिक स्थळांचे पुनर्विकास करण्याचे काम करणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार?

१ जुलै रोजी नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ८८२.८७ कोटींचा निधी मंजूर केला. यामध्ये १३७ कोटी सध्याच्या मंदिर आणि परिसराच्या नूतनीकरणासाठी, ७२८ कोटी पर्यटन संबंधित पायाभूत सुविधांसाठी आणि पुढील १० वर्षांच्या देखभालीसाठी १६ कोटींची तरतूद आहे. २९ जुलै रोजी झालेल्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६५.५७ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. ही मंदिर परिसराशेजारची अतिरिक्त ५० एकर जमीन अधिग्रहित करण्यासाठीची रक्कम आहे. ही अधिग्रहित जमीन पर्यटन सुविधा आणि पायाभूत विकासासाठी वापरली जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी बिहार स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करेल. याशिवाय २६ जून रोजी श्री जानकी जन्मभूमी पुनौरा धाम मंदिर न्यास समिती नावाची नऊ सदस्यीय ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. ही ट्रस्ट मंदिराच्या बांधकाम आणि व्यवस्थापनाची देखरेख करेल. या ट्रस्टचे अध्यक्ष मुख्य सचिव, विकास आयुक्त उपाध्यक्ष असतील. सीतामढीचे जिल्हाधिकारी आणि उपविकास आयुक्त हे सचिव आणि कोषाध्यक्ष असतील. ट्रस्टमध्ये पुनौरा धाम मठाचे महंत, तिरहुतचे विभागीय आयुक्त, पर्यटन, रस्ते बांधकाम, नागरी विकास आणि गृहनिर्माण विभागांचे अधिकारी यांचाही समावेश असेल. ट्रस्टचे बँक खाते सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चालवले जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीतामढीचे धार्मिक महत्त्व

पुनौरा धाम हे सीतेचे जन्मस्थळ असल्याचे मानले जाते. हे सीतामढी शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर आणि भारत-नेपाळ सीमेच्या जवळ स्थित आहे. बिहारसह इतर राज्यांतील भाविकांसाठी या स्थळाचे धार्मिक महत्त्व आहे. या प्रकल्पासह अयोध्या, सीतामढी आणि नेपाळमधील जनकपूर यांना जोडून धार्मिक पर्यटन आणि यात्रेचा मार्ग विकसित केला जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • पुनौरा धाम इथल्या माता जानकी मंदिराच्या पुनर्वसनासाठी ८८२ कोटी मंजूर
  • केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत रामायण सर्किटचा भाग म्हणून विकास
  • जेडीयू-भाजपा युती सरकारकडून धार्मिक आणि सांस्कृतिक विकासावर भर
  • मंदिर विकास प्रकल्पामुळे मिथिला भागात धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा
  • आगामी बिहार निवडणुकीवर याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा
  • मिथिला भागातील हिंदू मतदारांमध्ये धार्मिक भावना बळकट करण्याची संधी
  • विरोधकांकडून धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप

बिहारच्या राजकारणावर हिंदुत्वाचा प्रभाव कसा?

बिहारमध्ये समाजवादी राजकारणाची परंपरा असल्याने हिंदुत्व निर्णायक राजकीय मुद्दा ठरतो. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला फारशी महत्त्वपू्र्ण कामगिरी करता आली नाही. १९९५ मधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ३२४ पैकी फक्त ४१ जागा मिळाल्या. एकट्या भाजपाने निवडणुका लढल्या तर ते प्रभावी ठरत नाही, असे निवडणूक निकाल दर्शवतात. २०१५ मध्येही पंतप्रधान मोदींचे वर्चस्व असतानाही भाजपाला २४३ पैकी फक्त ९१ जागा मिळाल्या.

इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह सीतेवर लक्ष केंद्रित करणारा हा काही पहिलाच राजकीय प्रयत्न नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत सांगितले होते की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जय सिया राम कधीच म्हणत नाही. त्यांनी सीताजींना त्यांच्या घोषणाबाजीतून वगळले. त्यांनी आपल्या इतिहासाच्या विरोधात काम केले. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगतो की, प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या आरएसएस कार्यकर्त्याला भेटाल तेव्हा त्यांना जय सिया राम म्हणायला सांगा, कारण जितके राम महत्त्वाचे आहेत, तितक्याच सीताजीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.