“रोजगार म्हणजे सरकारी नोकरी असे लोकांनी गृहीत धरणे चूक आहे. १३० कोटी लोकसंख्येसाठी सरकारी नोकरी देणे हे कोणत्याही सरकारला शक्य नाही”, असे विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. शनिवारी (२६ मे) लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. एकूण सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा एक टप्पा उरला असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध विषयांवर भाष्य केले आहे. त्यामध्ये बेरोजगारीसंदर्भात बोलताना त्यांनी केलेले हे विधान चर्चेत आहे.
“रोजगार म्हणजे सरकारी नोकरी नाही”
देशात बेरोजगारीबाबत बरीच चिंता व्यक्त केली जात आहे. तुमचे सरकार लोकांना रोजगार देण्यात अयशस्वी ठरले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, याबद्दल काय सांगाल, असे विचारले असता गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “दुर्दैवाने रोजगार म्हणजे सरकारी नोकरी असे लोकांनी गृहीत धरले आहे. १३० कोटी लोकसंख्येसाठी सरकारी नोकरी देणे हे कोणत्याही सरकारला शक्य नाही. मात्र, तरीही काही जण असा भ्रम पसरवत आहेत. आम्ही १.१७ लाख स्टार्टअपची सुरुवात केली. यातून रोजगार निर्मिती होणार नाही का?” असा सवालही त्यांनी केला.
पुढे याबाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले की, “स्वयंरोजगारासाठी ४७ कोटी लोकांनी मुद्रा लोन घेतले आहे. २० लाख ही फार मोठी रक्कम नसली तरीही स्वत:पुरता रोजगार निर्माण करण्यासाठी ती पुरेशी आहे. आणखीही काही सरकारी कर्ज योजना आहेत. ८५ लाख पथारी विक्रेत्यांनी स्वनिधी लोन घेतले आहे. यातून रोजगार निर्मिती होणार नाही का?”
पुढे ते मनमोहन सिंग सरकारबरोबर मोदी सरकारची तुलना करत म्हणाले की, “सत्तेवरून पायउतार होताना मनमोहन सिंग यांनी चार लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचे बजेट दिले होते; मोदींनी ते ११.८० लाख कोटींपर्यंत वाढवले. यातूनही रोजगार निर्मिती होत आहे. विमानतळांची संख्या ७५ वरून १५० नेली आहे, यातून रोजगार निर्मिती होत नाही का? मात्र, याची कुणीही गणती करत नाही. आम्ही पहिल्या सात वर्षांत २२,००० किमी ट्रान्समिशन लाईन टाकल्या आहेत, यातून रोजगार निर्मिती होत नाही का?”
हेही वाचा : कंगना रणौतच्या मतदारसंघात लूण लोटा प्रथेची चर्चा; देवाची भीती दाखवून केला जातोय प्रचार
“पाच उद्योगपतींचे सरकार काँग्रेसचे”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, “राहुलजी म्हणतात की, हे सरकार फक्त पाच उद्योगपतींचे सरकार आहे. मात्र, ही परिस्थिती त्यांच्याच सरकारच्या काळात होती. त्यांच्या सत्ताकाळात फक्त २.२२ कोटी डिमॅट अकाउंट होते, आता ते १५ कोटींवर गेले आहेत. हे अतिरिक्त १३ कोटी लोक काहीच कमवत नाहीत का? त्यांच्या सत्ताकाळात मार्केट कॅप ८५ लाख कोटींपर्यंत होते, आज ते ५०० लाख कोटींपर्यंत गेले आहेत”, असेही ते म्हणाले.
“पहिल्या पाच टप्प्यातच बहुमत हातात”
निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून ९० टक्के निवडणूक सरली आहे. भाजपाला बहुमतासाठी सातव्या टप्प्याची गरज आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत पहिल्या पाच टप्प्यातच मिळाले आहे.” यावेळीही भाजपा सरकार २७२ च्या वर जाणार का, यावर ते म्हणाले की, “आम्हाला ३०० ते ३१० च्या दरम्यान जागा मिळतील. यामध्ये सहाव्या टप्प्यातील जागा घेतलेल्या नाहीत. आम्ही सध्या सुयोग्य स्थितीत आहोत. आम्ही या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षांचा लेखाजोखा आणि पुढील २५ वर्षांची ध्येयधोरणे मांडत प्रचाराला सामोरे गेलो आहोत. सुरुवातीला ही निरस निवडणूक असल्याची चर्चा झाली. विरोधकांचीही हवा असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून झाली. विरोधकही मजबुतीने लढत असल्याचे चित्र दिसले. निकाल लागल्यावर चित्र स्पष्ट होईलच”, असेही ते म्हणाले.
२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना जाणवणाऱ्या फरकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “लडाख वगळता मी संपूर्ण भारतात फिरलो आहे. २०१९ मध्ये लोकांमध्ये अशी भावना होती की, मजबूत सरकार आणि मजबूत नेतृत्वामुळे देशाला फायदा झाला आहे. तसेच मोदी जे करत आहेत ते चांगले काम आहे, अशीच भावना होती. २०२४ मध्ये देशाला महान करण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करण्याची भावना लोकांमध्ये आहे. लोकांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. लोकांचा सामूहिक विश्वास हा कोणत्याही देशाच्या विकासासाठी गरजेचा असतो, तो इथे दिसून येतो आहे. १३० कोटी जनतेसाठी सामूहिक संकल्पही असतो. अमृत महोत्सवाच्या रुपाने मोदीजींनी तो संकल्प केला. मला असे वाटते की, देशासाठी हे मोठे यश आहे. आम्हालाच सत्ता का मिळेल याची असंख्य कारणे देता येतील, मात्र देश योग्य मार्गावर आहे ही लोकांमधील भावना महत्त्वाची आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? अमित शाहांनी सांगितले खरे कारण
“माध्यमांमधील एक मोठा भाग आम्हाला स्वीकारत नाही”
भाजपाच्या जागा वाढणार नाहीत, अशीही एक चर्चा आहे. असे अनिश्चिततेचे वातावरण का तयार झाले आहे, याबद्दल बोलताना त्यांनी असा दावा केला की, “माध्यमांमधील एक मोठा भाग आम्हाला स्वीकारत नाही. राजकीय नेत्यांना विचारधारा असावी आणि पत्रकारांना असू नये, असे म्हटले जाते. मात्र, याउलट घडताना दिसते आहे. पत्रकारांना विचारधारा आहे तर राजकीय नेत्यांना नाही. काँग्रेसने इतकी वर्षे एकट्याने सत्ता भोगली आणि आता ते सर्वांचे सरकार असले पाहिजे, अशी भाषा करत आहेत. राज्यघटनेत स्थिर सरकार असू नये असे म्हटले आहे का? स्थिर सरकारमुळे देश मजबूत होतो”, असेही ते म्हणाले.