सौरभ कुलश्रेष्ठ

जून महिन्यात मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांचा १५ दिवसांत दौरा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आता आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. पहिल्या टप्प्यात सात दिवसीय कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड तीन जिल्ह्यांमधील तालुक्यांत जाऊन पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधत आणि नवीन नेमणुका करत मनविसेच्या पुनर्बांधणीचा अमित ठाकरे यांचा प्रयत्न आहे. 

अमित ठाकरे आता कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस (५,६), रत्नागिरीत दोन दिवस (७,८) आणि रायगडमध्ये तीन दिवस (९,१०,११ जुलै) असे एकूण सात दिवस अमित ठाकरे तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसेच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधणार आहेत. मनविसे ही महाराष्ट्रातील प्रभावी विद्यार्थी संघटना बनवण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी व्यक्त केला होता. मनसे-मनविसेची पुनर्बांधणी करायची तर संपर्क, बैठका, दौरे याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले आहे. 

कोकण दौऱ्यात पहिल्या दिवशी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला. त्यानंतर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा करत लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले. तसेच येत्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसे कार्यकारिणी युनिट स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी राज ठाकरे यांच्या कानावर टाकता येत नाहीत, अशी तक्रार सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर आता यापुढे तुम्ही माझ्या थेट संपर्कात राहू शकता. तुम्हाला गरज पडली तर कधीही माझी वेळ घेऊन राजगड मुख्यालयात येऊन मला भेटू शकता, असे स्पष्ट आश्वासन देत संवाद-संपर्कासाठी उपलब्ध असल्याचा संदेश दिला.