अमरावती : भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या कथित बनावट जन्म दाखल्यांच्या ‘मिशन’वर आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये फिरून ते पोलिसांसोबत चर्चा करताहेत. गुन्हा नोंदवण्याची मागणी करीत आहेत. अमरावतीत सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालेला असताना आता त्यांच्या भूमिकेविषयी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनीही स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापण्याची चिन्हे आहेत.

अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांनी खोट्या दस्तावेजांच्या आधारे येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्म दाखले मिळवले, असा आरोप करून किरीट सोमय्या यांनी यंत्रणेची झोप उडवून दिली. किरीट सोमय्या अमरावती शहरातील व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बनावट जन्ममृत्यू दाखल्यावरून प्रशासनावर गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप करीत आहेत. सोमय्या हे पोलीस यंत्रणा आणि प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेसने नुकताच केला होता.

दरम्यान, महसूल प्रशासनाने अमरावती शहर व ग्रामीण भागातील एकूण २८०० जन्म मृत्यूंचे दाखले रद्द केले. या कारवाईनंतर किरीट सोमय्या हे तातडीने अमरावती शहरात पोहोचले. अनेक नागरिकांनी बनावट कागदपत्रे देऊन दाखले मिळवली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

किरीट सोमय्या हे वारंवार जिल्ह्यात येऊन येथील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. काही प्रकरणांमध्ये खोट्या दस्तावेजांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे पुढे आले आहे. त्यात यंत्रणेमार्फत पोलीस तक्रारही झाली आहे. परंतु त्या प्रकरणांतही कुणी बांगलादेशी किंवा रोहिंग्याशी संबंधित असल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे सोमय्या यांनी जाणीवपूर्वक अमरावती जिल्ह्याची बदनामी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही नाराज

प्रशासनाने २८०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके यांनी एकही दाखला रद्द होऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर किरीट सोमय्या यांनी सुलभा खोडके यांना व्याकरण समजले नसावे, असा टोला लगावला.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनीही सोमय्या यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांनी कागदपत्रांमध्ये खोडतोड करून जन्मदाखले मिळवले, त्यांचे दाखले रद्द करण्याची कारवाई योग्यच. पण, केवळ तांत्रिक चुकांसाठी सरसकट जन्म दाखले रद्द करण्याचे काहीच कारण नाही. या संपूर्ण प्रकरणात वितरीत करण्यात आलेल्या जन्म दाखल्याची योग्य पडताळणी करण्याची गरज आहे. याशिवाय कुणाच्याही दबावाखाली येऊन पोलिसांनी कारवाई करू नये, अशा सूचना आपण यापुर्वीच दिल्या आहेत, असे संजय खोडके यांचे म्हणणे आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, काँग्रेसला आपला जनाधार टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची चिंता वेगळी आहे. जिल्ह्यात केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणुका जिंकणे सोपे नाही, हे अनेक नेत्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.