उमाकांत देशपांडे

मुंबई : भाजपची ताकद ‘ बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा ‘ अधिक असल्याने आणि त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे मुरजी पटेल हेच कमळ चिन्हावर लढणार आहेत. शिवसेनेची विजयी जागा असल्याने या जागेवर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटाने हक्क सांगितला, मात्र या मतदारसंघात आपणच अधिक प्रभावशाली असल्याचे पटवून देत भाजपने जागावाटपात ही जागा आपल्याकडे खेचली. त्यामुळे जंग जंग पछाडून शिंदे गटाने मिळविलेली ढाल-तलवार निवडणूक आखाड्याबाहेरच राहणार आहे.

हेही वाचा… धुळे मनपात सत्ताधारी भाजपची कोंडी ; समस्या सुटत नसल्याने स्वपक्षीयांचा वैताग

दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांचे मुख्य मंत्री शिंदे यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे व शिवसेनेने लढविलेल्या जागांवर आपलाच हक्क असल्याचे सांगून शिंदे गटाने लढण्याची तयारी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दणका देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करून धनुष्यबाण चिन्ह आपल्या गटाला देण्याची किंवा गोठविण्याची मागणी शिंदे गटाने केली. ही जागा आपण लढविणार असल्याचे सांगितल्याने शिंदे गटाला आयोगाने ढाल-तलवार हे तात्पुरते चिन्ह आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नावही अंतरिम आदेशाद्वारे मंजूर केले. शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रुतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला व मंत्रीपदाचे आमिषही दाखविल्याचा आरोप झाला. पण त्या बधल्या नाहीत. शिंदे गटाने शिवसेनेच्या एका नगरसेवकालाही लढविण्याचा विचार केला होता. भाजपचे मुरजी पटेल हे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे विश्वासू असून त्यांची युतीचे उमेदवार म्हणून शेलार यांनी घोषणाही काही दिवसांपूर्वी निवडणूक कार्यालय उद्घाटनाच्या वेळी केली होती व त्यांनी कामही सुरू केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेला तुल्यबळ उमेदवार न मिळाल्याने शिंदे यांनी पटेल यांनाच ढाल-तलवार चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला. मात्र तो भाजप नेत्यांनी व पटेल यांनी फेटाळला. त्यामुळे अखेर रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीच्या सत्रात शिंदे गटाने माघार घेतली आणि भाजपने मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा… मनसेतील बंडखोरांचे मतपरिवर्तन करण्याचे धनुष्य समन्वय समितीकडे

भाजपची तीन प्रभागांमध्ये ताकद

या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे व लटके यांचे प्राबल्य असले तरी त्या अंतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये भाजपची ताकद आहे. त्यामुळे पटेल हे कमळ चिन्हावर लढल्यास चांगली लढत देऊ शकतील. त्याचबरोबर लटके यांच्या पत्नी निवडणूक लढवीत असल्याने उमेदवार देऊ नये, असे शिंदे गटातील काही नेत्यांना वाटत होते. त्यामुळे लटके यांच्याविरोधात शिंदे गटाचा उमेदवार किती ताकदीने लढणार, हा प्रश्न असल्याने ही जागा अखेर भाजपने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जागा २०१९ मध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढविली होती. शिवसेनेची जागा पाडण्यासाठी त्यांना भाजपची फूस होती, अशी चर्चाही झाली.

हेही वाचा… सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज ‘बाळासाहेबांची शिवसेना’च्या वाटेवर !

या निवडणुकीत १ लाख ४७ हजार ११७ मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मते मिळाली, तर मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मते मिळाली होती. मात्र पराभव झाल्यानंतर पटेल हे पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा… पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

शिवसेना फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार सामना होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. निवडणूक आयोगाकडे जाऊन शिवसेना नाव व चिन्ह गोठविणे आणि लटके यांचा राजीनामा महापालिका आयुक्तांवर दबाव टाकून अडविल्यानंतर झालेली न्यायालयीन लढाई पाहता ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. पण शिंदे गटाची तलवार मात्र म्यानातच राहिली असून ढाल-तलवार निवडणूक रिंगणाबाहेरच राहिली आहे.