BJP internal conflict हरियाणा भाजपामध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. मंत्रिमंडळातील सहकारी अनिल विज यांना शांत करण्यासाठी राज्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हरलेले मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी पक्षाने नेत्यांना जबाबदारी दिली आहे. मात्र, विज यांना जबाबदारी न देण्यात आल्याने ते नाराज झाले होते. त्यांच्याकडे ऊर्जा, परिवहन आणि कामगार मंत्रालयाचीदेखील जबाबदारी आहे.
गेल्या मंगळवारी राज्य भाजपाने पराभव झालेल्या ४२ मतदारसंघांत त्यांचे मंत्री आणि आमदारांची नेमणूक केली आहे. पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि सात वेळा आमदार असलेले विज वगळता सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा या यादीत समावेश होता, यामुळे नाराज झालेल्या विज यांनी गेल्या आठवड्यात पक्षाच्या तळागळातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी राज्यव्यापी दौरा जाहीर केला. भाजपाच्या सूत्रांनुसार, त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडेही आपली नाराजी व्यक्त केली होती.
अनिल वीज यांची प्रतिक्रिया
- राज्यव्यापी दौरा सुरू करण्याची घोषणा करताना विज यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले, “इतर मंत्र्यांना प्रत्येकी एक मतदारसंघ देण्यात आला आहे, पण मला संपूर्ण हरियाणाची जबाबदारी घ्यावी लागेल. मी माझ्या पक्षाचा सर्वात ज्येष्ठ आमदार आहे. मी सात वेळा जिंकलो आहे. त्यामुळे लवकरच मी राज्यभर दौरा सुरू करून विविध ठिकाणी नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेईन.”
- त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनाही कठोर इशारा दिला. ते म्हणाले, आगामी दौऱ्यात ते त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवतील आणि सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही हे तपासतील.
- ते पुढे म्हणाले, “कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही.” मुख्य म्हणजे यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी लोकांसमोर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्व घडामोडीदरम्यान, शनिवारी रोहतकमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायत मंत्री कृष्ण पनवार म्हणाले की, “विज यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना ही जबाबदारी दिली नाही.” भाजपाच्या काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वक्तव्यामुळे विज भडकले. त्यामुळे ते आणखी काही नाराज करणारे वक्तव्य करण्याआधीच अनेक नेते त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा पनवार यांनी एक निवेदन जारी केले, त्यात त्यांनी विज यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि त्यांच्या विशाल अनुभवाचा गौरव केला.
“राज्याचे ऊर्जा, परिवहन आणि कामगार मंत्री अनिल विज हे एक आदरणीय, अनुभवी आणि लोकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले नेते आहेत. त्यांचा अनेक दशकांचा राजकीय अनुभव आणि लोकांच्या कल्याणासाठीची बांधिलकी या कारणामुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय नेते ठरले आहेत. मी अनिल विज यांचा खूप आदर करतो. राज्यातील लोक आपल्या तक्रारी घेऊन विज यांच्याकडे येतात आणि ते सर्वांना मदत करतात,” असे ते म्हणाले.” या मुद्द्याला सोशल मीडियावर चुकीचे वळण दिले जात आहे, अनिल विज यांचा राजकीय अनुभव अनेक लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणा आहे.”
नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांची भेट
रविवारी सकाळी पनवार यांनी विज यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्याबरोबर एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. मात्र, दोन्ही नेत्यांनी याबाबत सार्वजनिकपणे बोलणे टाळले. अंबाला विभागात विज हे राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. अंबालामध्ये १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने या प्रदेशात चांगली कामगिरी करून सर्व १८ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली, मात्र काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त नऊ जागा मिळाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने फक्त नऊ विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्ता टिकवून ठेवण्यात यश आले. मात्र, त्याच निवडणुकीत काँग्रेसने या प्रदेशात तब्बल १२ जागा जिंकल्या होत्या.
मंत्र्यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्या
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रिमंडळातील विज वगळता इतर सर्व मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाने गमावलेल्या विशिष्ट मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. अरविंद शर्मा यांना गढी-साम्पला-किलोई (काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांचा मतदारसंघ), विपुल गोयल यांना रोहतक (बी.बी. बत्रा, काँग्रेस), आरती राव यांना झज्जर (गीता भुक्कल, काँग्रेस), कृष्ण पनवार यांना आदमपूर (चंदर प्रकाश, काँग्रेस), महिपाल ढांडा यांना गुहला चीका (देवेंदर हंस, काँग्रेस), राव नरबीर यांना पृथला (रघुबीर तेवटिया, काँग्रेस), श्याम सिंह राणा यांना नारायणगढ (शॅली चौधरी), रणबीर गंगा यांना तोहाना (परमवीर सिंह), गौरव गौतम यांना डबवाली (आदित्य देवीलाल, आयएनएलडी), श्रुती चौधरी यांना ऐलनाबाद (भरत सिंग बेनीवाल, काँग्रेस), कृष्ण कुमार बेदी यांना सिरसा (गोकुल सेठिया, काँग्रेस) आणि राजेश नागर यांना हिसार (सावित्री जिंदल, अपक्ष) मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या मुद्द्यावर बोलताना विज यांनी आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांवर टीका केली आहे. जानेवारीमध्ये त्यांनी सैनी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “पदभार स्वीकारल्यापासून ते ‘उडन खटोला’ (हेलिकॉप्टर) वर आहेत. जर ते खाली उतरले तर त्यांना लोकांचे दुःख दिसेल.”