गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षातील विविध नेत्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र, नुकतीच केजरीवाल यांना झालेली अटक या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना झालेल्या अटकेमुळे आम आदमी पक्ष आणि भाजपाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात, त्याचाच हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केजरीवाल यांच्या अटकेनंतर विविध स्तरातून मोदी सरकारवर टीका सुरू आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. एवढंच नाही, तर ज्या लोकांचा केजरीवाल यांच्या राजकारणावर विश्वास नाही, ते लोकही त्यांच्या अटकेनंतर चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. मोदी सरकारकडून ‘थोडं अती होत असल्या’ची या लोकांची भावना आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर जो राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे तो मतदानापूर्वी शांत होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे.

हेही वाचा – लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

एकीकडे साऊथ ग्रुपकडून कथित १०० कोटींची लाच घेऊन त्याचा वापर आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे हेही सत्य आहे की, ईडीकडून केवळ विरोधीपक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळेही जनभावना भाजपाच्या विरोधात जाताना दिसून येते. शिवाय, त्यामुळे विरोधकही एकत्र झाले आहेत. हेही खरं आहे की भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, एका मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक केल्याने याबाबत लोकांच्या भावना काय, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.

भारतातील निवडणूक प्रतिक्रियेत अनेक त्रुटी असल्या तरी निवडणुका या देशातील लोकशाहीचा कणा आहेत. मतदान करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे, अशी भावना जनतेच्या मनात आहे. मतदान ही एक अशी प्रतिक्रिया आहे, ज्यावेळी राज्यकर्त्यांवर आपला अंकुश आहे, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण होते.

खरं तर देशात भाजपा जिंकेल अशी परिस्थिती आहे, असे असतानाही जिंकत असलेला डाव भाजपा पणाला का लावतेय, असा प्रश्न पडू शकतो. जामीन मिळाला नाही तर केजरीवाल निवडणूक प्राचारापासून लांब राहतील. शिवाय, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया हे त्यांचे सहकारीही अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत, याचा फटका ‘आप’ला दोन ते तीन जागांवर दिल्लीमध्ये फटका बसू शकतो. आप आणि काँग्रेसने युती केल्याने गेल्या दोन निवडणुकांप्रमाण दिल्लीतील सातही जागा भाजपा जिंकू शकणार नाही, याचीच भीती भाजपाला असावी. आणि प्रत्येक जागा जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची भाजपाची तयारी आहे, असं दिसतंय.

केजरीवाल यांच्यावर अशीही टीका केली जाते, की त्यांनी दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढेच येऊ दिलं नाही. हे भाजपासाठी फायद्याचं ठरलं आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यास आप पक्षसंघटना पातळीवर पूर्णपणे कोलमडेल किंवा त्यांचे बरेच नेते पक्षातून बाहेर पडतील, अशी अपेक्षा भाजपाला आहे. त्याचा परिणाम पुढच्या वर्षी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आगामी निवडणुकीत आप आणि काँग्रेस कशाप्रकारे प्रभाव दाखवतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

गेल्या अनेक वर्षांपासून केजरीवाल यांचा पक्ष राजकीय अडथळा असल्याची भाजपाची भावना आहे. खरं तर केजरीवाल यांच्या पक्षाकडे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांतील सत्ता आहे. मात्र, असे असले तरी देशपातळीवर त्यांचे राजकीय महत्त्व अधिक आहे. पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त गुजरात आणि गोव्यातही आपचे अस्तित्व आहे. मात्र, तिथे भाजपाला नुकसान होईल अशी शक्यता कमी आहे. पण दिल्ली हे राजकीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या अधिक महत्त्वाची आहे.

हेही वाचा – टीका करणाऱ्यालाच काँग्रेसचे तिकीट, उमेदवारीवरून वाद; शशी थरूर म्हणाले…

आम आदमी पक्षाचा हिंदुत्त्वाबाबतचा सॉफ्ट कॉर्नरही अतिशय महत्त्वाचा आणि भाजपासाठी अडचणीचा आहे. अरविंद केजरीवाल अनेकदा हनुमान चालिसा म्हणताना दिसले आहेत. याशिवाय विकासात्मक राजकारणावरही त्यांनी भर दिला आहे. या सगळ्यामुळेच भाजपाची चिंता वाढली आहे.

स्वतंत्र भारतात राजकीय आंदोलनातून उदयास आलेले बोटावर मोजण्याइतके राजकीय पक्ष या देशात आहेत. त्यापैकीच आम आदमी पक्ष एक आहे. मात्र, त्यांच्यावर भाजपाची टीम बी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा देखील भाजपाच्या चिंतेचा एक विषय आहे. भाजपाने सुरुवातीच्या काळात अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याशिवाय केजरीवाल हे मोदींना पर्याय असू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तूर्तास, केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधक एकत्र होतील का? तसेच त्यांच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आप एकत्र येत निवडणूक लढतील का? या सगळ्या राजकारणाचा भाजपाला फायदा होईल की नुकसान असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal arrest has bjp over reached or is it decisive strike read out spb spb
First published on: 24-03-2024 at 13:36 IST