मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन | At the time of Chief Minister's visit to Nandurbar the discord showed between the Shinde group and the BJP | Loksatta

मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन

भाजपच्या संकटमोचक मंत्र्यांनी नंदुरबारमध्ये उपस्थित असतानाही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिंदे गट आणि भाजप गटात नक्कीच काहीतरी बिनसले असल्याची चर्चा त्यामुळेच जोरात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन
मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन

नीलेश पवार

नंदुरबार : नंदुरबारपासून राज्यातील दौऱ्याची सुरुवात करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उध्दव आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. तीन महिन्यांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. परंतु, राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या संकटमोचक मंत्र्यांनी नंदुरबारमध्ये उपस्थित असतानाही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहून नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिंदे गट आणि भाजप गटात नक्कीच काहीतरी बिनसले असल्याची चर्चा त्यामुळेच जोरात आहे.

नंदुरबार नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी नंदुरबारमध्ये आले होते. नगरपरिषद उद्घाटन कार्यक्रम आणि त्यानंतर झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात खास अहिराणी भाषेतून भाषणाला सुरुवात करून मुख्यमंत्र्यांनी खान्देशवासीयांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. दौऱ्यादरम्यान त्यांनी ठिकठिकाणी गाडी थांबवून बाहेर येत स्वागतासाठी थांबलेल्या जनसमुदायाची भेट घेत जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद उद्घाटन सोहळा आणि शिंदे गटाचा मेळावा या दोन्ही कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा फारसा उल्लेख न करता ठाकरे पिता-पुत्रांवरच टीकेचा रोख ठेवला. अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून त्यांना जे जमले नाही. ती कामे किंबहुना अधिक कामे ९० दिवसांच्या कार्यकाळात करण्याची किमया कशी करून दाखवली, याचा लेखाजोखाच शिंदे यांनी जनतेसमोर ठेवत उध्दव ठाकरे आणि त्यांच्यातील कामाचा फरक दाखविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… “सत्तेत येऊ अन्यथा विरोधी बाकावर, मात्र…” हिमाचल प्रदेश निवडणुकीवर आप पक्षाने भूमिका केली स्पष्ट

नंदुरबार दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात नगरपरिषदेसाठी सात कोटी, २८ लाखांचा निधी मंजूर करणे असो वा मानव विकास निर्देशांकात सर्वांत खालच्या क्रमांकावर असेलल्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची घोषणा यातून त्यांनी आपल्या कामाची चुणूक नंदुरबारकरांना दाखवली. आपण केलेले बंड, त्याची फलश्रुती, ही नियोजित नसल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ४० आमदार आणि इतर सहकारी आमदारांमध्ये नाराजी नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री असा दावा करीत असताना या दौऱ्यात भाजप मंत्र्यांची अनुपस्थिती, स्थानिक भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार या घटना मात्र शिंदे गट-भाजपमधील विसंवादाची कथा सांगत होत्या.

हेही वाचा… “नरेंद्र मोदी देवाचा अवतार” उत्तर प्रदेशमधील महिला मंत्र्याचं विधान, म्हणाल्या “ते नुसता विचार करतात अन्…”

नंदुरबार नगरपालिकेवर वर्चस्व असलेले शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी आणि भाजप यांच्यातील वाद जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. स्थानिक भाजपचे पदाधिकारी पालिकेतील शिंदे गटाला वारंवार लक्ष्य करत असल्यामुळेच नगरपालिकेच्या उद्घाटनास आमंत्रित करण्यात आलेल्या भाजप मंत्र्यांची आधीच भेट घेवून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना या उद्घाटन सोहळ्यास येण्यास मज्जाव केला. इतकेच काय तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी नंदुरबारला येण्यास याच वादातून रोखण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. नंदुरबार येथे आदल्या दिवशी मुक्कामी आलेले मंत्री गिरीश महाजनही स्थानिक भाजपच्या विरोधामुळे शहरात असूनही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गेले नाहीत.

हेही वाचा… भारत जोडो यात्रींसाठी मराठवाडी-खान्देशी भोजन

भाजपचे एकमेव उपस्थित असलेले मंत्री डाॅ. विजयकुमार गावित हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांसाठी त्यांना उपस्थित राहणे भाग पडले. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका, नंदुरबारसाठी केलेल्या विकासाच्या घोषणा, यापेक्षाही स्थानिक भाजपचा विसंवादच सर्वांच्या अधिक लक्षात राहिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2022 at 10:05 IST
Next Story
“सत्तेत येऊ अन्यथा विरोधी बाकावर, मात्र…” हिमाचल प्रदेश निवडणुकीवर आप पक्षाने भूमिका केली स्पष्ट