छत्रपती संभाजीनगर: तुमचं स्मरण करताना आता कोणता शिवसैनिक डोळ्यासमोर ठेवावा, असा प्रश्नच आहे. म्हणजे एक शिवसैनिक सत्तेबरोबरचा. ‘फॉच्युनर’, ‘ बीएमडब्ल्यू’ किंवा मर्सिडिजमध्ये जाणारा. हातातील चारही बोटात अंगठ्या घालून कंत्राटदारांच्या बाजूने बोलणारा की, प्रस्थापितांच्या विरोधात पाय रोवून उभारणारा. गावात रिक्षा चालविणारा, रॉकेल विक्रेता अशा किती तरी व्यवस्थेत खालच्या तळातील माणसं तुम्ही उभी केली.
मुंबईनंतर प्रस्थापितांच्या विरोधात उभारणारी मराठवाड्यातील मंडळी आता सर्वार्थाने स्थिरावली आहे. विरोध मावळला आहे. आता विरोधाचे रुप फक्त ‘ तुझा बाईट विरुद्ध माझा बाईट ’ असाच. त्यामुळे तुमच्या काळातील ‘ रग’ असणारी, लढा देणारा शिवसेना वेगळ्याच वळणावर गेली. त्यातला कोणी तरी मुंबईत ७२ व्या मजल्यावर घर घेतो आहे. कोणाच्या घरात पैशाच्या बॅगांचे व्हिडिओ दिसताहेत. कोणी मंत्री पद मिळावे म्हणून काळी जादू करतो आहे.
प्रबोधनकरांना विसरल्याचा हा परिणाम असेल का हो ?
आताशा ‘जय महाराष्ट्र ’हा शब्दच गुळमुळीत झाला आहे. जोरच राहिला नाही. कांद्याचे भाव उतरले, दूधाचे भाव उतरले, सोयाबीन गडगडले तरी आंदोलने केवळ कॅमराजीवी. पंधरा मिनिटाच्या घोषणा झाल्या की, सारे आपापल्या घरी. विरोधक शिवसैनिक आपणही कधी तरी नेता होऊ म्हणून प्रयत्न करत असतात. ते जिल्हा पातळीवरच्या नेत्याच्या मागेपुढे करतात. कधी त्यांची प्रशंसा करतात तर कधी वैतागून बोलतात. हे तसं पूर्वीपासून सुरू आहे. पण जय महाराष्ट्र असं म्हटल्यानंतर पडणारा दबदबा मात्र तसा राहिला नाही. झालं असं की, एक शिवसैनिक सत्ताधारी आणि दुसरा सत्ताविरोधी. सत्ताविरोधी सगळा रोष हिंदूत्त्वाच्या छत्राखाली एकवटण्यात तुम्हाला मुंबईनंतर यश आलं ते मराठवाड्यात. १९८५ ते १९८८ च्या काळात भाजपची विचारसरणी शिवसैनिकात रुजवायला तुम्ही सुरुवात केली. पुढे त्याची पाळेमुळे खालपर्यंत गेली एवढी की, तेव्हाच्या ‘ औरंगाबाद’ मध्ये ‘ हिंदू राष्ट्र चौक ’ नावाचा फलक उभा राहिला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्यांना शिवसेनेचा तेव्हा अभिमान वाटत होता. भाजपपेक्षाही आक्रमकतेत शिवसेना दोन पाऊले पुढेच. त्यामुळे मराठवाड्यात आताच्या राजकीय भाषेत शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप लहान. आता शिवसेना कोणती खरी हाच खरा प्रश्न आहे.
‘जय महाराष्ट्र ’म्हणून झाले, ‘जय श्रीराम’ही म्हणून झाले. छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नावही देऊन झाले. पण मराठवाड्याचं जगणं काही बदललं नाही . शेतीमध्ये राबणारी माणसं मरताहेत पटकी झाल्यागत. आरक्षण मिळावं म्हणून तरुण पेटून उठतो आहे. तुम्ही निर्माण केलेले अस्मतेचे प्रश्न उपयोगी पडले नाहीत. राजकीय पटावर सोंगट्या बदलल्या आहेत. कोणती साेंगटी रंग बदलून कोणावर चाल करुन येईल हेच कळत नाही. खेळाचे नियम आणि पंच दोन्ही बदलले आहेत. त्यामुळे खेळपट्टी उखडूनही उपयोग होत नाही. शेतकरी कामगार पक्ष आणि जनता दला यांची जशी शकलं पडली तसं पुढे होईल, एवढी गटबाजी आहे. हे वास्तव सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही शिवसेनेत. पेटून उठणारा, प्रश्न विचारणारा, प्रसंगी व्यवस्थेवर तुटून पडणारा शिवसैनिक आता जय महाराष्ट्र म्हणताना सुरतेला जाऊन येईल का, अशी शंका वातावरणात ठसठसून भरली आहे. बाकी पाच बोटात अंगठ्या घालून एखाद्या ‘ मद्यपी’ ला ‘ तू आमचंच गिऱ्हाईक आहे’ असं सांगण्याचं निर्ढावलेपण शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांमध्ये आलं आहे. कधी काळी अपघात झाल्यावर रक्त पिवशी पुरविण्यासाठी धडपडणारी यंत्रणा आता पूर्णत: कूचकमी झाली आहे. ८० टक्के समाजकारण वगैरे शब्द आता फक्त भाषणापुरते आहेत. लोक आस लावून असतात. तसं तुम्हालाही वरुन दिसत असेलच. पण काहीही म्हणा, जय महाराष्ट्र म्हणताना निष्ठांचा चक्काचूर झाला आहे. सत्ताधारी झालेली शिवसैनिक मंडळी विरुद्ध सत्तेत नसणारे शिवसैनिक असा लढा रंगला आहे. तेव्हा जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या आणि पुण्यतिथी निमित्त जमणाऱ्यांना तुम्ही ‘ जय महाराष्ट्र’ म्हणलेच असेल एव्हाना. पण तो संघर्ष उभा करणारा नेता आता हवा आहे. तो मिळेल का माहीत नाही. तोपर्यंत काय, तर…..
जय महाराष्ट्र !
