२००९ मध्ये डिंपल यादव यांनी पोटनिवडणूक लढवून राजकारणात पदार्पण केले. फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३० वर्षे होते. त्यांचे पती समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रचार करीत होत्या. पक्षाच्या आणि त्यांच्या पतीच्या सल्ल्यानुसार मुलगी आणि सून, असा त्या स्वत:चा उल्लेख करीत आणि लहान भाषणे देत. पतीच्या सांगण्यावरूनच त्या सर्व पावले उचलत. साधारण १६ वर्षांनंतर मैनपुरी इथल्या सपा खासदार डिंपल यादव यांनी एनडीएच्या महिला खासदाराला थेट उत्तर दिले आहे. २८ जुलै रोजी एनडीएच्या महिला खासदारांनी एका मौलवींच्या डिंपलविरोधातील वक्तव्यावर निदर्शने केली. त्यावर उत्तर देताना डिंपल म्हणाल्या, “मणिपूरमधील हिंसाचाराविरोधात आंदोलन केले असते, तर बरे झाले असते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. मणिपूरमधील महिलांसोबत उभे राहून आंदोलन केले असते, तर जास्त चांगले झाले असते.”

दिल्लीतील एका मशि‍दीला २ जुलै रोजी डिंपल यांनी अखिलेश यादव आणि इतर सपा नेत्यांसह भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी डोक्यावर पदर घेतला नव्हता आणि त्यावरून मौलवींनी आक्षेप घेतला होता. योगायोगाने एनडीएने महिला खासदारांना डिंपल यांच्या समर्थनासाठी एकत्र आणले असताना दुसरीकडे भाजपाच्या अल्पसंख्याक गटाने मात्र मौलवींच्या बाजूने डिंपल यांच्यावर टीका केली.

एनडीएच्या या अर्धवट पाठिंब्याला डिंपल यांनीही ठामपणे उत्तर दिले. स्वबळावर उभ्या असलेल्या राजकारणी म्हणून त्यांच्या प्रवासाचे हे एक उदाहरण ठरले. डिंपल यादव यांच्यातला हा बदल प्रामुख्याने दिसला तो म्हणजे ज्यावेळी त्यांना मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. हा मतदारसंघ समाजवादी पक्षाचे संस्थापक व डिंपल यांचे सासरे मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त होता. २०२२ मधील पोटनिवडणुकीत डिंपल यांनी त्या मतदारसंघातून विजय मिळवला आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही ही विजय कायम ठेवला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डिंपल यांनी उत्तर प्रदेशात पती अखिलेश यादव यांच्यापासून स्वतंत्र असा प्रचार केला होता. याआधी अनेकदा ते दोघेही एकाच वेळी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये सभा घेत होते. जिथे पक्षाची महिला उमेदवार होती, तिथे डिंपल आवर्जून उपस्थित राहत.

२०२४ च्या निवडणुकीआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये डिंपल यांनी चेन्नईतील द्रमुक पक्षाने आयोजित केलेल्या महिला हक्क परिषदेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा त्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांसह मंचावर उपस्थित होत्या. उत्तर प्रदेशाबाहेर राष्ट्रीय स्तरावर राजकीय कार्यक्रमात सपाचे प्रतिनिधी म्हणून डिंपल यांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता.

मागील वर्षी संसदेत स्वपक्षातील संभलचे खासदार झिया उर रहमान बर्क यांच्याबद्दल डिंपल बोलल्या होत्या. बर्क हे त्यांच्या मतदारसंघातील धार्मिक हिंसाचाराबाबत बोलत असताना त्यांचा माईक पुन्हा सुरू करण्याची मागणी डिंपल यांनी केली होती. एका सपा नेत्याने सांगितले, “डिंपल यादव या आता संसद संकुलात माध्यमांशी बोलताना आत्मविश्वासानं वावरतात. माध्यम प्रतिनिधी किंवा पक्षकार्यकर्त्यांशी बोलण्यात त्यांना संकोच वाटत नाही.” एका सपा खासदाराने सांगितले, “अखिलेश यादव उपस्थित नसतील, तर डिंपल यांना आम्ही लोकसभेत आपले नेते मानतो. त्या आमच्या आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामधील दुवा आहेत.” बिहारमधील मतदारयादीच्या एसआयआरविरोधातील विरोधी पक्षांच्या आंदोलनात डिंपल या समाजवादी पक्षाकडून आघाडीच्या वक्त्यांपैकी एक होत्या. उत्तर प्रदेशातील अलीकडील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा मतदारसंघातील मतांचा टक्का वाढल्याबद्दल प्रश्न विचारताना त्यांनी म्हटले, “निवडणूक आयोगाने या मतांच्या दरोडेखोरीकडे डोळेझाक केली आहे.”

सपा प्रवक्त्या व महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा जुही सिंग यांनी सांगितले की, डिंपल यांनी २०१२ ते २०१७ या अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. महिला आणि बालकल्याणाशी संबंधित धोरणं आखताना त्यांच्या सूचनांचा विचार केला गेला. त्यानुसार १०९० क्रमांक महिला हेल्पलाइनच्या नियोजनात समाविष्टही करण्यात आला. महिलांचं संरक्षण आणि सक्षमीकरण हे त्यांचं उद्दिष्ट आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही त्यांच्या सूचनेवरून सुरू झाला.”

“४७ वर्षीय डिंपल यादव आता खासदार म्हणून अधिक सक्रिय झाल्या आहेत. त्या त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात”, असे एका सपा नेत्याने सांगितले. संसद अधिवेशन नसतानाही डिंपल लखनऊ किंवा मैनपुरीत पक्षकार्यकर्त्यांना भेटतात. पूर्वी त्या फक्त महिला आघाडीच्या बैठका घेत. आता त्या पक्षाच्या इतर आघाड्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्येही सहभागी होतात”, असे एका नेत्याने सांगितले.

१९९९ मध्ये अखिलेश यांच्याशी विवाह केल्यानंतर डिंपल यांनी २००९ मध्ये फिरोजाबाद लोकसभा पोटनिवडणूक लढवली. तीत्यांची पहिली निवडणूक होती. मात्र, काँग्रेसचे अभिनेता-राजकारणी राज बब्बर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी अखिलेश यांनी रिक्त केलेल्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवला. आधी २०१२ च्या पोटनिवडणुकीत आणि नंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव भाजपाचे सुभ्रत पाठ यांनी १२ हजारपेक्षा जास्त मतांनी केला. डिंपल यांचा सामना पुढे २०२२ मधील मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीत झाला. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दरम्यान, डिंपल यादव आता सक्रिय झाल्याने भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला. “डिंपल यांची एकमेव ओळख म्हणजे मुलायम कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते. त्या याच कारणामुळे संसदेत निवडून येतात आणि त्यांचा वास्तवाशी काही संबंध नाही. हे लोकशाहीसाठी नक्कीच चांगले नाही.