नितीन पखाले

वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. खासदार गवळी या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर कॅप्टन प्रशांत सुर्वे यांना गवळींच्या विरोधात शिवसेना बळ देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या या खेळीने वैमानिक असलेल्या कॅप्टन सुर्वेंचे विमान गवळींना गोत्यात आणणार काय, अशी चर्चा यवतमाळ- वाशिम जिल्ह्यात सुरू आहे.

कॅप्टन प्रशांत सुर्वे यांचे कुटुंब मूळचे वाशिम जिल्ह्यातील पार्डी आसरा या गावातील. हे संपूर्ण कुटुंब ‘वारकरी’ संप्रदायाचे आहे. प्रशांत यांचे वडील पंढरीनाथ सुर्वे हे विक्रीकर उपायुक्त म्हणून निवृत्त झाले आहे. वडिलांच्या नोकरीमुळे प्रशांत यांचे संपूर्ण शिक्षक नागपूर, पुणे आणि बंगलोर येथे झाले. इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर आवश्यक असलेले प्रशिक्षण घेऊन १९९७ मध्ये ते ‘वैमानिक’ झाले. वाशिम जिल्ह्यातील पहिले वैमानिक म्हणून त्यावेळी वाशिमचे तत्कालीन खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. प्रशांत सुर्वे यांच्या आईचे वडील कुटे पाटील हे पुंडलिकराव गवळी यांच्या निकटचे होते. त्यामुळे कॅप्टन प्रशांत सुर्वे आणि भावना गवळी यांच्या विवाहाची दोन्ही कुटुंबात चर्चा झाली आणि पुढे २००४ साली या दोघांचा विवाह झाला.

हेही वाचा- औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची घडी बसविण्यात सत्तार यांचा पुढाकार

भावना गवळी यांनी २००४ मध्ये लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत सुर्वे यांचे आई-वडील सक्रीय होते. एअर इंडियातील नोकरीमुळे कॅप्टन प्रशांत हे या निवडणुकीत फार वेळ देवू शकले नव्हते. त्यानंतर २००९ मध्ये मात्र कॅप्टन प्रशांत यांनी सहा महिने रजा घेऊन भावना गवळी यांच्या निवडणुकीत योगदान दिले होते. त्या काळातच त्यांनी संपूर्ण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ पालथा घातला होता. कॅप्टन सुर्वे थेट लोकांमध्ये मिसळून त्यांच्यातील एक होऊनच वावरत असल्याचा अनुभव त्यावेळी शिवसैनिकांनी घेतला. २००९ मधील विजयानंतर खासदार भावना गवळी आणि कॅप्टन प्रशांत सुर्वे यांच्यातील नातेसंबंधात वितुष्ट निर्माण होऊन, २०१२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तेव्हापासून कॅप्टन सुर्वे यांनी समाजकारणासह राजकारणात प्रत्यक्ष उडी घेतली. २०१३ मध्ये कॅप्टन प्रशांत यांनी पुनर्विवाह केला. सध्या कॅप्टन सुर्वे हे पत्नी, मुलगी, आई-वडिलांसह वाशिमलाच राहतात. व्यवसायानिमित्त दिल्ली, पुणे, नागपूर असे त्यांचे वास्तव्य असते. मात्र अलिकडे पार्डी आसरा गावातील वडिलोपार्जित शेती, वाशिममधील व्यवसाय आणि परिसरातील सामाजिक उपक्रम यावर प्रशांत सुर्वे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

खा. भावना गवळी यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर कॅप्टन सुर्वे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सुर्वे आणि गवळी यांच्या नातेसंबंधांचा विचार करता ठाकरे यांनी सुर्वे यांना कोणतीही जबाबदारी देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर २०१४ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे कॅप्टन सुर्वे यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून सांगितले होते. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. भावना गवळी यांच्या विरोधात कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली, मात्र प्रचंड मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुर्वे पुन्हा वैमानिक म्हणून इंडिगो कंपनीत रूजू झाले.

हेही वाचा- विचित्र आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वैमानिक असल्यामुळे आतापर्यंत जवळपास ५० देश फिरून झाले. प्रत्येक देशात गेल्यानंतर आपण सर्वच क्षेत्रात किती मागे आहोत, याची जाणीव होते. आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे नवनवे देश फिरताना नेहमीच वाटायचे. त्यामुळे वाशिम या गृहजिल्ह्यातच काम करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेबद्दल पूर्वीपासूनच आकर्षण होते. आता शिवसेनेतील घडामोडीनंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले नाते अधिक घट्ट व्हावे, म्हणून पक्षात अधिकृत प्रवेश घेतला. सध्या निवडणुकीबाबत काही ठरविले नाही. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबादार पार पाडू. मात्र शिवसेनेसोबत निष्ठेने काम करायचे आहे”, अशा शब्दांत आपल्या भावना कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या. कॅप्टन सुर्वे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने शिंदे गटात गेलेल्या खा. भावना गवळी यांच्या राजकीय कारकीर्दीवर काय आणि किती परिणाम होईल, हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.