विरोधकांच्या इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा मान मिळावा यासाठी अनेक नेते शर्यतीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, अशी भूमिका मांडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेदेखील या पदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच आता नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जदयू) पक्षात महत्त्वाचा बदल होणार आहे. नितीश कुमार हे लवकरच जदयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

२९ डिसेंबरच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

जदयू पक्षाची २९ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत जदयूचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना हटवून हीच जबाबदारी नितीश कुमार यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. सध्या नितीश कुमार पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत.

नितीश कुमार पक्षाध्यक्षांवर नाराज?

काही दिवसांपासून नितीश कुमार हे लल्लन सिंह यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी उत्सुक असून, पक्षातील नेतेदेखील याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. मात्र, पक्षातील नेते याबाबतची भूमिका इंडिया आघाडीसमोर योग्य रीतीने मांडू शकले नाहीत, आवश्यक ती चर्चा करू शकले नाहीत, असे नितीश कुमार यांचे मत आहे. याच कारणामुळे नितीश कुमार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा निर्णय घेत आहेत, असे म्हटले जात आहे.

नितीश कुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?

नितीश कुमार यांनी मात्र मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही, असे अनेकदा सांगितलेले आहे. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र नितीश कुमार यांची याबाबतची महत्त्वाकांक्षा नाकारलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्य इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी, पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे योग्य असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर नितीश कुमार यांचे महत्त्व कमी करण्यासाठी बॅनर्जी यांनी ही भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय.

२०१६ सालीदेखील असाच निर्णय

यूपीए आघाडीत राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळावे म्हणून नितीश कुमार यांनी २०१६ साली असेच प्रयत्न केले होते. त्यावेळी नितीश कुमार यांच्यासाठी शरद यादव यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची खाली केली होती.

लल्लन सिंह काय निर्णय घेणार?

दरम्यान, जेडीयू पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह हे मुंगेर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी जुले २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. लल्लन सिंह यांच्याआधी आर. सी. पी. सिंह हे जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आरसीपी यांची भाजपाशी जवळीक वाढत असल्यामुळे नितीश कुमार यांनी त्यांना अध्यक्षपदावरून हटवले होते. त्यानंतर आता लल्लन सिंह यांनादेखील अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास लल्लन सिंह काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.