RJD’s Sasaram Candidate arrested After Filing Nomination : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे बिहारचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यादरम्यान नामांकन अर्ज दाखल करताच राष्ट्रीय जनता दलाच्या एका उमेदवाराला पोलिसांनी तडकाफडकी अटक केली आहे. सत्येंद्र साह असे अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव असून ते सासाराम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीही उमेदवारी अर्ज दाखल करताच महाआघाडीच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्येंद्र साह यांच्याविरोधात झारखंड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते, त्यानुसार सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेवेळी साह यांच्याबरोबर मोठ्या संख्येने राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी कोणताही गोंधळ न होऊ देता अतिशय शांततेत ही कारवाई केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून सत्येंद्र साह यांना झालेली अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. रोहतास जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सत्येंद्र साह हे सासाराम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयात पोहोचले, त्याच वेळी झारखंड पोलिसांचे एक पथक तिथे आले आणि प्रलंबित असलेल्या एका अटक वॉरंटच्या आधारे साह यांना ताब्यात घेण्यात आले.
झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ मध्ये गढवा जिल्ह्यातील चिरोंजिया मोड परिसरात एका बँकेवर दरोडा पडला होता. या प्रकरणाचे धागेदोरे सत्येंद्र साह यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. “२०१८ मध्येही याच घटनेप्रकरणी आरोपी सत्येंद्र साह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यांच्यावर लूटमार, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन यांसारखे २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत”, अशी माहिती झारखंडच्या गढवा येथील सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील तिवारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताच साह यांना अटक झाल्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
आणखी वाचा : Political News : नितीश कुमारही एकनाथ शिंदेंच्या वाटेवर? बिहारमध्ये भाजपाची रणनीती काय?
आतापर्यंत महाआघाडीतील तीन उमेदवारांना अटक
सत्येंद्र साह यांच्याआधी महाआघाडीतील तीन उमेदवारांना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी भोरे मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पासवान यांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दरोली मतदाराचे उमेदवार सत्यदेव राम यांनाही नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर तातडीने अटक करण्यात आली. एकपाठोपाठ एक तीन उमेदवारांना अटक झाल्यानंतर महाआघाडीने एक निवेदन जारी करून या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. “जितेंद्र पासवान आणि सत्यदेव राम यांच्या राजकीय हेतूने प्रेरित अटकेचा आम्ही तीव्र निषेध करतो. उमेदवारी अर्ज भरताच त्यांना नामांकन केंद्राबाहेर खोट्या आणि निराधार आरोपांखाली अटक करण्यात आली”, असे महाआघाडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. “राज्यातील सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात जनतेचा मोठा रोष आहे. महाआघाडीला कौल मिळण्याच्या भीतीने सुडबुद्धीने उमेदवारांना अटक केली जात आहे”, असा आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे.

काँग्रेस-आरजेडीने एकमेकांविरोधातच दिले उमेदवार
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी समाप्त झाली. या दरम्यान महाघाडीत फूट पडल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय जनता दलाने या निवडणुकीत १४३ उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसला केवळ ६१ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. आरजेडीने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि मुकेश सहानी यांच्या ‘विकासशील इन्सान’ पक्षाविरोधात उमेदवार दिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्या वेळीपेक्षा यंदा नऊ जागा कमी आल्या आहेत. पाच जागांवर काँग्रेस व आरजेडीच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. याखेरीज एका मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे.
हेही वाचा : निवडणूक बिहारची, पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची; कारण काय? कन्हैया कुमार यांनी काय सांगितलं?
तिकीट नाकारल्याने उमेदवाराने फाडला शर्ट
काँग्रेसने अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने केला. मित्रपक्षांनी आमची अपरिहार्यता समजून घ्यावी अशी प्रतिक्रिया आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी दिली आहे. महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने यापूर्वीच बिहारच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, आरजेडीने यंदा विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मधुबन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ मदन शाह यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे, त्यामुळे निराश झालेल्या मदन शाह यांनी स्वतःचा शर्ट फाडून लालू प्रसाद यादव यांच्या निवास्थानाबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.