Bihar Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य म्हणजे बिहार होय. लोकसभेचे ४० मतदारसंघ असलेल्या बिहारचे राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्येही अनेकांचे बिहारकडे लक्ष आहे. याचे कारण असे आहे की, यावेळी कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने बिहारची राजकीय हवा वाहताना दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत ४० पैकी सर्वाधिक जागा कुणाला मिळतील आणि त्या किती मिळतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे. केंद्रात सत्ता येण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांनंतर बिहारमधून सर्वाधिक खासदार निवडून येणे गरजेचे ठरते. उत्तर भारतातील राजकारणामध्ये वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठीही केंद्रातील सत्तेची ती गरज ठरते.

‘मोदी फॅक्टर’ कितपत लागू?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

काही जणांना असे वाटते की, स्थानिक पातळीवरची जातीची गणिते मांडून एनडीएला अधिक जागा मिळतील; तर काही ठिकाणी त्यांना टक्कर द्यावी लागेल. दुसरीकडे, काही जणांना असे वाटते की, यंदा नितीश आणि भाजपा दोघेही बिहारच्या राजकारणामध्ये अस्ताला जातील. किमान नितीश कुमार यांच्याबाबत तरी ही भावना सार्वत्रिक झालेली पाहायला मिळते आहे.

बिहारच्या या निवडणुकीमध्ये ‘मोदी फॅक्टर’ आजही लागू आहे का, यावर मत-मतांतरे आहेत. पंतप्रधान मोदींच्या राजकारणाला विरोध करणारे जितके आहेत, तितकेच त्यांचे हिरिरीने समर्थन करणारेही आहेत. त्यांचे समर्थक ‘मोदी नाही, तर मग कोण?’ असा सवाल करताना दिसतात. गेल्या निवडणुकीमध्ये ४० पैकी ३९ जागांवर एनडीएला बहुमत मिळाले होते; मात्र यंदा ती आकडेवारी घसरेल, असे तेही मान्य करताना दिसतात.

हेही वाचा : हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?

तेजस्वी यादव यांचे भवितव्य उज्ज्वल

आणखी एका गोष्टीवर अगदी विरोधकांचेही एकमत असलेले दिसून येते आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे राजकारणातील भवितव्य उज्ज्वल आहे, असे त्यांचे मत आहे. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर राष्ट्रीय जनता दलाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेण्यात तेजस्वी यशस्वी ठरले असल्याचे अनेकांचे मत आहे.

याबाबत बोलताना मुझ्झफरपूरमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, “मी मोदींचा समर्थक आहे आणि तेच पुन्हा पंतप्रधान होतील. मात्र, लालू प्रसाद यादव तुरुंगात असताना वा आजारी असताना आपल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी तेजस्वी यादव यांनीच जिवाचे रान केले आहे. ते या निवडणुकीमध्ये आघाडीवर लढत आहेत. एक ना एक दिवस ते नक्की बिहारचे मुख्यमंत्री होतील.”

लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) हा स्थानिक पक्षही भाजपासोबत आहे. समस्तीपूरमध्ये लोजपाच्या एका समर्थकानेही, “तेजस्वी यादव राजयोगासाठी जन्माला आले आहेत. लालू यादव तुरुंगात असताना वा आजारी असताना ते राज्यभर फिरत राहिले. त्यामुळे ते राजकारणात नक्की पुढे जातील”, असे सांगितले.

लालू प्रसाद यादव यांचे उत्तराधिकारी म्हणून बिहारमधील यादव समाजाचे लोक तेजस्वी यादव यांना पाठिंबा देत आहेत. इतर काही जण तेजस्वी यादव यांचे कर्तृत्व मान्य करतात. मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचेच बिहारमध्ये वर्चस्व राहील, असेही ते सांगताना दिसतात. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बहुमताने पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांना वाटतो.

“नितीश कुमारांचा राजकीय अस्त निश्चित!”

एका व्यक्तीबाबत बिहारच्या जनतेच्या मनात कसल्याही प्रकारची द्विधा मनस्थिती नाही आणि ती व्यक्ती म्हणजे नितीश कुमार! नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचे सगळेच मान्य करताना दिसतात. एकेकाळी ‘सुशासन बाबू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितीश कुमार यांची सगळी राजकीय नैतिकता संपुष्टात आल्याची भावना सार्वत्रिक आहे. नितीश कुमार कुर्मी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बिहारच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त तीन टक्के हा समाज आहे. तरीही जवळपास दोन दशके नितीश कुमार सत्तेमध्ये टिकून राहिले आहेत. मात्र, सत्तेतून पायउतार होण्यापासून स्वत:चा बचाव करताना त्यांना आपली राजकीय विचारधारा सतत गुंडाळून ठेवावी लागली आहे. म्हणूनच आता त्यांच्या राजकीय अस्ताचा हा काळ असल्याचे मानले जात आहे. एनडीए आणि इंडिया अशा दोन्ही आघाड्यांमधील कार्यकर्त्यांमध्ये याबाबत एकमत आहे.

नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलत एनडीएसोबत जाणे पसंत केल्याने यादव समाज त्यांच्यावर नाराज आहे. त्यासोबतच खुद्द एनडीएचे समर्थकही त्यांची खिल्ली उडविताना दिसतात. नितीश कुमार ‘पलटूराम’ असल्याचे ते विनोदाने म्हणतात. त्यांच्या सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना एका स्थानिक चहावाल्याने म्हटले, “सुशासन बाबू सुशासनातच मिसळून गेले आहेत. ते पलटूबाबा आहेत.”

बिहारमधील कुशवाह जातीचे लोक त्यांच्यावर अधिक चिडलेले आहेत. नितीश कुमार हे बिहारवर लागलेला कलंक आहेत. त्यांना कसलीही विचारधारा नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र, बिहारमध्ये काहीच कृष्णधवल स्वरूपात पाहता येत नाही. त्यामुळे निवडणुकीचे निकाल नक्की काय असतील, हे सांगणे कठीण आहे.

नितीश कुमार यांच्याबाबत बोलताना एका स्थानिक कार्यकर्त्याने म्हटले, “नितीश कुमारांची कारकीर्द लयाला गेली आहे हे खरे आहे. मात्र, त्यांचा राजकीय प्रभाव नष्ट व्हायला वेळ लागेल. त्यांनी पुन्हा बाजू बदलल्यामुळे त्यांच्या ‘सुशासन बाबू’ या प्रतिमेला तडा गेला आहे. मात्र, तरीही कुर्मी समाजाचे लोक त्यांचे समर्थक आहेत. तसेच दारूबंदी केल्यामुळे आणि मुलींना शाळेला जायला सायकल दिल्यामुळे बिहारमधील महिलांची मते नितीश कुमारांच्या बाजूने असू शकतात. नाही तर नितीश कुमार यांना आपल्या बाजूने घेण्याची मोदींना काय गरज आहे? तशीही प्रत्येक निवडणुकीत नितीश कुमार यांची मतांची टक्केवारी कमी होत चालली आहे, परंतु, तरीही त्यांना अंदाजे १४ टक्के मते मिळतात. ही मते दोन्ही आघाडींच्या जय-पराजयासाठी पुरेशी आहेत. त्यामुळेच नितीश कुमार आमच्या बाजूने असणे कधीही फायद्याचेच आहे.”

दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले, “आता राज्यात संयुक्त जनता दलाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता भाजपा आणि राजद हे दोनच पक्ष बिहारच्या राजकारणात मुख्य असतील.” बिहारच्या निवडणुकीमध्ये नितीश-तेजस्वी यांच्यासोबतच लोकांच्या तोंडी नरेंद्र मोदींचे नाव अधिक आहे. बिहारमधील काही उच्च जातींचे मतदार कोणत्याही अटीशिवाय त्यांना समर्थन देतात; तर दुसरीकडे वंचित जातींतील लोक सरकारी योजनांचे ‘लाभार्थी’ असल्याने समर्थन देताना दिसतात. मुझफ्फरपूरजवळील भिकनपूर गावातील राम स्वरूप सहानी म्हणतात, “जो आम्हाला पाच किलो धान्य मोफत देतो आहे त्यालाच आम्ही मत देणार ना; अन्यथा कुणाला देणार?”

हेही वाचा : काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

काँग्रेसबाबत फारशी चर्चा नाही

बिहारमध्ये काँग्रेस फार कमी चर्चेत आहे. तिशीतला एक युवक काँग्रेसबद्दल बोलताना म्हणाला, “राहुल गांधी उच्चशिक्षित आहेत, असे मी ऐकले आहे. मात्र, त्यांचा जन्म राजकारणासाठी झालेला नाही. एक राजकारणी म्हणून लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही.”
दुसरी एक व्यक्ती म्हणाली, “सत्तेत पुन्हा यायचे असेल, तर काँग्रेसला आपल्या सध्याच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण- नरेंद्र मोदींना पराभूत करण्यायोग्य चेहरा सध्या तरी त्यांच्याकडे नाही.”

Story img Loader