पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक वर्षे एकहाती सत्ता आणि हुकूमत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांनीच कोंडी केली आहे.
भाजपचे आमदार राहुल कुल, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे या विद्यमान आमदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याची संधी साधून अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. माजी आमदारांपैकी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांनीही अजित पवार यांना घेरले आहे. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाविरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) या मित्रपक्षांनी कुरघोडी करून अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात एकाकी पाडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अजित पवार यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट येण्यास महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे) हे पक्ष कारणीभूत ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांची ताकद असलेल्या काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांनी एकत्र येत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती नगरपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’साठी प्रतिष्ठेची झाली आहे. दोन्ही पक्ष आमने-सामने असताना भाजपने ही नामी संधी असल्याचे लक्षात घेऊन माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाशी हातमिळवणी करून उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचेही उमेदवार असल्याने बारामतीत अजित पवार यांना मित्रपक्षांशीच दोन हात करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल यांचे अजित पवार यांच्याशी फारसे सख्य नाही. त्यामुळे दौंडमध्ये कुल यांनी स्थानिक आघाडीशी युती करून अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’पुढे आव्हान उभे केले आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वज्ञात आहे. शिवतारे यांनी सासवड, जेजुरी आणि फुरसुंगी- उरुळी या तीन नगरपरिषदांमध्ये उमेदवार उभे करून अजित पवार यांची अडचण केली आहे.
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणीही अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला अडथळा निर्माण झाला आहे. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांची सासवड आणि जेजुरी नगरपरिषदेवर सत्ता आहे. या नगरपरिषदांमध्ये आतापर्यंत भाजपाला उमेदवार मिळत नव्हते. मात्र, जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.
इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांना आव्हान दिले आहे. या ठिकाणी आजवरचे राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याशी हातमिळवणी करून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’पुढे प्रश्न पडला आहे.
जुन्नरमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) हे महायुतीतील दोन मित्र पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ची कोंडी झाली आहे.
शिरुरमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कस लागणार आहे. चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एकाकी पाडले आहे.
