पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी अशी अपेक्षा असल्याचे मागील आठवड्यात चिंचवडमध्ये सांगितल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतर पिंपरीत भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच लढत होणार असल्याचे निश्चित असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती;परंतु त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने २०१७ मध्ये सुरुंग लावला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष दिले. मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना राजकीय पाठबळ दिले. त्यामुळे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या लांडगे आणि जगताप यांनी अजित पवारानांच अस्मान दाखविले. चारवरुन ७७ नगरसेवक निवडून आणले.

महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुललल्यानंतर फडणवीस यांनी शहरात संघटना बळकट करण्यावर भर दिला. जुन्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे यांना महामंडळ, उमा खापरे यांच्याकडे महिला संघटनेचे राज्याचे नेतृत्व दिल्यानंतर विधानपरिषदेतही संधी दिली. गोरखे यांना विधानपरिषदेवर घेतले. शहरातीलच अनुप मोरे यांच्याकडे युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे भाजपच्या प्रदेश नेतृत्वाचे शहरावर विशेष लक्ष असल्याचे दिसते. चार आमदार असलेला भाजप शहरात सर्वात मोठा पक्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे एक आमदार आणि शिवसेनेचे (शिंदे) श्रीरंग बारणे एकमेव खासदार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपखालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शहर भाजपने सुरुवातीपासून स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची युती व्हावी अशी अपेक्षा होती. तशी भूमिका त्यांनी मागील आठवड्यात चिंचवडमध्ये व्यक्त केली होती. त्यांच्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांचीही युती व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु, आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे पिंपरीत राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातच लढत होणार आहे. भाजपचे शहरात चार आमदार असले तरी संपूर्ण मदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे अजित पवारांविरोधात थेट उघडपणे बोलतात. त्यांच्यातील राजकीय वैर वाढले आहे. आगामी निवडणुकीत त्यात भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लांडगे यांच्या पाठिशी मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. भाजपचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे हे अजित पवारांविरोधात भूमिका घेताना दिसत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाची मदार अजित पवार यांच्यावरच असणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे स्थानिक भाजप आमदारांवर टीका करत नाहीत. परिणामी, शहरातील प्रचाराची धुरा अजित पवारांकडेच राहील. पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बालेकिल्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रवादी’चे काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना युतीची अपेक्षा होती. युती झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्यथा भाजपकडून लढायचे अशी काही माजी नगरसेवकांची भूमिका असल्याचे कळते. आता युती होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदेच्या शिवसेनेची भाजपसोबत युती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक खासदार असले तरी, पक्षाची शहरात ताकद मर्यादित आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती व्हावी अशी भूमिका आहे. भाजपही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अनुकूल आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहर भाजपने शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. ३२ प्रभागात १२८ तुल्यबळ उमेदवार पक्षाकडे आहेत. चार आमदार आणि संघटना एकत्रित जमिनीवर उतरुन काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. पण, संघटनेकडून तसा निरोप अद्याप आला नाही. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप