भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संजयोजक अरिवंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या मुद्य्यावरून टीका केली आहे. याशिवाय केवळ दिल्लीच नाहीतर संपूर्ण उत्तर भारतामधील हवेच्या खराब गुणवत्तेसाठी जबाबदारही ठरवले आहे. राजधानी आणि इतर शहरांमधील प्रदूषणासाठी आम आदमी पार्टीचे सरकार असलेल्या पंजबामध्ये शेतांमध्ये लावलेल्या आगीला जबाबदार ठरवले आहे.

राजधानीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मंगळवारी सकाळी ८ वाजता ३२६ वर होता. गाझियाबाद (२८५), नोएडा (३२०), ग्रेटर नोएडा (२९४), गुरुग्राम (३१५) आणि फरिदाबाद (३१०) या शहरांमध्ये खराब ते अतिशय खराब हवेच्या गुणवत्तेची नोंद झाली आहे.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, पंजाबमधील शेतांमध्ये लागलेल्या १ हजार १९ आगीच्या घटना केवळ दिल्लीच नाहीतर संपूर्ण उत्तर भारतामधील हवेची गुणवत्ता खराब होण्यामागचे कारण होते.

“दिवाळीच्या दिवशी आम आदमी पार्टीचे सरकार असणाऱ्या पंजबामध्ये शेतांना लागलेल्या आगीच्या १ हजार १९ घटनांमुळे केवळ दिल्लीच नाहीतर संपूर्ण उत्तर भारतात हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. अरविंद केजरीवाल पंजाबमधील त्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत, ज्यांना त्यांच्या पराळींसाठी प्रति एकर एक हजार रुपयांची अपेक्षा होती. दिवाळीला दोष देऊ नका, केजरीवालांना दोष द्या.” असे मालवीय यांनी ट्वीट केले आहे.

१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान पराळी जाळण्यात आल्याच्या घटनांचा एक तत्काही शेअर केला आहे. ज्यामध्ये असे दिसते की पंजबामध्ये ५ हजार ६१७ ठिकाणी शेतांमध्ये आग लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर अनुक्रमे हरियाणा, उत्तर प्रदेशच, दिल्ली, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक येतो.

केजरीवालांचा दावा –

‘‘काही वर्षांपूर्वी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जात होते. परंतु नव्या अहवालानुसार आशियातील दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी आठ शहरे भारतातील आहेत. परंतु या यादीत दिल्लीचा समावेश नाही,’’ असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला आहे.