नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अतिशय दु:खद आहे. नौदल याबाबत चौकशी करीत असून या घटनेवर राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बुधवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची घटना घडल्यानंतर योग्य चौकशी झाली पाहिजे. त्याबाबतची कारवाई सुरू आहे. नौदलाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. ते चौकशी करून उचित कारवाई करतील. प्रत्येक गोष्टीतून राजकारण शोधून काढायचे. त्याकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचे हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, पवार ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा नौदलाने तयार केला हे त्यांना माहिती आहे. भ्रष्टाचाराला आपला विरोध असला पाहिजे. पवार साहेब अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर त्याचे मला आश्चर्य वाटते. ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का, असा सवालही फडणवीस यांनी केला.
राणे धमक्या देत नाहीत
नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, राणे नेहमीच आक्रमक बोलतात. ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे. ते धमक्या देत नाहीत.