BJP threat to Rahul Gandhi लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टीव्हीवरील एका लाईव्ह कार्यक्रमात भाजपा प्रवक्त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान दिलेल्या धमकीने राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली असून प्रवक्त्यावर कारवाई करण्याचीदेखील मागणी केली आहे. यानंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर केला असून भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. नेमके हे प्रकरण काय? सुप्रिया श्रीनेत यांचे आरोप काय? के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रात काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊयात…

प्रकरण काय? वेणुगोपाल पत्रात काय म्हणाले?

लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान केरळ भाजपा नेते आणि प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी टीव्हीवरील चर्चेत म्हटले, “राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू.” या खळबळजनक विधानाचा काँग्रेसने विरोध केला आणि गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले. या पत्रात राहुल गांधींना सोशल मीडियावर वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांकडेही लक्ष वेधले आणि काही लोक भाजपाशी संबंधित असल्याचा आरोपही केला. “राजकीय क्षेत्रातील मतभेद राजकीयदृष्ट्या आणि संवैधानिक चौकटीत सोडवायला हवेत. मात्र, भाजपाचे नेते त्यांच्या विरोधकांना लाईव्ह टीव्हीवर जीवे मारण्याची धमकी देत आहेत. निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणीविरोधात राहुल गांधींच्या लढाईने त्यांना अस्वस्थ केलेले आहे,” असे ते ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हणाले.

खळबळजनक विधानाचा काँग्रेसने विरोध केला आणि गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले. (छायाचित्र-पीटीआय)

वेणुगोपाल यांनी पत्रात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांचा उल्लेख केला असल्याचेही सांगितले. नियोजनबद्धपणे ही धमकी दिली असल्याचे आरोप करत काँग्रेसने भाजपा प्रवक्त्यावर कारवाईची मागणी केली. वेणुगोपाल यांनी पत्रात लिहिले, महादेवन यांनी केलेले विधान हे जीभ घसरण्याचा प्रकार नाही, ही नियोजन पद्धतीने दिलेली धमकी आहे. भारतातील एक आघाडीचे राजकीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्त्या काय म्हणाल्या?

या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजपावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “मी राहुल गांधींच्या सुरक्षेबद्दल चिंतीत आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं मला वाटते आणि या भीतीवर शिक्कामोर्तब करण्याचं काम संघ आणि भाजपा करत आहेत. भाजपाच्या एका प्रवक्त्याने टीव्हीवर “राहुल गांधींच्या छातीत गोळी मारली जाईल” हे सहजपणे सांगितलं, ते ऐकून शांत बसणं कसं शक्य आहे?,” असा प्रश्न त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “हा असा बोलणारा पहिला भाजपा नेता नाहीये. यापूर्वी याच डोक्यावर परिणाम झालेल्यांपैकी एकाने त्यांची जीभ कापण्याची भाषा केली होती, कोणीतरी त्यांचे डोके कापल्यास बक्षीस जाहीर केले होते, तर कोणी इंदिराजींच्या भ्याड हत्येचा संदर्भही दिला. यापैकी एकावरही भाजपाने कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, अशा द्वेष पसरवणाऱ्या हिंस्त्र लोकांची पदोन्नतीच झाली आहे.”

“राहुल गांधींनी भाजपाची सर्वात दुखरी नस पकडली”

त्या म्हणाल्या, “मला चिंता वाटतेय, कारण या संघी विचारांचा खुनी इतिहास आहे. याच विचारधारेने प्रभावित होऊन नथुराम गोडसेने गांधींना मारले होते. हे लोक भ्याड आणि हिंसक आहेत, कारण ते सत्यासमोर टिकू शकत नाहीत. मला चिंता वाटतेय, कारण भाजपा आयटी सेलचे ट्रोल राहुल गांधींच्या परदेशी दौऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहेत. पण, मला सर्वात जास्त चिंता वाटतेय कारण राहुल गांधींनी भाजपाची सर्वात दुखरी नस पकडली आहे. ती नस म्हणजे मतचोरी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राहुल गांधींनी दिलेले पुरावे त्यांनी सांगितलेलं सत्य आज घरोघरी पोहोचले आहे आणि ‘वोट चोर, गद्दी छोड’ (मतचोर, सत्ता सोडा) या घोषणेचा नाद सर्वत्र घुमतोय.”

“आपण आपल्या नेत्यांना हिंसेमुळे गमावलं”

सुप्रिया श्रीनेत पुढे म्हणाल्या, “मला चिंता वाटतेय कारण आपण आपल्या नेत्यांना हिंसेमुळे गमावलं आहे. अवघ्या १४ वर्षांच्या राहुल गांधींनी आपल्या आजीला ३२ गोळ्या झेलून या देशाच्या एकतेसाठी शहीद होताना पाहिलं आहे आणि केवळ सात वर्षांनंतर दहशतवादासमोर गुडघे टेकण्यास नकार देणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या शरीराचे लचके त्यांनी उडताना पाहिले. राहुल गांधी आज या देशाचा विश्वास आहेत, सत्याचा आवाज आहेत, ज्याला कोणतीही शक्ती शांत करू शकत नाही. शोषितांचे ते मार्गदर्शक आहेत, जे त्यांच्या हक्कांसाठी लढाई लढायला कंबर कसून तयार आहेत. गरिबांना मिठी मारून धीर देणारे राहुल गांधी प्रत्येकाला आपलेसे वाटतात. ते केवळ लोकप्रिय नाहीत, तर जननायक आहेत, निर्भीड, ठाम, निडर आहेत.”

त्या म्हणाल्या, “तीव्र मतभेदांवर संवैधानिक चौकटीत तोडगा काढला जातो, म्हणूनच राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर भाजपाने कारवाई करणे अनिवार्य आहे. एवढी हीन आणि घृणास्पद गोष्ट भाजपाचे शीर्ष नेतृत्व, गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या संमतीने तर नक्कीच बोलली गेली नसेल? तुमच्याच लाईव्ह टीव्हीवर विरोधी पक्षनेत्याला गोळी मारण्याची धमकी दिली जात आहे, तुम्ही शांत कसे राहू शकता?,” असा प्रश्नही त्यांनी केला.

भाजपा प्रवक्त्यावर कारवाई

माजी अभाविप नेते असलेल्या महादेवन यांनी २६ सप्टेंबर रोजी एका मल्याळम वृत्तवाहिनीवरील वादविवादात बांगलादेश आणि नेपाळमधील आंदोलनांवर चर्चा करताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारतात अशा प्रकारचे आंदोलन करणे शक्य नाही, कारण इथले लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राहुल गांधींच्या मनात तशी इच्छा असेल तर ‘गोळ्या त्यांच्या छातीतून आरपार जातील,’ असेही ते म्हणाले. याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलमांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात कलम १९२ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चिथावणी देणे), कलम ३५३ (शांतता भंग करण्याचा हेतू ठेवून जाणूनबुजून अपमान करणे) आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर केरळभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महादेवन आणि भाजपा विरोधात आंदोलन केले.