काँग्रेसने गेल्या काही दिवसांत बिहारमधील एसआयआर प्रक्रिया आणि २०२४च्या निवडणुकांमधील बंगळुरूमधील मतदारसंघातील मतचोरी हे मुद्दे लावून धरले आहेत. काँग्रेसने भाजपाच्या विजयावर आक्षेप घेत त्यांनी वोट-चोरी केल्याचा आरोप केला. मात्र, आता निवडणूक आयोगाविरुद्ध काँग्रेसच्या या आरोपांनंतर कर्नाटकातील भाजपाचे राज्यसभा खासदार लहरसिंह सिरोया यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिरोया यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघात २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले होते. सिद्धरामय्या यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती आणि ते मुख्यमंत्री झाले होते, असे लिहिले आहे.
१२ ऑगस्ट रोजी सिरोया यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, ही बाब अलीकडेच सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी एका सार्वजनिक भाषणात उघड केली आहे. निवडणूक आयोग आणि भाजपाच्या संगनमतामुळे अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मतं चोरीला जात आहेत आणि हा भारताच्या संविधान व लोकशाहीवर थेट हल्ला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
सिरोया यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
सिरोया यांनी पत्रात लिहिलं आहे, “२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतखरेदीचा आणि त्यात मोठ्या राजकीय लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री इब्राहिम यांच्या भाषणातून केला गेलाय. तसे रेकॉर्डिंग आहे. जर त्यांचं म्हणणं खरं असेल, तर ते असं दर्शवतंय की, निवडणूक कायद्यांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालं आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?
इब्राहिम यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, त्यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत बदामी विधानसभा जागेला फक्त दोनदा भेट दिली होती. तिथल्या जमिनीवर काय घडले याबाबत त्यांना फारशी माहिती नाही. २०१८ च्या निवडणुकीत सिद्धरामय्या यांना मैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी व बदामी या दोन मतदारसंघांतून उमेदवारी देण्यात आली होती. २००८ पासून अस्तित्वात असलेल्या चामुंडेश्वरी या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघांचं ते प्रतिनिधित्व करीत होते. त्यानंतर त्यांनी तो त्यांच्या मुलासाठी राखून ठेवला. चामुंडेश्वरी मतदारसंघानंतर बॅकअप प्लॅन म्हणून बदामी मतदारसंघाकडे पाहिले जात होते.
२०१८ मध्ये भाजपानं या जागेवरून माजी मंत्री बी. श्रीरामुलु यांना उमेदवारी दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ प्रचार केला होता. या जागेवरील निवडणुकीची लढाई खूपच कठीण होती आणि काँग्रेसचे उमेदवार सिद्धरामय्या केवळ १,६९६ मतांनी विजयी झाले होते.
भाजपाच्या राज्यसभा खासदाराचे हे पत्र अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांनी मतचोरीच्या त्यांच्या सर्व आरोपांबाबतचे पुरावे सादर केले आहेत.
मंगळवारी एक्सवर पोस्ट करताना सिरोया यांनी म्हटलेय, “इब्राहिम यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते बी. बी. चिम्मनकत्ती यांच्यासोबत मिळून त्यांनी २०१८ मध्ये तीन हजार मते विकत घेतली. त्यामुळे सिद्धरामय्या यांना बदामी मतदारसंघातून कसाबसा विजय मिळवता आला.” “अंतिम मतमोजणीत बदामीमध्ये सिद्धरामय्या यांना केवळ १,६९६ मतांनी विजय मिळाला. हा अत्यंत अपमानकारक फरक होता. मतमोजणीत नोटाला २००७ मते होती. २०१८ मध्ये इब्राहिम हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते आणि सर्व संदर्भ व दाव्यांनुसार ते आपल्या मित्राच्या निवडणुकीचे प्रभारी होते”, असेही खासदारांनी नमूद केले.
सिरोया यांनी इब्राहिम यांना विचारले, “त्यांनी ही मते विकत घेण्याची व्यवस्था कशी केली केली?” सिद्धरामय्यांनी यासाठी पैसे दिले; मात्र हे पैसे देण्यासाठी सहा महिने लावले. निवडणूक आयोगाने एका माजी खासदार व केंद्रीय मंत्र्यांकडून केल्या गेलेल्या या गंभीर निवडणूक भ्रष्टाचाराच्या दाव्याची नोंद घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावेत.” सिरोया यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ते म्हणाले, “त्यांनी किड्यांचा डबा उघडला आहे. त्यांच्या पक्षातील लोक, मुख्यमंत्री इतर कुणापेक्षाही जास्त प्रभावित झाले आहेत.”
महादेवपुरा मतदारसंघात झालेली वोटचोरी…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात येणाऱ्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यांनी आरोप केला की, भाजपाला या विधानसभा मतदारसंघात बेकायदा १,००,२५० मतं मिळाली आणि त्यामुळेच भाजपानं या जागेवर निवडणूक जिंकली. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारयादी प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. याबाबत सत्ताधारी पक्षावर आरोप करताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या हाती अणुबॉम्बसारखे पुरावे लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे त्यांनी म्हटले की, आयोगाने २०२४ लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी मतांची चोरी केली.