Kangana Ranaut Flood Controversy : गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे तेथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. ठिकठिकाणच्या पूरस्थिती व भूस्खलनाच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आणि ३१ हून अधिक जण बेपत्ता झाले. या नैसर्गिक आपत्तीत १५० हून अधिक घरे, १०६ गोठे, ३१ वाहने आणि १४ पुलांसह अनेक रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालं. भाजपाच्या नेत्या कंगना रणौत या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असल्यानं त्यांनी एक दिवसाचा दौरा करीत तेथील पूरस्थितीचा आढावा गेतला. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. काँग्रेसनं याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलंय. त्यामुळे राज्यातील भाजपाच्या नेत्यांची डोकेदुखी खूप वाढली आहे.
खासदार कंगना रणौत यांच्याकडून मंडी लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की, पूरग्रस्त भागातील समस्यांकडे भाजपा खासदाराचं दुर्लक्ष झाले आहे. त्यावर उत्तर देताना कंगना रणौत यांनी ६ जुलै रोजी सांगितलं की, पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी ही राज्यातील काँग्रेसच्या सरकारवर आहे. खासदार म्हणून मी फक्त पंतप्रधान व गृहमंत्र्यांना या परिस्थितीची माहिती देऊ शकते आणि केंद्राला मदतीची विनंती करू शकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या, “पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी माझ्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. मी मंत्रिमंडळात नसल्यामुळे हे काम माझ्या अखत्यारीतील नाही.”
कंगना रणौत यांच्यावर काँग्रेसची टीका
- खासदार कंगना रणौत यांच्या विधानांवर काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांनी जोरदार टीका केली.
- बॉलीवूड अभिनेत्रींसाठी राजकारण हा चहाचा कप नाही, असा टोला मंत्री जगत सिंह नेगी यांनी लगावला.
- कंगना यांना जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयश येत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले.
- काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनीही कंगना रणौत यांच्यावर टीकेचा भडिमार केला.
- मंडी हा राज्यातील सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ असून, त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी कंगना यांच्यावर आहे.
- पूरग्रस्तांना मदत करण्यााठी माझ्याकडे निधी किंवा मंत्रिपद नाही, असं त्यांनी सांगणं हे अत्यंत दुर्दैवी आहे.
- कंगना यांच्या अशा विधानांवरून स्पष्ट होतं की, त्या आपल्या जबाबदाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहत नाहीत, असंही प्रतिभा सिंह म्हणाल्या.
आणखी वाचा : भाजपाला मुस्लिमांच्या एका विशिष्ट गटाचा पाठिंबा; केंद्रीय मंत्र्याने नेमका काय दावा केला?
भाजपाचे नेतेही कंगना यांच्यावर नाराज?
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी खासदार रणौत यांचं समर्थन केलं असलं तरी पक्षातील काही नेते व स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रणौत यांच्या तुलनेत भाजपाचे इतर खासदार अनुराग ठाकूर (हमीरपूर), सुरेश कश्यप (शिमला) व राजीव भारद्वाज (कांग्रा) यांनी त्यांच्या मतदारसंघांतून मंडीमध्ये शेकडो मदत किट्स पाठवले आहेत. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीतील एका ज्येष्ठ सदस्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, “अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पक्षात उघडपणे बोलल्या जात नाहीत; पण या सर्व बाबी काटेकोरपणे निरीक्षणात घेतल्या जात आहेत. कंगना रणौत यांना निवडून येऊन केवळ एक वर्ष झालं आहे. त्यांचं वर्तन आणि प्रतिक्रिया पक्षाच्या उच्च नेतृत्वाकडून बारकाईनं पाहिल्या जात आहेत.”

भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं, “कंगना रणौत यांचा पक्षाच्या कामकाजाशी अजूनही फारसा संबंध नाही आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती नवीन गोष्ट नाही. २ जुलै रोजी शिमला येथे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत डॉ. राजीव बिंदल यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यातील पक्षाचे खासदार उपस्थित होते; पण कंगना यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याच्या आदल्या दिवशी पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या नामांकन व मतदान प्रक्रियेला त्या उपस्थित राहणार होत्या; पण त्यांनी हजेरी लावली नाही.”
कंगना जबाबदारीपासून दूर पळताहेत?
मंडीतील एका भाजप नेत्यानं सांगितलं की, अभिनेत्री कंगना रणौत अजूनही आपल्या दोन व्यावसायिक भूमिकांमध्ये समतोल साधण्यात अपयशी ठरत आहेत. “त्यांच्या वागणुकीवरून त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेची झलक दिसते. अलीकडील ढगफुटीच्या घटनेनंतर त्यांनी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली होती. ठाकूर यांनी केवळ इतकंच सांगितलं की, अनेक रस्ते खराब झाले असून, काही भागांमध्ये पोहोचायलाही त्यांना अनेक दिवस लागले. त्यांनी कधीही कंगनाला तिथे जाऊ नका, असं सांगितलं नव्हतं. तरीसुद्धा कंगनानं अप्रत्यक्षपणे जयराम ठाकूर यांच्यावरच जबाबदारी ढकलल्यासारखं भासवलं.”
हेही वाचा : “प्रत्येक भाषेला समान अधिकार”; महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादावर काय म्हणाले केंद्रीय मंत्री?
राज्यातील काही भाजपाचे कार्यकर्ते कंगनाच्या उमेदवारीसाठी दबाव टाकणाऱ्या नेत्यांनाही सध्याच्या परिस्थितीस जबाबदार ठरवत आहेत. “जयराम ठाकूर यांच्याकडे कंगना यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची विधानं रोखण्याची जबाबदारीही त्यांनीच पार पाडली पाहिजे, असं भाजपाच्या एका स्थानिक कार्यकर्त्यानं म्हटलं. ते म्हणाले की, आजही मंडीतील जनतेला माजी खासदार रामस्वरूप शर्मा यांची आठवण होते, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकण्याचं आणि त्या सोडविण्याचं काम करीत होते.
कंगना रणौत यांना कुणाचा पाठिंबा?
एका स्थानिक नेत्यानं सांगितलं की, अलीकडील एका पॉडकास्ट मुलाखतीत कंगना रणौत यांनी लोकांच्या समस्यांना कमी लेखलं. लोक माझ्याकडे गटार, रस्त्याच्या दुरुस्ती यांसारख्या किरकोळ तक्रारी घेऊन येतात, असं त्या म्हणाल्या. मला असं वाटतं की, त्यांच्या राजकीय आकांक्षा मोठ्या आहेत. दरम्यान, कंगना रणौत यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांचा ठाम पाठिंबा आहे. “कंगना यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं कारणच नाही. उलट राज्य सरकारच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करायला हवेत. ढगफुटीच्या घटनेनंतर संपूर्ण भाजप मंडीमध्ये सक्रिय आहे. पक्षाच्या नेते आणि स्वयंसेवकांनी हजारो मदत किट्स वितरित केले आहेत. काही ठिकाणी तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनाही पोहोचायला जवळपास १० दिवस लागले. अशा परिस्थितीत कंगना यांनी लवकरच तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला,” असं बिंदल यांनी स्पष्ट केलं आहे.