नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) विजयासाठी पुरेसे संख्याबळ आहे तरीही यावेळी भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. रविवारी संसदेमध्ये भाजपच्या खासदारांसाठी आयोजित केलेल्या विशेष शिबिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते, त्यावरून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता, त्यांना ७५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये तृणमूल काँग्रेसनेही धनखड यांना मतदान केले होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल व ‘एनडीए’चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची निवड इतकी एकतर्फी होण्याची शक्यता नाही. राधाकृष्णन यांना सुमारे ५३-५५ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना सुमारे ४५ टक्के वा त्याहून अधिक मते मिळू शकतात. ‘एनडीए’कडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ दिसत असले तरी, सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी कमी होणार आहे. शिवाय, ऐनवेळी मित्र पक्षांच्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले तर ‘एनडीए’ अडचणीत येऊ शकते हे लक्षात घेऊन भाजपकडून ‘एनडीए’तील घटक पक्ष तसेच, कुठल्याही आघाडीत नसलेले वायएसआर काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस), बिजू जनता दल आदी पक्षांशी संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले जाते.

सध्या लोकसभेत ५४२ सदस्य आहेत, एक जागा रिक्त आहे. राज्यसभेत २३९ सदस्य असून ५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मिळून एकूण खासदारांची म्हणजेच मतदारांची संख्या ७८१ आहे. बहुमतासाठी ३९१ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. पण, ‘बीआरएस’ मतदानात सहभागी होणार नसल्याचे सांगितले जाते. लोकसभेत या पक्षाचा एकही खासदार नसला तरी राज्यसभेत ४ सदस्य आहेत. तसे झाले तर, उमेदवारांना बहुमतासाठी ३८९ सदस्यांचे पाठबळ लागेल.

लोकसभेमध्ये ‘एनडीए’ आघाडीकडील संख्याबळ २९३ असल्याचे मानले जाते. वायएसआर काँग्रेसचे ४ खासदार सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ‘एनडीए’ला लोकसभेत २९७ सदस्यांचे पाठबळ मिळू शकेल असे मानले जाते. त्यातुलनेत ‘इंडिया’ आघाडीकडे २४५ सदस्यांचे पाठबळ आहे. ‘एमआयएम’च्या असादुद्दीन ओवैसी यांनी ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा दिला आहे. बारामुल्लाचे अपक्ष खासदार इंजिनिअर रशीद यांना मतदान करण्याची परवानगी मिळाल्यामुळे ते मतदासाठी तुरुंगातून संसदेमध्ये येऊ शकतील. आम आदमी पक्ष (आप) इंडिया आघाडीचा भाग नसला तरी, ‘आप’ने विरोधी आघाडीला पाठिंबा दिला असल्याने तीनही खासदार ‘इंडिया’ आघाडीसाठी मतदान करण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत ‘एनडीए’कडे १३१ सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. राज्यसभेतील वायएसआर काँग्रेसचे ७ सदस्यही ‘एनडीए’लाच पाठिंबा देण्याची शक्यता मानली जात आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी वायएसआर काँग्रेसशी संपर्क साधला होता मात्र, विरोधकांना पाठिंबा देण्याबाबत या पक्षाने असमर्थता व्यक्त केल्याचे सांगितले जाते. बिजू जनता दलाने भूमिका स्पष्ट केली नसली तरी, पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक सोमवारी ओदिशाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे या पक्षाच्या राज्यसभेतील ७ पैकी ५ खासदार ‘एनडीए’च्या पारड्यात मत टाकण्याची शक्यता आहे. दोन खासदारांनी ‘एनडीए’चे उमेदवार राधाकृष्णन यांना विरोध केला आहे. हे संख्या गणित पाहता राज्यसभेत ‘एनडीए’कडे सुमारे १४५ सदस्यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’ आघाडीकडे सुमारे ८८ सदस्यांचे पाठबळ असू शकते.

ही आकडेवारी पाहता यावेळी ‘एनडीए’कडे पुरेसे संख्याबळ असले तरी गेल्यावेळी प्रमाणे वर्चस्व गाजवता येणार नाही ही बाबही स्पष्ट झाली आहे. त्यामुळे भाजपने ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या एकेका खासदाराशी संपर्क साधला असल्याचे सांगितले जाते. भाजपच्या दोन्ही सदनांतील खासदारांना शनिवारीच दिल्लीत दाखल होण्यास सांगितले गेले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शनिवारी खासदारांची बैठकही घेण्यात आली होती. रविवारी संसदेच्या बालयोगी सभागृहात भाजपच्या खासदारांसाठी शिबीर आयोजित केले गेले. त्याद्वारे पक्षांच्या खासदारांना एकत्र केले गेले, या शिबिरात मोदीही उपस्थित होते. सोमवारी ‘एनडीए’च्या खासदारांसाठी मतदानाची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.