मुंबई : मुंबई महापालिका वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा विचार आहे. भाजपने त्यादृष्टीने चाचपणी सुरु केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी यासंदर्भात नवी दिल्लीत चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होणार असून भाजपने त्याची तयारी सुरु केली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर आदी महापालिकांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी युती करण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्या क्षेत्रातील मंत्री, खासदार, आमदारांचीही स्वबळावर लढण्याची मागणी पक्षाकडे करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला धक्का देण्याच्या दृष्टीने मंत्री गणेश नाईक यांनी तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांचा कल्याण-डोंबिवलीत युतीला विरोध आहे. ठाणे महापालिकेतही आमदार संजय केळकर व अन्य नेत्यांची युतीविरोधात भूमिका आहे. पुणे, नागपूरमध्येही स्थानिक नेत्यांमध्ये स्वबळ अजमावण्याचा मतप्रवाह आहे.

भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केले आहे. मुंबई वगळता अन्यत्र भाजप स्वबळावर लढण्यास वातावरण अनुकूल आहे. मुंबईत शिवसेनेची (उद्धव ठाकरे) ताकद असून अजूनही त्यांच्याकडे जनतेची काही प्रमाणात सहानुभूती आहे. शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत मराठी माणसाचा टक्का घसरला असून भाजपकडे अमराठी, गुजराती, उत्तरभारतीय व मराठी मतांचा टक्का आहे. तर शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) भर मराठी मतांवर आहे. भाजप व शिंदे गट स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होईल, असे सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

भाजप-शिवसेना २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढली होती. राज्यातील सत्तेत एकत्र असूनही भाजप-शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला ८४ व भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता शिवसेनेतील फुटीमुळे राजकीय परिस्थिती बदलली असून भाजपला स्वबळावर सत्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय भाजपपुढे पर्याय नाही.

राज्यातील सत्तेत एकत्र असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत लढण्याची घोषणा केली असतानाही भाजपने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढल्यास एकमेकांविरोधात प्रचार व टीकाटिप्पणी करावी लागणार आहे. सरकारमध्ये एकत्र असताना एकमेकांविरोधात निवडणुकीत विखारी प्रचार झाल्यास त्याचा परिणाम राज्यातील राजकीय स्थैर्यावर होवू नये आणि राजकीय वातावरण गढूळ होवू नये, यासाठी भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन व राजकीय वातावरणानुसार स्वतंत्र किंवा एकत्रित लढणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य पातळीवर युतीत या निवडणुका लढविणार असल्याचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत असले तरी काँग्रेस नेते मात्र अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. मात्र अनेक ठिकाणी महाविकास आघाडी युतीत निवडणुका लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राजकीय वातावरणाचा भाजपने मुंबई वगळता स्वबळावर निवडणूक लढविल्यास कोणता परिणाम होईल, याबाबत भाजपकडून सर्वेक्षणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. मुंबई वगळता स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबतचा निर्णय योग्य वेळी होईल, असे सूत्रांनी नमूद केले.