PM Narendra Modi Praises RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. देशातील अग्रगण्य दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातून त्यांनी सरसंघचालकांच्या योगदानाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे यापूर्वी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणातही पंतप्रधानांनी संघाच्या राष्ट्रसेवेचा उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका मुलाखतीत आरएसएसशी संबंधित असणे ही काही नकारात्मक बाब नाही, असं म्हटलं होतं. या सलग विधानांमधून भाजपा आपल्या वैचारिक पालक संस्थेला पुन्हा एकदा सार्वजनिकरीत्या कवेत घेत असल्याचं दिसून येतं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर उघड झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

मोहन भागवत यांच्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींनी लिहिलेला हा लेख म्हणजे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वर्षभरापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ‘भाजपाला आता निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही’, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे आरएसएसमध्ये प्रचंड अस्वस्थता अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या नाराजीमुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा उत्साह कमी झाल्याचं दिसून आलं. परिणामी या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता आलं नाही. केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करताना त्यांना तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल (युनायटेड) या मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला.

भागवतांचा संदेश आणि संबंधांमध्ये सुधारणा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आठवड्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक सूचक विधान केलं होतं. “एक खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. मी हे केले, असा कोणताही श्रेयवाद तो करीत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही. तो नेहमी शिष्टाचार पाळतो. फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे”, असं मोहन भागवत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाकडे भाजपा नेतृत्वासाठी एक संदेश म्हणून पाहिलं गेलं. त्यानंतर भाजपानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर सलोखा साधण्यासाठी अंतर्गत प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांमधील भाजपाच्या विजयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा वाटा असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे भाजप-आरएसएसमधील संबंधांमधील तणाव निवळल्याचे संकेत मिळाले.

आणखी वाचा : महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमधेही कामाच्या तासांमध्ये वाढ; कोणकोणत्या राज्यांनी केले कामगार कायद्यात बदल?

भाजपा-आरएसएसमध्ये कोणताही तणाव नाही : आंबेकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत संघ आणि सत्ताधारी भाजपामध्ये कोणताही तणाव नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी हे कौटुंबिक प्रकरण असल्याचं स्पष्ट केलं. मागील महिन्यात एका व्याख्यानमालेच्या सुरुवातीच्या भाषणात मोहन भागवत यांनी, “संघ स्वयंसेवकांना अशा प्रकारे तयार करतो की, ते हळूहळू स्वतंत्र आणि स्वावलंबी होतात”, असं म्हटलं होतं. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अनेक महिन्यांपासून रडखडलेली आहे. संघानं निर्णय घेण्यासाठी इतका वेळ घेतला नसता, असा अप्रत्यक्ष टोलाही सरसंघचालकांनी लगावला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही गाठी अजूनही सुटायच्या बाकी असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या काही आठवड्यांत भाजपातील पक्षश्रेष्ठींनी संघाच्या भूमिकेची घेतलेली ठळक दखल अधिकच लक्षवेधी ठरत आहे.

पंतप्रधान मोदींकडून आरएसएसचं कौतुक

गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तोंडभरून कौतुक केलं. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षांची देशसेवा हा इतिहासातील अभिमानास्पद व गौरवशाली अध्याय आहे. ‘व्यक्तिनिर्माण’ आणि ‘राष्ट्रनिर्माण’ या ध्येयाने असंख्य स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केलं आहे. सेवा, समर्पण, संघटन व अप्रतिम शिस्त ही संघाची ओळख आहे. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातील सर्वांत मोठं स्वयंसेवी संस्थान आहे,” असं पंतप्रधान म्हणाले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पंतप्रधानांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या प्रवासाचा उल्लेख करून मातृभूमीच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या स्वयंसेवकांना अभिवादन केले,” असं नड्डा म्हणाले होते.

pm modi on mohan bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र @narendramodi.in)

अमित शाह संघाबद्दल काय म्हणाले होते?

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३० जुलै रोजी संसदेत काँग्रेसवर टीका करताना हिंदू आतंकवादी नसतो, असं ठामपणे सांगितलं होतं. “मी भाजपामधून आलो असून आरएसएसचा स्वयंसेवक आहे. जोपर्यंत भारत महान होत नाही, तोपर्यंत आम्हाला विश्रांती घेण्याचा अधिकार नाही,” असं शाह यांनी २२ ऑगस्ट रोजी कोची येथे आयोजित मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना म्हटलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली. राधाकृष्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जुळलेले असल्यामुळेच त्यांची निवड झाली का, असा प्रश्न त्यानंतर शाह यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “अनेक लोक… पंतप्रधान स्वतः आरएसएसशी जोडलेले आहेत… मी आहे… संघाशी जोडलेलं असणं ही काही नकारात्मक बाब आहे का?… अजिबात नाही,” असं शाह म्हणाले होते.

आमची आणि संघाची एकच विचारसरणी : भाजपा नेते

या विधानांमधून भाजपा आपली पाळंमुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी किती जोडलेली आहेत हे पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. भाजपामधील एका वरिष्ठ नेते म्हणाले, “काही विधानांचा गैरसमज झाल्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण झाला होता; पण भाजपा आणि संघ हे वेगवेगळे नाहीत. आमची विचारसरणी आणि ध्येय एकच आहे. कोणतीही गोष्ट आम्हाला वेगळं करू शकत नाही. भाजपाचे पक्षश्रेष्ठीही सध्या याच गोष्टीवर भर देत आहेत. आमच्या नेत्यांच्या अलीकडील काही विधानांमुळे हा संदेश पक्षाच्या आणि संघाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.”

हेही वाचा : “राजनीति के नाम पर कितना गिरोगे”, आई आणि पंतप्रधान मोदींचा एआय व्हिडीओ व्हायरल; वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या व्हिडीओत काय?

संघ परिवार आणि भाजपात सर्व काही सुरळीत- संघनेत्याचा दावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामध्ये सर्व काही सुरळीत आहे, असं संघातील एका नेत्यानं स्पष्ट केलं. “प्रत्येक कुटुंबात थोडाफार तणाव होतोच. तसाच इथेही होऊ शकतो; पण संघ भाजपाला थेटपणे मार्गदर्शन करीत नाही. जेव्हा आम्हाला वाटतं की, काही गोष्टी मूलभूत तत्त्वांपासून ते दूर जात आहेत, तेव्हा आम्ही नक्कीच त्यांना सूचित करतो. सत्तेचं स्वतःचं एक स्वरूप असतं. कधी कधी ते माणसाला असंवेदनशील आणि संवादहीन बनवतं. जेव्हा आम्हाला तसं दिसतं, तेव्हा आम्हीही आवाज उठवतो. आमच्या मते- व्यक्ती ही सुई आहे आणि विचारसरणी हा दोरा आहे. दोरा नसेल, तर सुई कपड्याला फक्त छिद्रे पाडत राहील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या नात्यातील परस्पर संवाद आणि वैचारिक बांधिलकीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.