जळगाव : एकेकाळी जळगावच्या राजकारणात भाजपने सुरेश जैन यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला होता. सुरेशदादांच्या विरोधात भाजपने तेव्हा आघाडीच उघडली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्याच सुरेशदादांची मदत मिळविण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
भाजपने जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माजी मंत्री सुरेश जैन यांचा जाहीर पाठींबा मिळविला होता. जैन हे सध्या राजकारणापासून दूर झालेले असतानाही भाजप जळगाव महापालिका काबीज करण्यासाठी पुन्हा लोकसभा निवडणुकीवेळचा कित्ता गिरविण्याच्या प्रयत्नात आहे. माजी मंत्री जैन यांना मानणारा शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) १३ माजी नगरसेवकांचा गट फोडण्याच्या तयारीत भाजप असून त्यासाठी भाजपकडून मंत्री गिरीश महाजन हे जैन यांची मनधरणी करीत असल्याचे बोलले जाते.
एकेकाळी सुरेश जैन हे शिवसेनेत असले तरी त्यांचे समर्थक जळगाव शहरातील तत्कालिन नगरपालिका आणि महापालिकेची निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून लढत असत. ज्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना मुस्लीमबहुल आणि इतर बिगरहिंदू मताधिक्य असलेल्या भागात चांगली मते मिळत. महापालिकेवर सत्ता शिवसेनेची असली तरी नाव खान्देश विकास आघाडीचे चालत असे. शिवसेना नेतृत्वाने त्यामुळे २०१८ च्या निवडणुकीत जळगाव महापालिकेची निवडणूक खान्देश विकास आघाडी म्हणून नव्हे तर, शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचा पवित्रा घेतला. त्या निवडणुकीत बिगर हिंदू मते न मिळाल्याने शिवसेनेचे फक्त १५ उमेदवार निवडून आले.
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने ५७ जागा जिंकून महापालिका ताब्यात घेतली. सुरेश जैन यांनी तेव्हापासून जळगावमधील लक्ष कमी केले. त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र नंतरच्या काळात ठाकरे गटात स्थिरावले, परंतु, जैन यांच्यानंतर शिवसेनेत नव्याने उदयास आलेल्या सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्यासारख्या तरूण नेतृत्वाने नंतरच्या काळात भाजपचेच काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली.
आता भाजप ठाकरे गटाचे काही नगरसेवक फोडून हाताशी आलेली महापालिकेची सत्ता हिसकावून घेणाऱ्या ठाकरे गटाचा सर्व हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने कामाला लागली आहे. त्यासाठी सध्या ठाकरे गटात असलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांना मानणाऱ्या १३ माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचालीही भाजपने सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्व माजी नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी जैन यांची पुन्हा मनधरणी करण्याची वेळ भाजपवर आली आहे. या प्रयत्नात भाजपला यश आल्यास ठाकरे गटासाठी तो मोठा धक्का असेल.
पक्ष विभाजनानंतर आधीच काही दिग्गज शिंदे गटात गेले आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनाच जिल्हाप्रमुख केल्याने ठाकरे गटातील जुन्या निष्ठावानांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, माजी महापौर लढ्ढा यांनी त्यांच्यासह १३ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची सध्या फक्त चर्चा असल्याचा दावा केला आहे.
माझ्यासह ठाकरे गटाचे १३ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या फक्त चर्चा आहे. आमचे नेते सुरेश जैन यांच्याशी त्याबाबत अद्याप कोणतेच ठोस बोलणे झालेले नाही. – नितीन लढ्ढा (माजी महापौर, जळगाव).
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. काहींनी आमची भेट देखील घेतली आहे. भाजपमध्ये त्यांचा लवकरच प्रवेश होईल. – गिरीश महाजन (भाजप नेते).
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.