पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिलेल्या भाजपने पहिल्यांदाच निवडून आलेले चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली. यातून तिसरी टर्म आणि सर्वात वरिष्ठ असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना महापालिका निवडणुकीपासून दूर ठेवल्याचे दिसून येते. त्यातून लांडगे आणि त्यांच्या सहकार्यातून शहराध्यक्ष झालेले शत्रुघ्न काटे यांचे पंख छाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करुन महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणल्यास जगताप यांची मंत्रीपदासाठीची दावेदारी प्रबळ होईल आणि लांडगे यांना मंत्रीपदासाठी स्पर्धक होतील, असे मानले जात आहे.
पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार असे २०१७ पर्यंत समीकरण होते. ‘अजितदादा बोले आणि प्रशासन डोले’ असे चित्र होते. शहरातील कोणत्याही विकास प्रकल्पाचे भूमिपूजन असो की उद्घाटन दादांशिवाय दुसरा नेता शहरात येत नव्हता; परंतु त्यांचेच शिष्य असलेले आमदार, भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी २०१७ मध्ये हे समीकरण बदलले. भाजप संलग्न असलेले भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आझम पानसरे यांना जगताप यांनी सोबत घेतले. या तिघांनी महापालिकेतील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली आणि पहिल्यांदाच कमळ फुलले. पुढे आमदार जगताप आणि लांडगे यांनी महापालिकेतील सत्ता चालविली.
सन २०२३ मध्ये जगताप यांचे निधन झाल्यानंतर आमदार लांडगे यांचा शब्द महापालिका प्रशासनात अंतिम मानला जाऊ लागला. प्रशासनाकडून लांडगे यांना झुकते माप दिल्याचे दिसून आले. मागील विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप पहिल्यांदाच चिंचवडमधून आमदार झाले. अमित गोरखे, उपा खापरे हे विधानपरिषदेवर आहेत.
शहर भाजपमध्ये सर्वात वरिष्ठ आमदार लांडगे आहेत. ते शहराध्यक्ष असताना महापालिकेची निवडणूक झाली नाही. परिणामी, महापालिकेत सत्ता आणून शहरावरील नेतृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे सर्वात वरिष्ठ आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रखर विरोधक असल्याने महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार लांडगे यांच्यावर सोपविली जाईल, असे मानले जात होते. परंतु, भाजपने धक्कातंत्र राबवत पहिल्यांदाच निवडून आलेले चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली.
आमदार लांडगे यांना महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करण्यापासून दूर ठेवले. त्यातून पक्ष नेतृत्वाने लांडगे यांनाही सूचक संदेश दिल्याचे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. लांडगे यांच्याकडे मावळची निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देऊन शहारापासून दूर ठेवले. शंकर जगताप यांचा विरोध डावलून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले, चिंचवड मतदारसंघातीलच शत्रुघ्न काटे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे साथ दिल्याचे बोलले जाते. आता जगताप यांना निवडणूक प्रमुख केल्याने शहराध्यक्ष काटे यांचीही अडचण झाली. त्यांना जगताप यांच्यासोबत जुळवून घेऊन काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते.
आमदार जगताप यांनी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. महापालिकेत भाजपची पुन्हा सत्ता आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कारण, त्यांच्यासमोर महायुतीमधील मित्र पक्ष आणि शहरात ताकद असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान असणार आहे. जगताप यांचे पवार यांच्याशी चांगले संबंध असून ते उघडपणे टीका करताना दिसले नाहीत. पण, निवडणुकीत पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच समोर प्रबळ विरोधक असणार आहे. त्यामुळे त्यांना पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. बंधू, आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणे महापालिकेवर भाजपची सत्ता आणून आपले नेतृत्व सिद्ध करण्याची संधी शंकर जगताप यांना मिळाली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणल्यास पहिल्यांदाच निवडून येऊनही जगताप हे मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होतील, असे राजकीय जाणकार सांगतात. आमदार लांडगे यांना मंत्रीपदासाठी शहरातूनच स्पर्धेक निर्माण होऊ शकेल.
महापालिका निवडणुकीसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी एक निवडणूक समिती स्थापन केली आहे. त्यात चार आमदार आणि शहराध्यक्षांचा समावेश आहे. आमदार शंकर जगताप हे निवडणूक प्रमुख आहेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी आहे. – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप
